Tuesday, July 28, 2026
Google search engine
Home Blog

परमडोह येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता; तातडीने शिक्षक नियुक्तीची ग्रामस्थांची मागणी

0

News Today

वणी, दि. 20 जुलै : वणी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, परमडोह येथे शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती वणी यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनानुसार, शाळेतील एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती झाल्याने शाळेत शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे. शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असून उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

रिक्त झालेल्या पदावर तातडीने शिक्षक नियुक्त करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच, योग्य कालावधीत मागणीची पूर्तता न झाल्यास तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते संदीप थेरे, शाळा समिती अध्यक्ष महेंद्र देहारकर  व्यक्त केली आहे.

सेवकराम मिलमिले यांच्या मातोश्री शांताई मिलमीले यांचे दुःखद निधन

0

News Today 

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता विचारांचे प्रचारक तथा पूज्य तुकारामदादा गीताचार्य यांचे मानसपुत्र सेवकराम मिलमिले यांच्या मातोश्री शांताई कवडूजी मिलमिले (वय ८७ वर्षे), रा. तूडाणा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर यांचे आज, दि. २० जुलै २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता, अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने मिलमिले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. शांताई मिलमिले या प्रेमळ, साध्या आणि धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात ५ मुले १ मुलगी आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे.

शांताई मिलमिले यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, धार्मिक व ग्रामगीता विचारांच्या कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ग्रामपंचायत नांदेपेरा येथील विकासकामांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित

0
  1. News Today 

वणी : ग्रामपंचायत नांदेपेरा, ता. वणी येथील सन 2022 पासून आजपर्यंत झालेल्या विविध विकासकामांमध्ये अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार व निधी अपहार झाल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक (मनरेगा), यवतमाळ यांनी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीचे आदेश दिले आहेत.

वणी तालुक्यातील नांदेपेरा ग्रामस्थांनी विकासकामात झालेल्या अपहार प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या संदर्भात थातूरमातूर चौकशी करण्यात आली होती. परंतु त्या चौकशीने ग्रामस्थ समाधानी झाले नसल्याने गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेंडे, राकेश खामणकर, सुभाष झाडे, प्रकाश चिकटे, एकनाथ सिडाम,सचिन चिकटे,कृणाल खामनकर व अन्य नागरिकांनी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने आमदार संजय देरकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते.

वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार  संजय निळकंठराव देरकर यांनी या संदर्भात केलेल्या पाठपुराव्यानंतर प्रकरणाची नोंद घेण्यात आली. यापूर्वी करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालाचे अवलोकन केल्यानंतर अनेक गंभीर मुद्द्यांवर सखोल व वस्तुनिष्ठ चौकशी झालेली नसल्याचे निदर्शनास आले. तसेच अनेक आरोपांबाबत स्पष्ट निष्कर्ष नोंदविण्यात आले नसल्याने तक्रारींचे समाधानकारक निराकरण झालेले दिसून आले नाही.

यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सर्वंकष चौकशी करण्यासाठी तहसीलदार, मारेगाव यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. समितीमध्ये विविध विभागांतील तांत्रिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून ग्रामपंचायत नांदेपेरा येथे सन 2022 पासून राबविण्यात आलेल्या सर्व विकासकामांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे.

सदर समितीला विकासकामांची गुणवत्ता, मंजूर निधीचा वापर, कामांची अंमलबजावणी, आर्थिक व्यवहार आणि तक्रारीतील प्रत्येक मुद्द्याची तपासणी करून 15 दिवसांच्या आत स्वयंस्पष्ट निष्कर्षांसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनतेचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. चौकशी अहवालानंतर दोषींवर आवश्यक ती कारवाई करण्यात येण्याची शक्यता असून या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करा; महाराष्ट्रात ३०० युनिटपर्यंत मोफत वीज द्या – आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0

News Today 

यवतमाळ, दि. १४ जुलै : आम आदमी पार्टी, यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी आणि पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेच्या तीव्र विरोधामुळे स्मार्ट मीटरच्या सक्तीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती सुरू करण्यात आली असून वीजदरातही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे.

निवेदनानुसार, स्मार्ट मीटरमधील रिचार्जची रक्कम संपताच वीजपुरवठा तात्काळ खंडित होतो. यवतमाळसह विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना वेळेवर रिचार्ज करता न आल्यास किंवा स्मार्टफोनच्या अभावामुळे गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच स्मार्ट मीटरमुळे प्रत्यक्ष वीज वापराच्या तुलनेत अधिक बिल येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात असल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

आम आदमी पार्टीने शासनाकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी स्मार्ट मीटर सक्तीला देण्यात आलेली स्थगिती कायम ठेवून निवडणुकीनंतर जारी करण्यात आलेला सक्तीचा आदेश तात्काळ रद्द करावा. तसेच वाढती महागाई आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.

यावेळी वसंतराव ढोके, मोबीन शेख, प्रशांत देवकते, विलास वाडे, अविनाश धनेवार, ॲड. मनीष माहुलकर, धनपाल नाईक, आकाश चमेडिया, शुभम चांदेकर, निलेश नांदूरकर, प्रतीक्षा रहांगडाले, भारती पिसाळकर, उषा श्रीरामे, विनोद रोकडे तसेच आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी अभिमन्यू चव्हाण (पाटील) यांची नियुक्ती

0

News Today 

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने सामाजिक कार्याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते श्री. अभिमन्यू चव्हाण (पाटील) यांच्यावर संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रवीण समाधान भोटकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुरज एस. यादव यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार ही नियुक्ती करण्यात आली. रुग्णसेवा, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

नियुक्तीनंतर बोलताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अभिमन्यू चव्हाण (पाटील) यांनी, “रुग्णसेवक संघटना प्रत्येक रुग्णाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. रुग्णसेवेत हलगर्जीपणा, अन्याय व भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. रुग्ण आणि कामगारांच्या हक्कांसाठी संघटना सातत्याने लढा देईल,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.

या नियुक्तीनंतर विविध सामाजिक, राजकीय, कामगार आणि रुग्णसेवा क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. अभिमन्यू चव्हाण (पाटील) यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णसेवा अधिक सक्षम होण्यासह कामगारांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे कार्य अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळी अधिवेशन लक्षवेधी :- मुकुटबन रस्ता बांधकामातील गंभीर अनियमितता; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाविरोधात संताप

0

News Today 

वणी:- मुकुटबन येथील सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामामध्ये गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार सादर करण्यात आली असून, यापूर्वीही मुख्य अभियंता, अमरावती, अधीक्षक अभियंता, यवतमाळ, कार्यकारी अभियंता, पांढरकवडा, उपविभागीय अभियंता, मारेगाव आणि शाखा अभियंता, मारेगाव यांच्याकडे वारंवार तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस किंवा प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, रस्ता बांधकामामध्ये निविदेतील अटींचे पालन होत नसून आर.एम.सी. प्लांट, ट्रान्झिट मिक्सर, व्हायब्रेटर, आवश्यक यंत्रसामग्री आणि गुणवत्ता नियंत्रणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण कामाचे स्वतंत्र थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशूनही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे की, “देश स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती करत असताना महाराष्ट्रात अशा पद्धतीने रस्ते बांधकाम होणार असेल तर याकडे लक्ष दिले जाणार का? या प्रकरणातील भ्रष्टाचारावर कारवाई होणार की भ्रष्टाचाराला पाठबळ दिले जाणार?”
तसेच, कार्यकारी अभियंता, पांढरकवडा, उपविभागीय अभियंता, मारेगाव आणि शाखा अभियंता, मारेगाव यांच्यावर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई होणार का? असा थेट सवालही करण्यात आला आहे.
याशिवाय, काही दिवसांपूर्वी एका कंत्राटदाराने “रस्ता बांधकामाच्या रकमेपैकी ५६ टक्के रक्कम लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना द्यावी लागते” असा सार्वजनिक आरोप केला होता. या आरोपांची सत्यता सक्षम यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशीतून स्पष्ट व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नसून त्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आता मंत्रालय स्तरावर हस्तक्षेप करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बघा युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बातमी 👇

https://youtu.be/QupumI4WGIA?si=5Bun5x3tHnnTSjXD

“संतपरंपरेच्या अस्मितेसाठी अड्याळ टेकडीवर ११ व १२ जुलैला जनएकजूट” – संचालक सुबोधदादा

0

News Today 

चंद्रपूर, दि. ८ जुलै : अड्याळ टेकडी ही कर्मयोगी संत तुकाराम दादा गीताचार्य यांच्या तपश्चर्येने पावन झालेली, हजारो सेवकांच्या श्रमदानातून उभी राहिलेली आणि समाजसेवा, अध्यात्म व संस्कारांचे केंद्र असलेली पवित्र भूमी आहे. या स्थळाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक व सामाजिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले.

अड्याळ टेकडीसंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने अंतिम न्यायालयीन निर्णय होईपर्यंत सर्वांनी न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान राखावा, तसेच मालकी किंवा ताब्याचा आभास निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृती टाळाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. न्यायप्रक्रियेवर विश्वास ठेवत शांतता आणि कायद्याचे पालन करणे हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना संविधान, कायदा आणि जनतेप्रती असलेली जबाबदारी निष्पक्षपणे पार पाडण्याचे आवाहन केले. “पदे आणि सत्ता तात्पुरती असतात; मात्र जनतेचा विश्वास, न्यायाची भूमिका आणि इतिहासातील नोंद कायमस्वरूपी असते. त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य, न्याय आणि पारदर्शकतेच्या बाजूने उभे राहणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.

११ व १२ जुलै २०२६ रोजी अड्याळ टेकडी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि संविधानिक मार्गाने जनतेने आपली भूमिका मांडावी, असे आवाहन करताना त्यांनी स्पष्ट केले की, हा संघर्ष कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध नसून संतपरंपरेचा सन्मान, न्याय आणि जनतेच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी आहे.

“आम्ही कायदा हातात घेणार नाही, हिंसेचा मार्ग स्वीकारणार नाही; मात्र अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने ठामपणे उभे राहू. जनतेचा आवाज दाबता येऊ शकतो, पण संपवता येत नाही. सत्याला विलंब होऊ शकतो; परंतु त्याचा पराभव कधीच होत नाही,” असेही सुबोधदादा यांनी ठामपणे सांगितले.

या पत्रकार परिषदेला अविनाश आंबेकर, वासुदेव चोंडके, अपर्णाताई चिडे, बबनराव आणमुळवार, संजय आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

 

आदरणीय जनार्दनजी बोथे गुरुजी, पद्मश्रीचा मान मोठा की इतरांच्या संपत्तीवरील मोह?

0

      श्रीगुरुदेवाच्या प्रत्येक उपसकांना जाहीर खुलपत्र

सस्नेह जय गुरुदेव

आदरणीय जनार्दनजी बोथे गुरुजी,
भारत सरकारने आपल्याला पद्मश्री हा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल करून आपल्या कार्याचा गौरव केला आहे. हा सन्मान केवळ व्यक्तीचा नसून त्यासोबत नैतिक जबाबदारीही येते. त्यामुळे समाजाला आपल्याकडून न्याय, पारदर्शकता आणि सत्यनिष्ठेची अपेक्षा आहे.
मात्र, पंढरपूर येथील ग्रामगीता तत्त्वज्ञान दर्शन मंदिर या मालमत्तेबाबत निर्माण झालेली परिस्थिती अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. संबंधित मालमत्ता ही भू-वैकुंठ समितीची असल्याचा दावा असताना, ती अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची असल्याचे चित्र उभे केले जात असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे गुरुदेवप्रेमी आणि सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

जर या मालमत्तेवर गुरुदेव सेवा मंडळाचा कायदेशीर हक्क असेल, तर तो समाजासमोर अधिकृत कागदपत्रांसह स्पष्ट करावा. परंतु तसा हक्क नसताना मालकीचा दावा किंवा आभास निर्माण होत असेल, तर ते नैतिकदृष्ट्या योग्य ठरत नाही.
या विषयावर न्यायालयीन वाद निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत समाजात सलोखा निर्माण करण्याऐवजी संघर्ष वाढेल अशी कोणतीही भूमिका टाळली पाहिजे. आपण पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्ती आहात; त्यामुळे इतरांच्या संपत्तीबाबत कोणताही संशय निर्माण होणार नाही, अशी भूमिका घेणे अधिक अपेक्षित आहे.

न्यायालयीन वाद म्हणजे केवळ कायदेशीर लढाई नसते; तो समाजाच्या आर्थिक शक्तीचाही चुराडा असतो. सर्वसामान्य नागरिकांनी धर्मकार्यासाठी, समाजहितासाठी आणि विकासासाठी श्रद्धेने दिलेला निधी हा न्यायालयीन खटल्यांमध्ये खर्च होणे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हा पैसा समाजहितासाठी वापरला जाण्याऐवजी आपापली मालमत्ता सिद्ध करण्यासाठी आणि वाचविण्यासाठी खर्च होत असेल, तर त्याचा सर्वांनाच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

शासनाने बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्कारामुळे आज आपली उंची अत्यंत मोठी झाली आहे. कोणतीही मिळकत, कोणतीही मालमत्ता किंवा कोणताही भौतिक लाभ या सन्मानाशी तुलना करू शकत नाही. परंतु जर इतरांच्या मिळकतीवर हक्क मिळविण्याच्या मोहात प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि त्यात अपयश आले, तर समाजात निर्माण झालेली उंची किती खाली येऊ शकते, याचाही विचार व्हायला हवा.

आज आपल्या पद्मश्रीमुळे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्याला नक्कीच नवी गती आणि नवी प्रतिष्ठा लाभणार आहे. परंतु कोणत्याही कार्याची खरी ताकद केवळ गतीत नसते; ती स्वच्छ नीती, पारदर्शकता आणि नैतिकतेत असते. म्हणूनच या गतीसोबत आपली नीतीही तितकीच स्वच्छ आणि निःस्वार्थ असणे आवश्यक आहे.

बघा गुरुजी असे फलक लावणे आम्हाला तरी योग्य वाटते का?

 

पंढरपूर येथील ग्रामगीता तत्त्वज्ञान दर्शन मंदिर असो, मोझरी येथील गुरुकुल आश्रम असो अथवा अड्याळ टेकडीचा प्रश्न असो — या सर्व ठिकाणी आपापसातील वाद समाजासमोर येत आहेत. गुरुदेवांच्या नावाने कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये संघर्ष नव्हे, तर समन्वय आणि सहकार्य दिसणे हीच समाजाची अपेक्षा आहे.

आज प्रश्न केवळ एका मंदिराचा किंवा एका संस्थेचा नाही. प्रश्न आहे गुरुदेवांच्या विचारांचा, समाजातील विश्वासाचा आणि नैतिकतेचा. आपण या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट व सार्वजनिक भूमिका जाहीर करून समाजातील संभ्रम दूर करावा, हीच गुरुदेवप्रेमींची अपेक्षा आहे.

पद्मश्रीचा सन्मान समाजाला जोडण्यासाठी असतो, वाद वाढवण्यासाठी नाही. आपण सत्य, न्याय आणि पारदर्शकतेची बाजू घ्याल, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहोत.

गुरुजी, शेवटी आपण सर्वांनाच हा मोह-माया सोडून ईश्वरचरणी लीन व्हायचे आहे. मग संपत्ती, मालकी आणि वाद यांच्या मोहात पडून आपल्या प्रतिष्ठेला धक्का का लावायचा? आपण आपल्या पद्मश्री सन्मानाची उंची जपावी, गुरुदेवांच्या विचारांना न्याय द्यावा आणि सर्व संस्थांना सोबत घेऊन समाजहिताचे कार्य करावे, हीच नम्र विनंती.

जय गुरुदेव
दिलीप रामदासजी भोयर
सचिव
ग्रामगीता तत्त्वज्ञान दर्शन मंदिर, भू-वैकुंठ समिती, पंढरपूर

शासनाची बंदी झुगारून खडकी येथे HTBT कापूस लागवड; तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळाव्यात शेतकरी संघटनेचा एल्गार

0

राळेगाव, प्रतिनिधी : केंद्र शासनाने यंदाही तणनाशक-प्रतिरोधक HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्याच्या लागवडीला परवानगी न दिल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत राळेगाव तालुक्यातील खडकी येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्याची प्रतिकात्मक लागवड केली. १७ जून रोजी आयोजित “तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळावा”मध्ये शासनाच्या धोरणांवर तीव्र टीका करत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

शेतकरी संघटनेच्या मते, २००८ पासून तणनाशक-प्रतिरोधक HTBT तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. मात्र अद्याप या तंत्रज्ञानाला अधिकृत मान्यता मिळालेली नसल्याने शेतकरी आधुनिक कृषी तंत्रज्ञानापासून वंचित राहत आहेत. शासनाने नवीन तंत्रज्ञानावरील निर्बंध हटवून शेतकऱ्यांना विविध पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी संघटनेची भूमिका आहे.

या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून १० जून रोजी गुजरात सीमेवरील नंदुरबार येथे सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आंदोलनाच्या पुढील टप्प्यात खडकी येथील शेतकरी राजेंद्र झोटिंग यांच्या शेतात शासनाची बंदी झुगारून HTBT बियाण्याची लागवड करण्यात आली. तसेच तुपटाकळी परिसरात सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावर या बियाण्याची लागवड झाल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

मेळाव्यात वक्त्यांनी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर शासनाने घातलेल्या निर्बंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकऱ्यांना कोणते बियाणे वापरायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावे, असे मत व्यक्त करण्यात आले. देशाला कृषी उत्पादनात आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणि आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक असल्याचेही वक्त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप होते. यावेळी अनिल घनवट, प्रज्ञाताई बापट, सीमाताई नरोडे, विजय निवल, मिलिंद दामले, दीपक आनंदवार, ललित बहाळे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

वक्त्यांनी आपल्या भाषणात शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या आर्थिक उन्नतीशिवाय राष्ट्राची खरी प्रगती शक्य नसल्याचे प्रतिपादन केले. तसेच शेतीसमोरील विविध आव्हानांवर मात करण्यासाठी संघटित लढ्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेत नव्याने प्रवेश केलेल्या युवा शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

या कार्यक्रमाला गजानन पारखी, सतीश देशमुख, चंद्रशेखर देशमुख, दशरथ पाटील, आशिष मुसळे, हिम्मतराव देशमुख, बबनराव चौधरी, अक्षय महाजन, गिरीष तुरके, मोहनराव चौधरी, गोपाल भोयर, किशोर झोटिंग, निलेश डवरे, दशरथ काळे, भास्कर पाटील, गजानन कोल्हे, विठ्ठल खोंडे यांच्यासह अकोला, बुलढाणा, नांदेड, वाशीम, चंद्रपूर आदी जिल्ह्यांतील पदाधिकारी, महिला व युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस विभागाकडून PSI सुखदेव अवधूत भोरकडे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजेंद्र झोटिंग यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाची सांगता वज्रमूठ बांधून शेतकरी एकतेची शपथ घेत स्नेहभोजनाने करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचा मुकूटबन येथे निकृष्ट रस्ता बांधकामाविरोधात रास्ता रोको आंदोलन नियमानुसार काम न केल्यास अधिक्षक अभियंता कार्यालयात तीव्र आंदोलनाचा इशारा

News Today

वणी:- मुकूटबन येथील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या निषेधार्थ बुधवार दिनांक २० मे २०२६ रोजी बस स्टँड समोर, मुकूटबन येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सदर आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात पार पडले. आंदोलनामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, रस्ता बांधकामामध्ये निविदेतील अटी व तांत्रिक निकषांचे पालन करण्यात आले नाही. आवश्यक असलेले “Slim Form Paver” न वापरता “Fixed Form Paver” वापरण्यात आले. तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक प्लांट उभारण्यात आले नाही. मिक्सर, व्हायब्रेटर (Vibrator) व मिलिंग मशीन (Milling Machine) यांसारख्या आवश्यक यंत्रसामग्रीचा वापरही करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला.

सदर काम हे नियमबाह्य व निकृष्ट दर्जाचे असून संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमतामुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

यावेळी दोषी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा, उपविभागीय अभियंता मारेगाव व शाखा अभियंता मारेगाव यांच्यावर शासकीय शिस्तभंगाची कारवाई करून कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे, तसेच संबंधित कंत्राटदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत (Black List) टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

तसेच सदर नियमबाह्य रस्ता बांधकाम पूर्णपणे उखडून टाकून निविदेतील नियम व अटींनुसार नव्याने दर्जेदार रस्ता बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी झरी जामणी तालुकाध्यक्ष प्रमोद थेरे, वणी तालुकाध्यक्ष राजू वांढरे, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष किशोर गोंलावार, रामदास पखाले, पुंडलिक मोहितकर, डॉ. सुरेश उदार, प्यारेलाल मेश्राम, मारोती ठावरी, अरविंद तुरणकर, मंगेश गोरे, सुरेश निब्रड, यांचे सह शेकडो नागरिक उपस्थित होते.