दिलीप भोयर
वणी (प्रतिनिधी) – शहरात एम.डी. (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाचा व्यवसाय जोरात वाढत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले असून, पोलिसांनी आज (ता. १८) रोजी शहरातील देशमुख वाडी परिसरात कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. प्रीतम केशवानी व राहुल ठाकूरवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे कमळाबाई कनेक्शन असल्याचे चर्चेला ऊत आला आहे.
राज्यात ‘झोंबी ड्रग्ज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम.डी.च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वणीसारख्या शहरातही या नशेने शिरकाव केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या अमली पदार्थामुळे मेंदूवर गंभीर परिणाम होऊन मानसिक संतुलन बिघडणे, आक्रमकता वाढणे, हृदयविकाराचा धोका निर्माण होणे आणि व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकणे असे परिणाम दिसून येतात. त्यामुळे तरुणाई थेट विनाशाच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाला आता राजकीय कलाटणी मिळाली असून, अटक केलेल्या आरोपींपैकी एकाचे सत्तेतील कमळाबाईचे संबंध उघड होत असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे.
संबंधित आरोपी हा स्थानिक शहर शाखेतील पदाधिकाऱ्याचा चुलत भाऊ असून, शहराच्या उपाध्यक्ष पदाशी त्याचा जवळचा संबंध असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे “या अमली पदार्थ साखळीमागे राजकीय संरक्षण आहे का?” असा गंभीर सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
त्याच बरोबर यातील एका आरोपीने काही दिवसापूर्वी एका मामा नामक माजी पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाढदिवसाचे बॅनर देखील झडकले होते असे शहरात बोलल्या जात आहे.
यापूर्वीही शिरपूर परिसरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त झाले होते. मात्र, त्या वेळीही ‘मोठे मासे’ हाती लागले नाहीत, अशी टीका झाली होती. सध्याच्या प्रकरणातही केवळ स्थानिक पातळीवरील आरोपींवर कारवाई होत असताना, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अशा गंभीर परिस्थितीत तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर असताना, स्थानिक सत्ताधारी मात्र उद्घाटन सोहळे आणि श्रेयवादाच्या राजकारणात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. रोजगार, व्यसनमुक्ती आणि कायदा-सुव्यवस्था यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी जनतेत पसरली आहे.
“तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात अडकत असताना नेते राजकारणात रमले आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
संपूर्ण घडामोडींमुळे वणी शहरातील वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणातील कमळाबाई कनेक्शन’ नेमके कितपत खरे आहे आणि तपासातून आणखी काय उलगडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



