Wednesday, July 29, 2026
Google search engine
Home Blog Page 16

वणी नगर परिषदेकडून डुक्कर ग्रामीण भागात सोडल्याचा आरोप

0

News Today

वणी नगर परिषद क्षेत्रातील मोकाट फिरणाऱ्या डुकरांबाबत स्थानिक शेतकऱ्यांकडून गंभीर तक्रारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, नगर परिषदेने शहरातील डुकरे पकडून ती थेट मौजा बोर्डा व अन्य ग्रामीण भागात सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे.

या संदर्भात शेतकऱ्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डुकरे जंगल परिसर व शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर धुडगूस घालत आहेत. फळबागा, भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान होत असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, त्रस्त परिस्थितीत दिवस काढत आहे.

शेतकऱ्यांचे पुढे असे म्हणणे आहे की, शहरातून ग्रामीण भागात डुकरे आणून सोडल्याने झालेल्या नुकसानीसाठी नगर परिषद थेट जबाबदार आहे. शेतकऱ्यांचे स्पष्ट मत आहे की, या नुकसानीची पूर्ण जवाबदारी नगर परिषदेकडेच राहील.

निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आली आहे की, त्वरित सर्व डुकरे पकडून ती संबंधित परीसरातून हटविण्यात यावीत, अन्यथा शेतकरी आणखी मोठ्या अडचणीत सापडतील. तसेच नगर परिषद प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांचा हा प्रश्न निकाली न लागल्यास पुढील काळात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. उपसरपंच राजू राजुरकर, सतीश काळे, सचिन वाभिटकर, प्रवीण झाडे, दिनेश ढाले, सतीश राजूरकर, गंगाराम राऊत आदी उपस्थित होते.

मुकूटबन आरसीसीपीएल कंपनीविरोधातील उपोषणाचा दुसरा दिवस : आंदोलकांची प्रकृती खालावली, वातावरण तणावग्रस्त, राष्ट्रवादीचा पाठिंबा

0

News Today 

मुकुटबन (ता. झरी), दि. २३ सप्टेंबर २०२५
आरसीसीपीएल कंपनीविरोधात सुरू असलेले शिवसेना (उबाठा) गटाचे आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाले असून आंदोलनकर्त्यांपैकी एकाची प्रकृती खालावली आहे. उपोषणकर्त्यांचे आज सकाळी शासकीय चिकित्सकांनी आरोग्य तपासले. मात्र कंपनी प्रशासनाकडून अजूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

✦ आंदोलन तीव्र, शिवसैनिकांचा संताप

नेताजी पारखी, संदीप विंचू, संकेत गझलवार यांच्यासह उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. कालपासून सुरू असलेले हे आंदोलन आता जनआंदोलनाचे रूप धारण करत असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहत आहेत. शिवसेना (उबाठा) गटाने इशारा दिला आहे की, मागण्या मान्य न झाल्यास परिस्थिती चिघडू शकते.

✦ प्रकृती खालावली, आरोग्य तपासणी

उपोषणकर्त्यांपैकी एकाची प्रकृती खालावल्याने आंदोलक व ग्रामस्थांमध्ये चिंता पसरली आहे. शासकीय डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून सल्ला दिला असला तरी उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे.

✦ राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी आज आंदोलन स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. त्यांच्या भेटीमुळे आंदोलनाला राजकीय रंग मिळण्यास सुरुवात झाली आहे.

✦ कंपनी प्रशासन मौन

उपोषणाचा दुसरा दिवस संपत आल्यानंतरही कंपनी प्रशासनाने मागण्यांबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. या मौनामुळे ग्रामस्थ व उपोषणकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे.

📌 उपोषण दीर्घकाळ चालल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

यावेळी यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख संतोष माहुरे, घरी जा मी तालुकाप्रमुख सतीश आदेवार, जरी तालुका समन्वयक सितारामजी पिंगे, दया कर गिराम विजय पनघंटीवार अशोक बरपटवार शिवशंकर ठाकरे सुभाष पारखी संतोष लढांगे सुभाष भगत विनोद चिंतावर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपोषण मंडपामध्ये उपस्थित होते

चिलई–मुंड्रा शिवारात सागवान वृक्षांची अनधिकृत तोड? ग्रामस्थांचा आक्रोश, सरपंचाकडून अधिकाऱ्यांकडे निवेदन

0

News Today 
वणी : वणी तालुक्यातील चिलई–मुंड्रा शिवार परिसरात के. के. माईन्स अँड मिनरल्स या खासगी कंपनीच्या नावाखाली शेकडो मौल्यवान सागवान वृक्षांची तसेच इतर वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड सुरू असल्याची धक्कादायक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या अनधिकृत तोडीमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पर्यावरणीय संतुलन धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


ग्रामपंचायत कुंड्राचे सरपंच विजय मारोती ठाकरी यांनी या संदर्भात मा. उपविभागीय अधिकारी, वणी तसेच वनपरिक्षेत्राधिकारी, वणी यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.


सरपंच ठाकरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीच्या नावाखाली वृक्षतोडीचे काम सुरू असून त्यासाठी प्रोकलेम मशीनचा वापर करण्यात आल्याने रस्त्यावर मोठमोठे खडे पडले आहेत. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना वाहतुकीत प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, वृक्षतोड करताना कोणतेही कायदेशीर नियम, प्रक्रिया वा परवानग्या पाळल्या जात नाहीत. मौल्यवान सागवान वृक्षांची अशी तोड थांबवून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


मागण्या अशा :
चिलई–मुंड्रा शिवारातील सुरु असलेल्या वृक्षतोडीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
अनधिकृत वृक्षतोड तातडीने थांबवावी.
संबंधित कंपनी अथवा व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत.
पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात.
प्रोकलेम मशीनमुळे रस्त्यावर पडलेले खडे हटवून शेतकऱ्यांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध करावी.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे. दरम्यान, प्रशासन या गंभीर प्रकरणात कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनीविरोधात शिवसेना (उबाठा) गटाचे आमरण उपोषण सुरू

0

News Today 

मुकुटबन (ता. झरी), दि. २२ सप्टेंबर २०२५
आरसीसीपीएल कंपनीविरोधात स्थानिक बेरोजगार युवक, बाधित शेतकरी, गावकरी व पर्यावरण संरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने कंपनीच्या मुख्य गेटसमोर आमरण उपोषणास सुरुवात झाली.

नेताजी पारखी, संदीप विंचू, संकेत गझलवार यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपोषणावर बसले आहेत. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मुकुटबन व येडशी गावातील शेकडो महिला-पुरुषांनी उपस्थित राहून ठाम पाठिंबा दर्शविला.

✦ प्रमुख मागण्या

कंपनीतील ८०% नोकऱ्या स्थानिकांना द्याव्यात.

पर्यावरणपूरक झाडे लावावीत किंवा शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.

बाधित शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी द्यावी.

लेबर कॉन्ट्रॅक्टर बंद करून स्थानिक एजन्सीद्वारे भरती व्हावी.

कामगारांचे वेतनवाढ व पी.एफ./इन्शुरन्स लाभ निश्चित करावेत.

स्थानिकांना टेंडरशिप द्यावी; भ्रष्टाचार रोखावा.

खान परिसरात स्फोटके साठवणे थांबवावे.

कामगारांना सेफ्टी किटचे नियमित वाटप करावे.

भूजलावर आधारित वीज निर्मिती बंद करावी; नदीवर बंधारे बांधावेत.

सिमेंट धुळीमुळे शेती व गावकऱ्यांना होणारा त्रास थांबवावा.

पर्यावरण व वन्यप्राणी कायद्याचे पालन व्हावे.

वाहनांच्या धूर-प्रदूषणावर नियंत्रण आणावे.

बाहेरील कामगारांचे चरित्र प्रमाणपत्र सक्तीचे करावे.

रस्त्यावरची पार्किंग बंद करून स्वतंत्र पार्किंगची सोय करावी.

कंपनीने बांधलेले रस्ते स्थानिक ग्रामपंचायतींना उपलब्ध करून द्यावेत.

सीएसआर निधीतून आरोग्य, पाणी, रस्ते व इतर सुविधा द्याव्यात.

✦ ग्रामस्थांचा पाठिंबा

येडशी गावातील नागरिकांनी उपोषणास ठाम पाठिंबा दर्शविला असून शेकडो महिला-पुरुषांनी आंदोलनस्थळी हजेरी लावली. त्यामुळे आंदोलनाला जनआंदोलनाचे रूप आले आहे.

✦ कंपनी प्रशासन मौन

पहिल्या दिवशीच्या आंदोलनाबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. उपोषणकर्त्यांनी इशारा दिला आहे की, मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही.

करपलेल्या सोयाबीन झाडांचा हार घालून दिलीप भोयर यांनी शासनाचे लक्ष वेधले – शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्ती देऊन हेक्टरी ५० हजार मदत द्या :- रॉकापची मागणी

0

News Today 
वणी, २२ सप्टेंबर – वणी उपविभागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी यांसह सर्व हंगामी व नगदी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर संकट ओढवले असून ही बिकट परिस्थिती लक्षात घेता आज तारीख २२ रोजी दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  पाठविण्यात आले.
या निवेदनातून वणी उपविभागातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी किमान रु. ५०,०००/- मदत तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पंचनामा करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट मदत जमा करण्याचे आदेश द्यावेत, असेही ठामपणे नमूद करण्यात आले.


सोयाबीन झाडांचा हार घालून लक्ष वेधले
या वेळी वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आगळा-वेगळा मार्ग अवलंबला. त्यांनी शेतातून करपलेली सोयाबीन झाडे गोळा करून त्यांचा हार बनवून गळ्यात घालून निवेदन सादर केले. हे दृश्य शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचे प्रतीक ठरले.


दिलीप भोयर व्यक्त भावना
“शेतकरी शेतात धान्य पिकवतो, कष्टाने कुटुंब चालवतो. पण जेव्हा अतिवृष्टीने त्याचे उभे पिक करपून जाते, तेव्हा सरकारला पंचनामा करायला व मदत द्यायला महिने लागतात. पण जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात चुकून गांजाचे रोप आढळले, तर त्याचा पंचनामा दहा मिनिटांत होतो आणि गुन्हाही लगेच दाखल होतो. शेतकऱ्याला गुन्हेगार ठरवणारे प्रशासन तत्पर असते, मग पिकांचे नुकसान झाल्यावर त्याच प्रशासनाला एवढा वेळ का लागतो? शेतकऱ्याचे उभे पीक जळून खाक होत असताना सरकार कुठे आहे? शेतकऱ्याला न्याय देणे ही शासनाची जबाबदारी आहे, ती लगेच पार पाडली नाही तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असे भोयर यांनी ठामपणे सांगितले.


कार्यकर्त्यांची उपस्थिती
या निवेदन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य संघटन सचिव, रज्जाक पठाण, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सूर्यवीर चिकटे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे , तालुका सचिव प्रदीप खोब्रागडे, मंगेश गोरे, कुंड्रा येथील सरपंच विजय ठावरी, अनिल साखरकर,प्यारेलाल मेश्राम व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पक्ष सातत्याने लढा देणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

वणीत मनसेच्या वतीने भव्य गरबा महोत्सवाचा उद्यापासून शुभारंभ, व विविध स्पर्धा आणि आकर्षक बक्षीसे

0

 

News Today 

वणी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून वणी येथे उद्या (दिनांक २२ सप्टेबर) पासून भव्य गरबा महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे शहरातील शेवाळकर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील टप्पू सेनेचे कलाकार उपस्थित राहणार आहेत, जे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले आहे.
या गरबा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी आयोजकांनी विविध मूल्यवान बक्षिसे ठेवली आहेत. या बक्षिसांचे वितरण वयोगटानुसार केले जाणार आहे, अशी माहिती आयोजक मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिली आहे.

वयोगटानुसार आकर्षक बक्षिसे:
▪️११ ते ३० वर्षे वयोगट: या गटातील विजेत्यांसाठी प्रथम बक्षीस म्हणून दुचाकी गाडी, द्वितीय बक्षीस टीव्ही, तृतीय फ्रिज, चतुर्थ वॉशिंग मशीन, पाचवा लॅपटॉप, सहावा टॅब, सातवा मोबाईल, तर अनुक्रमे सायकल, होम थिएटर आणि पैठणी साडी अशी बक्षिसे आहेत.

▪️३१ वर्षांवरील वयोगट: या गटातील स्पर्धकांसाठी सोन्याची नथ, ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, पैठणी साडी आणि ज्युसर अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
▪️ ५ ते १० वर्षे वयोगटातील बालस्पर्धक: लहान मुलांसाठी सायकल आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेत सुमारे १,००० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. गरबा स्पर्धा दररोज सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणार आहे.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, गरबा महोत्सव समिती अध्यक्ष साहिल सलाट, तसेच वैभव पुराणकर, जतीन राऊत, लक्की सोमकुंवर, संस्कार तेलतुंबडे, गौरव पुराणकर, तालिब खान, योगेश तुराणकर, आशिष घनकसार, सतिश ठोंबरे, सचिन कुडमेते, कृष्णा कुकडेजा यांच्यासह शहरातील सर्व मनसे पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.
या महोत्सवामुळे वणी शहरातील नवरात्र उत्सवाला एक वेगळीच रंगत येणार असून, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये एकोपा वाढण्यास मदत होणार आहे.

गणेश विसर्जन सोहळ्यात सहभागी मंडळांचा सत्कार व महाप्रसाद

0

News Today 

वणी : नेरड (पू.) येथील आज तारीख १९ रोजी गणेश विसर्जन सोहळा यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. विसर्जन मिरवणुकीत वणी, झरी, मारेगाव, कोरपना तसेच चंद्रपूर तालुक्यातील महिला भजन मंडळांसह विविध गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता.

या प्रसंगी नेरड (पू.) येथील नवयुवक गणेश उत्सव मंडळातर्फे उपस्थित सर्व मंडळांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष प्रमोद तुरणकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात योगदान देणाऱ्या मंडळांचे कौतुक करून त्यांना श्रीफळ प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप भोयर यांनी कुशलतेने केले, तर आभारप्रदर्शन संजय लेडांगे यांनी मानले. विसर्जनानंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, या महाप्रसादासाठीची भोजन व्यवस्था गावकऱ्यांनी उत्साहाने सांभाळली. शिस्तबद्ध नियोजन, मनापासून केलेली सेवा आणि सामूहिक सहभाग यामुळे भोजनव्यवस्थेचे सर्वत्र कौतुक झाले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तीभाव, सांस्कृतिक उत्साह, सामूहिक एकोपा आणि सेवाभाव यांचा सुंदर मेळ पाहायला मिळाला.

 

वणीमध्ये कोर्ट फी व नॉन-ज्युडिशियल स्टॅम्पचा तुटवडा; वकिलांचा एस.डी.ओ.कडे निवेदन

0

News Today 

वणी, ता. १९ सप्टेंबर :
वणी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून कोर्ट फी स्टॅम्प आणि नॉन-ज्युडिशियल स्टॅम्प यांच्या सततच्या टंचाईमुळे न्यायालयीन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वणी बार असोसिएशनने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. विरेंद्र महाजन व सचिव ऍड . अमोल टोंगे यांचे उपस्थितीत सर्व वकिलांनी केली आहे.

वकिलांना होत असलेला त्रास

वणी येथील वकिलांना कोर्ट फी स्टॅम्प न मिळाल्याने खटले नियोजित वेळेत दाखल करता येत नाहीत. अनेकदा त्यांना वरोरा, पांढरकवडा, केळापूर किंवा चंद्रपूर येथे जाऊन स्टॅम्प खरेदी करावे लागतात. या प्रक्रियेत वेळ, मेहनत आणि अतिरिक्त खर्च होऊन वकिलांसह याचिकाकर्त्यांचे मोठे नुकसान होते.

सर्वसामान्यांनाही फटका

ही अडचण फक्त वकिलांची नसून सामान्य नागरिकांनाही भेडसावत आहे. अल्पमूल्याचे नॉन-ज्युडिशियल स्टॅम्प उपलब्ध नसल्यामुळे लोकांना महागडे स्टॅम्प विकत घ्यावे लागतात. विशेषतः नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या युवकांना शपथपत्र दाखल करताना स्टॅम्प मिळत नसल्याने नोकरीची संधी गमावण्याचा धोका निर्माण होतो.

कोषागारातूनच कमी पुरवठा

वणी महसूल कार्यालयातील विक्रेत्यांच्या मते, स्थानिक स्तरावर स्टॅम्पचा पुरवठा कमी असल्यामुळे ही समस्या उद्भवत आहे. कोषागार कार्यालयातून योग्य प्रमाणात स्टॅम्प उपलब्ध न झाल्याने संपूर्ण वणी तालुक्यात टंचाई निर्माण झाली आहे.

काळाबाजाराला खतपाणी

वकिलांच्या मते, ही समस्या तातडीने सोडवली नाही तर स्टॅम्पचा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सरकारलाही महसुली नुकसान सहन करावे लागेल. म्हणूनच या टंचाईमागचे खरे कारण शोधण्यासाठी स्वतंत्र चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

बार असोसिएशनची मागणी

निवेदनाद्वारे वणी बार असोसिएशनने कोर्ट फी स्टॅम्प तसेच नॉन-ज्युडिशियल स्टॅम्पचा तातडीने पुरवठा वाढवावा, विशेषतः ₹5, ₹10, ₹20 आणि त्यापेक्षा जास्त किमतीचे स्टॅम्प स्थानिक स्तरावर सहज उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नेरड (पू.) येथे महिला मंडळाच्या भजन गजराने गणरायांना निरोप

0

News Today 

नेरड (पू.) : नेरड गावात मस्कर्या गणपतीच्या विसर्जन सोहळ्याला महिला मंडळाच्या भजन गजराची जोड मिळाली आणि गावभर भक्तिमय वातावरण पसरले. गेल्या दहा दिवसांपासून गावात सुरू असलेल्या उत्सवाचा आज मंगलमय समारोप झाला.

यावर्षी मस्कर्या गणपती उत्सव ने २५ वर्षे पूर्ण केल्याने गावकऱ्यांत विशेष उत्साह होता. सकाळपासूनच गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू झाली. महिला मंडळाच्या भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत सामूहिक भजने, गजरे आणि अभंग गाऊन उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.

या वेळी परिसरातील तब्बल १६ गावांमधील भजन मंडळांनी सहभाग नोंदवला. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाच्या नादात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषाने वातावरण दुमदुमले.

गावातील ज्येष्ठ मंडळींनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केले. तरुणांनी मिरवणुकीत पारंपरिक खेळ, नृत्य आणि ढोलवादन सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.

२५ वर्षांचा प्रवास
मस्कर्या गणपती उत्सव मंडळाने सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा यांसारख्या उपक्रमांतून मंडळाने गेली २५ वर्षे समाजकार्य केले आहे. त्यामुळे गणपती उत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्याचा प्रतीक ठरला आहे.

उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश उत्सव मंडळ, गावकरी व महिला मंडळाने मेहनत घेतली. अखेर संध्याकाळी जल्लोषात आणि भक्तिभावात गणरायांना निरोप देण्यात आला.

गणेश मंडळाची स्वच्छता मोहीम

गावातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश विसर्जनानंतर रस्त्यावर पडलेले कागदी ग्लास आणि कचरा झाडून स्वच्छता केली. विसर्जनाच्या आनंदसोहळ्यानंतर गाव स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम राबवून मंडळाने समाजासाठी आदर्श घालून दिला आहे. या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

गणपती विसर्जनावेळी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

शहरातील गणेश विसर्जन मिरवणुक दरम्यान भाविकांना पिण्यासाठी मोफत फिल्टर केलेल्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अंकित पशुपालन , ग्राम अमृत अक्का  व विविध ग्राम उद्योग केंद्राचे संचालक पिदुरकर यांच्या वतीने ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून सर्व भजन मंडळांना तसेच भाविकांना याचा लाभ घेता येईल. विसर्जन मिरवणुकीतील गर्दी व उष्ण वातावरण लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात आली आहे.

महसूल सेवकांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अन्यथा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

0

News Today 

वणी :- महसूल विभागाचा कणा मानल्या जाणाऱ्या महसूल सेवकांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, अन्यथा येत्या 12 सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा महसूल सेवकांनी तहसीलदार वणी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

राज्यातील महसूल विभागावर शासनाच्या असंख्य योजना आणि उपाययोजना अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी असते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते गावपातळीवरील महसूल सेवकापर्यंत ही यंत्रणा कार्यरत आहे. शेतकरी, शेतमजूर, तसेच सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी महसूल सेवक दिवस-रात्र कार्यरत असतात. तरीदेखील शासनाने त्यांना अद्याप चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिलेला नाही, यामुळे अन्याय होत असल्याचे महसूल सेवकांचे म्हणणे आहे.

महसूल सेवकांचे कामाचे स्वरूप व्यापक असून त्यात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, रात्रीच्या पाळ्या, गावातील स्वच्छता, शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवणे, ई-पिक पाहणी, पीक नुकसान पंचनामे, पोलिस ठाण्यात शासकीय पंच म्हणून जबाबदारी, महसूल वसुली, फेरफार नोटीस बजावणे, दवंडी देणे, राष्ट्रीय सणांचे कार्यक्रम, तसेच शिपाई संवर्गातील रिक्त पदांची कामे यांचा समावेश होतो. म्हणजेच, महसूल सेवकांना शिपाईपासून ते अधिकार्‍यांपर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

“24 तास शासकीय सेवेत कार्यरत राहूनही आम्हाला शासनाकडून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि त्यासोबतच्या सेवा सुविधा मिळालेल्या नाहीत. शासनाने आमच्या मागणीला तातडीने मान्यता द्यावी, अन्यथा आम्ही 12 सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार,” असा इशारा महसूल सेवकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केला आहे.

निवेदन प्रसंगी तालुका अध्यक्ष प्रफुल लोडे, उपाध्यक्ष संजय कुचनकर, सचिव राकेश संकिलावर, तसेच पवन पचारे, विकास चिडे, अंगुल फुसाटे, महादेव गाते, पूजा मेश्राम आदी महसूल सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.