दिलीप भोयर (News Today)
वणीत काल एम.डी. (मेफेड्रोन) प्रकरणात झालेल्या कारवाईनंतर वणी शहरातील वास्तव अधिकच भयावह स्वरूपात समोर येत आहे. शहरात सध्या ड्रग्स, गांजा, बनावट दारू आणि बंदी असलेले सुगंधित तंबाखू यांचा अक्षरशः पूर आला असून, हा सगळा अवैध बाजार उघडपणे, निर्भयपणे आणि कोणत्याही भीतीशिवाय सुरू असल्याचे चित्र आहे. या गंभीर गुन्हेगारी प्रकाराला कमळाबाईसोबत छुपा संबंध आल्याचे आरोप सर्रासरित्या केल्या जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून जनमानसात प्रचंड रोष तयार होत आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या नशेच्या जाळ्यात आता केवळ तरुणच नव्हे, तर अल्पवयीन मुलंही ओढली जात आहेत. शहरातील काही भागात लहान मुलं गांजाचा हुक्का ओढताना दिसत असल्याने सामाजिक अध:पतन किती खोलवर गेले आहे, याचा अंदाज येतो. “पुढची पिढी वाचणार तरी कशी?” असा संतप्त सवाल पालक उपस्थित करत आहेत. लोकशाहीत ज्यांना लोक लोकांच्या होता निवडून पाठवीत आहे. ते लोकांना नशेच्या घाईत लोटत आहे. असे आरोप आता उमटायला सुरवात झाली आहे.
दरम्यान, शहराच्या काही भागांमध्ये बनावट दारू तयार करण्याचे कारखानेच सुरू असल्याची चर्चा आहे. ही विषारी दारू बंदी असलेल्या भागात पाठवली जात असून, यामुळे अल्पावधीत मृत्यूच्या घटनाही घडत आहेत. यापूर्वी दारूबंदी विभागाने साठे जप्त करूनही हा काळाबाजार थांबत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एम.डी. ड्रग्सचा वाढता सुळसुळाट हा तर आणखी भयंकर आहे. काल (ता. १८) वणी गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली खरी; पण ही कारवाई केवळ ‘छोट्या माशां’पुरतीच मर्यादित असल्याची टीका जोर धरत आहे. “मोठे मासे कोणाच्या आशीर्वादाने मोकाट फिरत आहेत?” हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.
याशिवाय, शहरभर बंदी असलेला सुगंधित तंबाखूचा खर्रा खुलेआम विकला जात आहे. या विषारी पदार्थामुळे तरुणांचे तोंड अक्षरशः बंद होत आहे, कर्करोगासारखे गंभीर आजार वाढत आहेत, आणि अनेकांना साधे जेवण करणेही कठीण झाले आहे. तरीही या विक्रेत्यांवर कोणतीही प्रभावी कारवाई होताना दिसत नाही.
या सर्व प्रकारांमागे केवळ गुन्हेगारी टोळ्या नाहीत, तर त्यांना मिळणारे राजकीय संरक्षण हा अधिक गंभीर मुद्दा असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. काही सत्ताधारी मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या जवळच्या लोकांना या अवैध धंद्यात ढकलत असल्याचे आरोप होत आहेत. जलद पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी तरुणांना गुन्हेगारीच्या खाईत लोटले जात असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला असून, “उद्घाटनं आणि श्रेयवाद सोडून आता तरी प्रशासन जागं होणार का?” असा थेट सवाल केला जात आहे.
वणी शहर आज अक्षरशः नशेच्या माफियांच्या ताब्यात जात असल्याची भीती व्यक्त होत असून, जर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली नाही, तर येणाऱ्या काळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरील सर्व अवैध्य व बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे कनेक्शन केवळ कमळाबाई सोबत जुडत आहे. त्यामुळे सत्तेतील काही पुढारी स्वार्थी राजकारण तरुणाईला नशेच्या खाईत लोटून आपली राजकीय पोळी भाजून घेत असल्याचे आरोप होत आहे.


