News Today
वणी नगर परिषद क्षेत्रातील मोकाट फिरणाऱ्या डुकरांबाबत स्थानिक शेतकऱ्यांकडून गंभीर तक्रारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, नगर परिषदेने शहरातील डुकरे पकडून ती थेट मौजा बोर्डा व अन्य ग्रामीण भागात सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे.

या संदर्भात शेतकऱ्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डुकरे जंगल परिसर व शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर धुडगूस घालत आहेत. फळबागा, भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान होत असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, त्रस्त परिस्थितीत दिवस काढत आहे.

शेतकऱ्यांचे पुढे असे म्हणणे आहे की, शहरातून ग्रामीण भागात डुकरे आणून सोडल्याने झालेल्या नुकसानीसाठी नगर परिषद थेट जबाबदार आहे. शेतकऱ्यांचे स्पष्ट मत आहे की, या नुकसानीची पूर्ण जवाबदारी नगर परिषदेकडेच राहील.

निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आली आहे की, त्वरित सर्व डुकरे पकडून ती संबंधित परीसरातून हटविण्यात यावीत, अन्यथा शेतकरी आणखी मोठ्या अडचणीत सापडतील. तसेच नगर परिषद प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांचा हा प्रश्न निकाली न लागल्यास पुढील काळात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. उपसरपंच राजू राजुरकर, सतीश काळे, सचिन वाभिटकर, प्रवीण झाडे, दिनेश ढाले, सतीश राजूरकर, गंगाराम राऊत आदी उपस्थित होते.



