News Today
गुरुकुंज मोझरी :— राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुलात ग्रामगीता तत्त्वज्ञान महायज्ञ व पालखी पदयात्रा शिबिर या पवित्र महोत्सवाची भक्तिमय सुरुवात झाली. ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या तीन दिवसीय आध्यात्मिक शिबिरातून समाजजागृती, मूल्यसंस्कार आणि ग्रामगीता तत्त्वज्ञानाचा प्रसार करून ग्रामविकासाचा संदेश दिला जाणार आहे.
आज सकाळपासूनच गुरुकुल परिसरात अध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध गावांमधून निघालेल्या पालख्यांचे आगमन सुरू असून आत्मानुसंधान भुवैकुंठ अड्याळ टेकडी येथील पालखीचे स्वागत भक्तिभाव आणि जल्लोषात करण्यात येणार आहे. टाळमृदुंगांच्या निनादात परिसर भक्तिमय झाला असून भाविकांच्या जयघोषात उत्सवाला प्रारंभ झाला आहे.
संध्याकाळी ६.३० वाजता सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात होईल. यावेळी श्री नामदेवराव गव्हाळे महाराज “प्रार्थनेवरील चिंतन” सादर करतील. प्रार्थना संपल्यानंतर शिरजगाव येथून आणलेला शिदोरी महाप्रसाद सर्व भक्तांना वितरित केला जाईल. रात्री ७ ते ११ या वेळेत होणाऱ्या कीर्तन कार्यक्रमात बाल कीर्तनकार आर्यन सुधीर निस्ताने, मा. श्रीकृष्ण महाराज झगेकर, मा. श्रीकृष्ण महाराज आखरे, मा. नामदेव महाराज माकोडे आणि मा. सुरेश महाराज उदार यांच्या कीर्तनातून ग्रामगीता तत्त्वज्ञान मांडले जाईल.
शिदोरी महाप्रसादाची प्रेरणादायी परंपरा
शिदोरी महाप्रसाद हा पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या संकल्पनेतून गेले ५० वर्ष अखंड सुरू असलेला भक्तीचा उपक्रम आहे. या परंपरेत प्रत्येक गावातील भाविक स्वतःहून योगदान देतात, आणि त्या सहकार्यतून “सहकार्य हाच ईश्वरसेवेचा पाया” हा सुंदर संदेश समाजात पोहोचविला जातो.
पहिल्या दिवशी शिरजगाव मोझरी आणि दुसऱ्या दिवशी शिवणगाव या ठिकाणांहून गोळा झालेली शिदोरी गुरुकुलात आणून सर्व पदयात्री व भाविकांना प्रसादरूपाने दिली जाते. अनेकांच्या योगदानातून साकारलेली ही भक्तीची चव आता गुरुकुलाची ओळख बनली आहे.
श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुलाचे संपर्कप्रमुख श्री तुलसीदास झुंजुरकार यांनी सांगितले, “राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार हाच या महोत्सवाचा प्राण आहे. हा केवळ धार्मिक सोहळा नसून आत्मजागृती आणि समाजप्रबोधनाची वाटचाल आहे.”
या महोत्सवात गुरुदेव भक्त, ग्रामस्थ, महिला मंडळे व युवक संघटनांचे अमूल्य सहकार्य लाभत असून त्यांच्या अथक प्रयत्नांतून या अध्यात्मिक परंपरेला दिव्यता प्राप्त होत आहे



