Wednesday, July 29, 2026
Google search engine
Home Blog Page 13

वणी पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत संपन्न; १० गणांसाठी जागावाटप जाहीर

0

News Today 

वणी (प्रतिनिधी) : वणी पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज तारीख १३ रोजी दुपारी १२ वाजता महसूल भवन येथे वणी येथील निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सोडतीत एकूण १० गणांकरिता जागावाटप निश्चित करण्यात आले असून त्यापैकी ५ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यातील सभापतींच्या आरक्षणाची सोडत यवतमाळ येथे काल तारीख ११ रोजी संपन्न झाली असता अनुसूचित जमातीसाठी महिला राखील आहे.

एकूण १,५१,४०९ लोकसंख्येच्या वणी पंचायत समिती अंतर्गत १० गणांमध्ये पुढीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे —

खुला प्रवर्ग (एकूण ५ जागा):
१. चिखलगाव – सर्वसाधारण महिला
२. नांदेपेरा – सर्वसाधारण (पुरुष/महिला)
३. वेल्हाळा (वसाहत) – सर्वसाधारण (पुरुष/महिला)
४. शिरपूर – सर्वसाधारण महिला
५. वागदरा – सर्वसाधारण महिला

अनुसूचित जमाती (ST) – २ जागा:
१. कायर – महिला
२. घोंसा – पुरुष/महिला

अनुसूचित जाती (SC) – १ जागा:
राजूर – पुरुष/महिला

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC/नामप्र) – २ जागा:
१. तरोडा – पुरुष/महिला
२. शिंदोला – महिला

सोडतीदरम्यान निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार निखिल धूळघर आणि पंचायत समिती वणीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर , विवेक पांडे आदी उपस्थित होते.

आरक्षणाची सोडत “मंथन” या पाच वर्षीय बालकाच्या हस्ते पार पडली. बालकाने उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत बॉक्समधून चिट्ठ्या काढून आरक्षण ठरविले.

यावेळी सर्व गणनिहाय मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या असून, नागरिकांना त्या तपासून आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आजच आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख असल्याचे निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केले.

वणी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ही सोडत प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यवतमाळ चे पॅराविधी स्वयंसेवक. ऍड. वासुदेव विधाते यांची राष्ट्रीय परिषदेसाठी निवड

0

News Today 

वणी :- यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत पॅरा विधी स्वयंसेवक ऍड. वासुदेव लक्ष्मण विधाते यांची ८ व ९ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथील आयोजित राष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून राज्य पातळीवर निवड करण्यात आली आहे.

वासुदेव विधाते यांच्या उत्कृष्ट कामामुळे त्यांचे नाव या राष्ट्रीय परिषदेसाठी नामनिर्देशित केले

होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी या नामांकनाची दखल घेऊन राज्याच्या वतीने परिषदेला हजर राहण्यासाठी त्यांची निवड केली आहे.

‘विधी सेवा वितरण यंत्रणा बळकट करणे’ या विषयावर ऑडिटोरियम हॉल,

अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग कॉम्प्लेक्स, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे सदर परिषद पार पडणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दीपक दाभाडे यांनी वासुदेव विधाते यांना पत्राद्वारे कळविली आहे. या यशाचे प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि सचिवांनी कौतुक केले आहे.

गुरुकुंज मोझरी येथे युवक व महिला संमेलनाने गाजवला दिवस

0

युवक व महिला संमेलनाने गाजवला दिवस

News Today 

गुरुकुंज मोझरी प्रतिनिधी – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७व्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज मोझरी येथे आयोजित पालखी पदयात्रा शिबिरात युवक व महिलांसाठी विविध विचारप्रवर्तक सत्रांचे आयोजन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या सत्रांनी युवक-युवती आणि महिलांच्या सहभागामुळे मोझरी नगरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.संघटनशक्तीवर युवकांचे आत्मचिंतनपहिल्या सत्रात “संघटनशक्ती” या विषयावर सुरेश देसाई, भारत भुसकडे, मनोज चौबे, पुरुषोत्तम थुटे आणि मुकुंद पुणसे यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामगीता’ ग्रंथातील “संघटनशक्ती” अध्यायाचा संदर्भ देत वक्त्यांनी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी युवकांनी एकत्रित होऊन कार्य करण्याचे आवाहन केले. युवकांनी समाजातील सकारात्मक बदलासाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचे मत सर्वांनी मांडले.

या सत्राचे सूत्रसंचालन गुरुकुलचे संपर्कप्रमुख आणि युवा व्याख्याते तुलसीदास झुंजुरकार यांनी केले.महिलांसाठी प्रेरणादायी सत्रयानंतर महिलांसाठी आयोजित विशेष सत्राने वातावरण भारावले. या महिला संमेलनात सुश्री रेखाताई बुराडे, सौ. बेबीताई काकडे, कविताताई येनोरकर, निर्मलाताई खडतकर आणि सौ. सुवर्णाताई पिंपळकर यांनी स्त्रीशक्तीचा गौरव करत प्रभावी विचार मांडले.

“महिलोन्नती” या ‘ग्रामगीता’ अध्यायातील तत्वज्ञानाचा उल्लेख करत वक्त्यांनी समाजातील महिलांच्या भूमिकेचा आणि त्यांच्या आत्मभानाचा गौरव केला.कीर्तनकार जयश्रीताई गावतुरे यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले की, “पूर्वी चूल-मूल यापुरत्या चौकटीत राहणारी महिला आज शिक्षण, समाजकार्य, विज्ञान आणि अंतराळ संशोधनापर्यंत झेपावली आहे.” सत्राचे प्रास्ताविक छायाताई मानव यांनी केले.

ग्रामीण स्वयंरोजगारावर चर्चाशिबिरातील आणखी एका सत्रात “ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील” या विषयावर साक्षीताई पवार, रोशन ठाकरे, समीर कोरे, विकास बोरवार, प्रशांत सुरोशे आणि प्रमोद बोराळकर यांनी विचार मांडले. या सत्रात ग्रामविकासासाठी स्थानिक साधनसंपत्तीचा प्रभावी वापर, सूक्ष्मउद्योगांची संधी आणि उद्योजकतेला चालना यावर चर्चा झाली. सूत्रसंचालन अमर वानखडे यांनी केले.

ध्यानातून आत्मसंवादाचे दर्शनदरम्यान, गुरुकुंज मोझरीत सुरू असलेल्या ग्रामगीता तत्त्वज्ञान आचार महायज्ञ व पालखी पदयात्रा शिबिराच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सामुदायिक ध्यानाने झाली. “ध्यान” या विषयावर चिंतन व्यक्त करताना आत्मनुसंधान अड्याळ टेकडीचे संचालक सुबोध दादा म्हणाले, “ध्यान ही फक्त आसनप्रक्रिया नसून आत्म्याशी संवाद साधण्याची दिव्य साधना आहे.

ती माणसाला अंतःकरणाशी जोडते आणि मनावर ताबा मिळवण्याचे खरे अध्यात्म शिकवते.” त्यांनी पुढे आवर्जून सांगितले की, “जेव्हा मन स्थिर होते तेव्हाच विचार शुद्ध होतात आणि आत्मा समाधानी होतो.”गुरुकुंज मोझरी येथे देवभूमीप्राय वातावरणात सुरू असलेल्या या विविध उपक्रमांमुळे तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आणि ग्रामगीतेच्या तत्त्वज्ञानाचा सुगंध समाजमनात दरवळत आहे.

चिखलगाव येथे अतीवृष्टी व महापुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी नागरिकांचा जनसागर — अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाठविला

0

News Today 

चिखलगाव, ता. वणी (प्रतिनिधी)

यावर्षीच्या अतीवृष्टी व महापुरामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील पिके, जनावरे तसेच घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. या संकटग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी वणी तालुक्यातील चिखलगाव येथील आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळ, साई दर्पण ग्रुपजगन्नाथ बाबा योग ग्रुप यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत मदतफेरीचे आयोजन करण्यात आले.

या मदतफेरीदरम्यान मंडळातील कार्यकर्त्यांनी चिखलगाव परिसरातील साधनकरवाडी, ओमनगर, मंगलम पार्क या भागात घरोघरी जाऊन नागरिकांना मदतीसाठी आवाहन केले. नागरिकांनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांचा निधी सढळ हाताने दिला. गोळा झालेला हा निधी थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठविण्यात आला, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली.

या उपक्रमासाठी आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष सुधाकरराव गारघाटे तसेच सदस्य रमेशभाऊ सुंकुरवार, लक्ष्मणराव ईद्दे, दिगंबर गोहोकार, अरुण झाडे, जयप्रकाश राजुरकर, वसंतराव उपरे, नेताजी मोरे, परशराम ढुमणे, संजय पोटदुखे, सुधीर ठेंगणे, दिगंबर मुजोरिया, नरेंद्र धोबे, दिनेशकुमार श्रीवास्तव, विठ्ठलराव वैद्य, सुरेश रायपूरे, विठ्ठलराव होले, विजय गौरकार व देशमुख साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले.

या मदतफेरीच्या यशस्वी आयोजनामुळे चिखलगाव व परिसरातील नागरिकांमध्ये सामाजिक एकतेचा आणि संवेदनशीलतेचा सुंदर संदेश गेला आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सहानुभूतीची भावना जागवून मदतीचा हात पुढे करणाऱ्या या मंडळाचे वणी परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

—✍️ विशेष प्रतिनिधी, चिखलगाव

वणीतील शिवसैनिकांची आज सुटका; यवतमाळहून वणीपर्यंत शेतकऱ्यांचा जल्लोषात स्वागत सोहळा, आ. देरकरांचा सरकारवर निशाणा

0

News Today 

वणी (प्रतिनिधी): वणीतील आंदोलन प्रकरणात अटकेत असलेल्या शिवसैनिकांना अखेर न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर आज (१० ऑक्टोबर) सकाळी त्यांची सुटका करण्यात आली. यवतमाळ कारागृहातून मुक्त झाल्यानंतर वणीकडे परतताना अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी आणि समर्थकांनी या शिवसैनिकांचे अभूतपूर्व स्वागत केले. ओला दुष्काळ घोषित करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या या कार्यकर्त्यांच्या सुटकेनंतर परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठीचे आंदोलन

६ ऑक्टोबर रोजी वणी येथे झालेल्या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हाल मांडत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आंदोलनाच्या वेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या ताफ्याला शिवसैनिकांनी अडवून रास्ता रोको केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल करत कार्यकर्त्यांना अटक केली.

जामीन सुनावणीत ऍड. विप्लोव तेलतुंबडे यांची प्रभावी बाजू

९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील ऍड. विप्लोव तेलतुंबडे यांनी सर्व अटकेत असलेल्या शिवसैनिकांची बाजू ठामपणे मांडली. त्यांनी न्यायालयात सांगितले की,

“हे आंदोलन पूर्णपणे शांततेत झाले होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनाला गुन्हेगारी कृत्य म्हणून रंगवणे हा सरळ अन्याय आहे.”
न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.

आजची सुटका आणि जल्लोषमय स्वागत

आज सकाळी यवतमाळ कारागृहातून शिवसैनिकांची सुटका झाल्यानंतर त्यांचा मार्ग यवतमाळ–कळम–राळेगाव–खैरी–वडकी–मार्डी–नांदेपेरा–वणी असा होता. या मार्गावरील प्रत्येक गावात शेतकरी आणि नागरिकांनी फुलांच्या वर्षावात व घोषणांच्या गजरात शिवसैनिकांचे स्वागत केले. “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे,” अशा घोषणा वातावरणात घुमत होत्या. यावरून सरकार प्रति शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसून येत होता.

आघाडीवर असलेले कार्यकर्ते

या आंदोलनात आणि सुटकेनंतरच्या स्वागत सोहळ्यात शिवसेना (उबाटा गट) चे जिल्हाप्रमुख संजय निखाडे, तालुकाप्रमुख संतोष मारेगाव, तालुकाप्रमुख पुरुषोत्तम बुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काकडे, माजी नगरसेवक राजू तुरंकर, तसेच प्रेमा धानोरकर, गणपत लेडांगे, भगवान मोहिते, जगन जुनगरी, संकेत मोहिते, मोहम्मद अन्सार, मनीष बत्रा, दिवाकर कोल्हेकर आदींचा समावेश होता.

शिवसेनेचा सरकारवर निशाणा

सुटकेनंतर स्थानिक शिवसेना आमदार संजय दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की,—“शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला, पण अखेरीस सत्याचा विजय झाला. शिवसेना शेतकऱ्यांसाठीचा लढा अधिक जोमाने लढत राहील.”

जनतेचा विजय, शेतकऱ्यांचा अभिमान

या संपूर्ण घटनेने वणी तालुक्यात उत्साह आणि अभिमानाची लाट उसळली आहे. शेतकरी, नागरिक आणि शिवसेना समर्थक सर्वांनी मिळून हा दिवस “शिवसैनिकांचा विजय दिवस” म्हणून साजरा केला.

 

मोहदा गावात अवैध खदान उत्खनन पुन्हा सुरू; ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट

0

News Today 

वणी (प्रतिनिधी)  :- तालुक्यातील मोहदा गावातील गट क्र. 283 मधील खदान पुन्हा अवैध पद्धतीने सुरू झाल्याने ग्रामस्थांत संताप आहे. या खदानाची लीज संपली असूनही ब्लास्टिंग सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.धोका वाढला, ग्रामपंचायत मौन आहे.

गावापासून अवघ्या 100 मीटरवर चालणाऱ्या ब्लास्टिंगमुळे घरांना भेगा पडत आहेत. DGMS नियमानुसार 500 मीटर ‘डेंजर झोन’ ठेवणे बंधनकारक असतानाही नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. “कधी घर कोसळेल ही भीती सतावत आहे”, अशी ग्रामस्थांची खंत.कायद्याचे उल्लंघनलीज संपल्यानंतरही सुरू काम हे MMDR Act, 1957 व पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 चे सरळ उल्लंघन आहे.

तसेच स्फोटकांचा पुरवठा व वापर Explosives Act, 1884 अंतर्गत गुन्हा ठरतो. मात्र स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत यांचे मौन संशयास्पद ठरत आहे.ग्रामस्थांचा इशारा“अवैध उत्खनन थांबवा, नाहीतर आंदोलन करू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. रद्द झालेल्या लीजनंतरही खदान कशा परवानगीवर चालू आहे, हा प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत.

कायर मार्गावर जनतेचा संताप — राष्ट्रवादीचे जोडा मारा आंदोलन पेटले, पेटुर येथे उखडलेल्या रस्त्यावर जनतेचा उद्रेक,अधिकाऱ्यांच्या प्रतिमांना जोडे वर्षाव

0

News Today 

वणी :- तालुक्यातील कायर मार्ग क्रमांक ३१९ वरील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाविरोधात जनतेचा संताप उसळला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे आज पेटुरजवळील १८ नंबर पुलाजवळ “जोडा मारा आंदोलन” करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

नागरिकांचा थेट सवाल — “रस्त्यावरचा पैसा गेला कुठे?”

उखडलेले बिटुमिन, खोल खड्डे आणि सततच्या अपघातांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता बांधकामाचा DLP कालावधी अद्याप शिल्लक असतानाही दुरुस्ती सुरू न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी थेट जनतेचा प्रश्न उचलला — “अधिकाऱ्यांनी रस्ता बनवला की लुटला?”

“रस्ते खाणारे राक्षस” म्हणत अधिकाऱ्यांच्या प्रतिमांना जोडे वर्षाव

संतप्त कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अभियंत्यांच्या प्रतिमा फलकावर लावून त्यांना “रस्ते खाणारे राक्षस” ठरवले. त्यानंतर जोडे आणि चप्पलांचा वर्षाव करत प्रतीकात्मक निषेध व्यक्त झाला. या दृश्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.

घोषणाबाजीने पेटुर परिसर दणाणला

दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बॅनर व फलक जप्त केले. मात्र आंदोलनकर्त्यांनी “रस्ते दुरुस्त करा!”, “जनतेचा पैसा खाल्ला का?”, “अधिकाऱ्यांच्या चौकशीशिवाय थांबणार नाही!” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

आंदोलनाचे नेतृत्व दिलीप भोयर यांच्या हाती

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केले. त्यांच्यासोबत राज्य संघटन सचिव रज्जाक पठाण, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, युवा नेता सूर्यवीर चिकटे, प्रमोद थेरे, प्रदीप खोब्रागडे, रामदास पखाले, मंगला मडचापे,  वसंत नावडे, गुरु गजलवार, कुणाल मिलमिले, पंकज आवारी, स्वप्निल मडावी, किशोर गोंलावर, यांसह शेकडो पुरुष व महिला कार्यकर्ते सहभागी झाले.

आंदोलनातील ठोस मागण्या

पूर्ण मार्ग नव्याने उच्च दर्जात तयार करण्यात यावा.

निकृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी.

दुरुस्ती न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे.

“रस्त्याची दुरुस्ती नाही, तर आंदोलन आणखी भडकणार”

नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला की, या मार्गावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांचे व वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. तातडीने दुरुस्ती सुरू न केल्यास पुढचे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात उभे राहील.

चर्चेनंतर आंदोलन शांततेत संपन्न

दोन तास चाललेल्या या जोडा मारा आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मागण्या ग्राह्य धरण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी शांततेत आंदोलन मागे घेतले.

बघा व्हिडिओ 👇

https://www.instagram.com/reel/DPlqhC0iIKm/?igsh=NjZ2YWRsaXhhaTBq

वणीतील शिवसैनिकांना अखेर जामीन मंजूर; उद्या होणार सुटका — ऍड. विप्लोव तेलतुंबडे यांची प्रभावी बाजू

0

News Today 
 वणी :- येथील आंदोलन प्रकरणात अटकेत असलेल्या जिल्हाप्रमुख संजय निखाडेसह १२ शिवसैनिकांना अखेर न्यायालयाकडून आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. तथापि, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यांच्या सुटकेची प्रक्रिया उद्या (१० ऑक्टोबर) सकाळी होणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांना आजची रात्र पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत काढावी लागणार आहे.

 पार्श्वभूमी : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

यवतमाळ जिल्ह्यात सलग पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी आणि जिल्ह्याला ओला दुष्काळ घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे ६ ऑक्टोबर रोजी वणी येथे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या ताफ्याला शिवसैनिकांनी अडवून रास्ता रोको केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली होती.

 न्यायालयीन विलंबामुळे संताप

या प्रकरणातील जामीन सुनावणी ८ ऑक्टोबर रोजी निश्चित करण्यात आली होती, मात्र अहवाल सादर करणारे पोलिस अधिकारी न्यायालयात गैरहजर राहिल्याने सुनावणी तहकूब झाली. त्यामुळे शिवसैनिकांना अजून दोन दिवस कोठडीतच रहावे लागले. या घटनेमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

आजची सुनावणी : ऍड. विप्लोव तेलतुंबडे यांची जोरदार बाजू

आज (९ ऑक्टोबर) रोजी झालेल्या सुनावणीत अटकेत असलेल्या सर्व शिवसैनिकांची बाजू ज्येष्ठ वकील ऍड. विप्लोव तेलतुंबडे यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांनी न्यायालयात नमूद केले की,
“हे आंदोलन पूर्णपणे शांततेत झाले होते. कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे राजकीय दबावाखालील आहेत. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या व्यक्तींना गुन्हेगार ठरवणे अन्यायकारक आहे.” न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून अखेर सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.

उद्या सकाळी सुटकेची प्रक्रिया

न्यायालयीन आदेशाची औपचारिकता आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर अटकेत असलेल्या शिवसैनिकांची उद्या (१० ऑक्टोबर) सकाळी सुटका होणार आहे. वणीतील शिवसैनिकांचे नातेवाईक आणि समर्थक यासाठी मोठ्या संख्येने न्यायालय परिसरात उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शिवसेनेचा आरोप कायम

या प्रकरणात शिवसेनेच्या नेत्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. “शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या आंदोलनावरून आमच्या कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. पण सत्याचा विजय झाला,” असे वक्तव्य स्थानिक शिवसेना आमदार संजय दरेकर यांनी केले.

वणीतील शिवसैनिकांना अखेर जामीन मंजूर झाला असून, त्यांची सुटका उद्या सकाळी होणार आहे. ऍड. विप्लोव तेलतुंबडे यांनी न्यायालयात त्यांची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडल्याने कार्यकर्त्यांना न्याय मिळाला आहे.

श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुलात पालखी पदयात्रा शिबिराचा भक्तिमय प्रारंभ,शिदोरी महाप्रसादाची प्रेरणादायी परंपरा

0

News Today 

गुरुकुंज मोझरी :— राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुलात ग्रामगीता तत्त्वज्ञान महायज्ञ व पालखी पदयात्रा शिबिर या पवित्र महोत्सवाची भक्तिमय सुरुवात झाली. ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या तीन दिवसीय आध्यात्मिक शिबिरातून समाजजागृती, मूल्यसंस्कार आणि ग्रामगीता तत्त्वज्ञानाचा प्रसार करून ग्रामविकासाचा संदेश दिला जाणार आहे.

आज सकाळपासूनच गुरुकुल परिसरात अध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध गावांमधून निघालेल्या पालख्यांचे आगमन सुरू असून आत्मानुसंधान भुवैकुंठ अड्याळ टेकडी येथील पालखीचे स्वागत भक्तिभाव आणि जल्लोषात करण्यात येणार आहे. टाळमृदुंगांच्या निनादात परिसर भक्तिमय झाला असून भाविकांच्या जयघोषात उत्सवाला प्रारंभ झाला आहे.

संध्याकाळी ६.३० वाजता सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात होईल. यावेळी श्री नामदेवराव गव्हाळे महाराज “प्रार्थनेवरील चिंतन” सादर करतील. प्रार्थना संपल्यानंतर शिरजगाव येथून आणलेला शिदोरी महाप्रसाद सर्व भक्तांना वितरित केला जाईल. रात्री ७ ते ११ या वेळेत होणाऱ्या कीर्तन कार्यक्रमात बाल कीर्तनकार आर्यन सुधीर निस्ताने, मा. श्रीकृष्ण महाराज झगेकर, मा. श्रीकृष्ण महाराज आखरे, मा. नामदेव महाराज माकोडे आणि मा. सुरेश महाराज उदार यांच्या कीर्तनातून ग्रामगीता तत्त्वज्ञान मांडले जाईल.

शिदोरी महाप्रसादाची प्रेरणादायी परंपरा

शिदोरी महाप्रसाद हा पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या संकल्पनेतून गेले ५० वर्ष अखंड सुरू असलेला भक्तीचा उपक्रम आहे. या परंपरेत प्रत्येक गावातील भाविक स्वतःहून योगदान देतात, आणि त्या सहकार्यतून “सहकार्य हाच ईश्वरसेवेचा पाया” हा सुंदर संदेश समाजात पोहोचविला जातो.

पहिल्या दिवशी शिरजगाव मोझरी आणि दुसऱ्या दिवशी शिवणगाव या ठिकाणांहून गोळा झालेली शिदोरी गुरुकुलात आणून सर्व पदयात्री व भाविकांना प्रसादरूपाने दिली जाते. अनेकांच्या योगदानातून साकारलेली ही भक्तीची चव आता गुरुकुलाची ओळख बनली आहे.

श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुलाचे संपर्कप्रमुख श्री तुलसीदास झुंजुरकार यांनी सांगितले, “राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार हाच या महोत्सवाचा प्राण आहे. हा केवळ धार्मिक सोहळा नसून आत्मजागृती आणि समाजप्रबोधनाची वाटचाल आहे.”

या महोत्सवात गुरुदेव भक्त, ग्रामस्थ, महिला मंडळे व युवक संघटनांचे अमूल्य सहकार्य लाभत असून त्यांच्या अथक प्रयत्नांतून या अध्यात्मिक परंपरेला दिव्यता प्राप्त होत आहे

चिखलगावमध्ये सार्वजनिक जागांवर अतिक्रमणाचा कहर; ग्रामस्थ संतप्त, गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

0

News Today 

वणी (प्रतिनिधी):
तालुक्यातील चिखलगाव येथे सार्वजनिक जागांवर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांनी याविरोधात जोरदार आक्रोश व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत गटविकास अधिकारी, पंचायत समिती वणी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तात्काळ अतिक्रमण हटविण्याची आणि संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


सार्वजनिक रस्ते, गटारे आणि पायवाटा अडथळ्यांत

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्ते, पादचारी मार्ग आणि गटारांवर अवैध बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले असून, वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात या अतिक्रमणांमुळे गटारांमधील पाणी साचते, दुर्गंधी पसरते आणि गावात अस्वच्छता निर्माण होते.
“सार्वजनिक सोयी-सुविधांचा वापर अतिक्रमण करणाऱ्यांच्या ताब्यात गेला आहे. आम्हा सामान्य नागरिकांचे जीवनच त्रस्त झाले आहे,” असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


ग्रामसेवकांच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांची टीका

ग्रामस्थांनी सांगितले की, त्यांनी वेळोवेळी ग्रामसेवक व ग्रामपंचायत प्रशासनाकडे तोंडी तसेच लेखी तक्रारी दिल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
“ग्रामसेवकांनी या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे अतिक्रमण करणाऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळाले असून, ग्रामस्थांचा संताप वाढत आहे,” असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनासोबत पूर्वीच्या तक्रारींच्या प्रती देखील जोडण्यात आल्या आहेत.


ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या

ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केलेल्या निवेदनात खालील मागण्या मांडल्या आहेत:

  1. चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अतिक्रमणांचे सर्वेक्षण करून ती तात्काळ हटवावीत.

  2. ग्रामपंचायत प्रशासनास अतिक्रमण हटविण्यासाठी स्पष्ट आदेश द्यावेत.

  3. या प्रकरणात निष्क्रियता दाखविल्याबद्दल संबंधित ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाई करावी.

ग्रामस्थांची एकजूट आणि अपेक्षा

या निवेदनावर रोहन वरारकर, वसंता डवरे, मनोज नवले, रोशन ढुमणे, द्रविड रांगणकर, चेतन खापणे, प्रमोद गौरकार, अक्षय दडांजे, प्रशांत मोहुर्ले, कृष्णा अणे, साहिल कुडमेथे, भगवान वाभिटकर, आर्यन ढुमणे यांसह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ग्रामस्थांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आता गटविकास अधिकारी यावर कोणती भूमिका घेतात आणि अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया केव्हा सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हे केवळ गावाच्या सौंदर्यावर परिणाम करणारे नाही, तर लोकांच्या आरोग्य, सुरक्षेशी आणि हक्कांशी निगडित प्रश्न आहे. प्रशासनाने यावर तात्काळ व ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे.