News Today
वणी, २२ सप्टेंबर – वणी उपविभागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी यांसह सर्व हंगामी व नगदी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर संकट ओढवले असून ही बिकट परिस्थिती लक्षात घेता आज तारीख २२ रोजी दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.
या निवेदनातून वणी उपविभागातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी किमान रु. ५०,०००/- मदत तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पंचनामा करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट मदत जमा करण्याचे आदेश द्यावेत, असेही ठामपणे नमूद करण्यात आले.

सोयाबीन झाडांचा हार घालून लक्ष वेधले
या वेळी वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आगळा-वेगळा मार्ग अवलंबला. त्यांनी शेतातून करपलेली सोयाबीन झाडे गोळा करून त्यांचा हार बनवून गळ्यात घालून निवेदन सादर केले. हे दृश्य शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचे प्रतीक ठरले.

दिलीप भोयर व्यक्त भावना
“शेतकरी शेतात धान्य पिकवतो, कष्टाने कुटुंब चालवतो. पण जेव्हा अतिवृष्टीने त्याचे उभे पिक करपून जाते, तेव्हा सरकारला पंचनामा करायला व मदत द्यायला महिने लागतात. पण जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात चुकून गांजाचे रोप आढळले, तर त्याचा पंचनामा दहा मिनिटांत होतो आणि गुन्हाही लगेच दाखल होतो. शेतकऱ्याला गुन्हेगार ठरवणारे प्रशासन तत्पर असते, मग पिकांचे नुकसान झाल्यावर त्याच प्रशासनाला एवढा वेळ का लागतो? शेतकऱ्याचे उभे पीक जळून खाक होत असताना सरकार कुठे आहे? शेतकऱ्याला न्याय देणे ही शासनाची जबाबदारी आहे, ती लगेच पार पाडली नाही तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असे भोयर यांनी ठामपणे सांगितले.

कार्यकर्त्यांची उपस्थिती
या निवेदन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य संघटन सचिव, रज्जाक पठाण, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सूर्यवीर चिकटे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे , तालुका सचिव प्रदीप खोब्रागडे, मंगेश गोरे, कुंड्रा येथील सरपंच विजय ठावरी, अनिल साखरकर,प्यारेलाल मेश्राम व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पक्ष सातत्याने लढा देणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.



