Wednesday, July 29, 2026
Google search engine
Home Blog Page 6

चिलई शिवारात कोंबडा बाजाराला ऊत , अवैध धंद्यांमुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण, मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत अनेक बेकायदेशीर व्यवसायाला मिळत आहे चालना :- नागरिकांचा आरोप, पोलिसांचे उडवा उडविचे उत्तर

0

News Today

वणी :- मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतील चिलई शिवार परिसरात सध्या अवैध कोंबडा बाजार जोमात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या कोंबडा बाजारात केवळ कोंबड्यांच्या झुंजीच नव्हे, तर सर्रास अवैध दारू विक्री आणि पैशांवर आधारित झेंडीमुंडीचा जुगार खेळला जात असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या बाजारात कोंबड्यांच्या पायांना धारदार शस्त्र (ब्लेड/सुरी) बांधून त्यांना एकमेकांशी झुंजवले जाते. कोंबडे गंभीर जखमी होईपर्यंत किंवा मृत्युमुखी पडेपर्यंत ही अमानुष झुंज सुरू ठेवली जाते. या झुंजींवर हजारो ते लाखो रुपयांची शर्यत लावली जात असल्याने हा प्रकार सरळसरळ जुगाराच्या कक्षेत मोडतो.

या अवैध बाजारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल होत असून, काही समाजकंटक यामध्ये सक्रिय सहभाग घेत असल्याचे दिसून येते. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा कथित आर्थिक ‘चिरीमिरी’मुळेच हा अवैध प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. यामध्ये विशेषतः सर्वसामान्य शेतकरी व शेतमजुरांची मुले आर्थिक आमिषाला बळी पडून या जुगारात ओढली जात असून, अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.

या अवैध व्यवसायाचा दुष्परिणाम संपूर्ण परिसरावर होताना दिसत आहे. चोऱ्या, मारहाणीच्या घटना वाढल्या असून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्येही वाढ झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दारू, जुगार आणि हिंसाचार यामुळे परिसरातील सामाजिक शांतता धोक्यात आली आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या अवैध कोंबडा बाजारावर तातडीने बंदी घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नियमित पोलीस गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

जर वेळीच कठोर पावले उचलली गेली नाहीत, तर या अवैध धंद्यामुळे भविष्यात आणखी गंभीर सामाजिक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत पोलिस स्टेशन मुकुटबनशी संपर्क साधला असता तेथील पोलिस कर्मचारी दिपक ताटे यांनी असे सांगितले की त्या बीटचे जमादार दिलीप जाधव असून पोलिस निरीक्षक व कोंबडा बाजाराचा कोणताही संबंध नाही. बीट जमादार यांनी परस्पर सुरू केला असेल त्यामुळे आम्हाला कोणतीही माहिती नाही असे उडवा उडविचे व बेजबदारीचे उत्तर दिले.

मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत अनेक बेकायदेशीर व्यवसायाला आला मिळत आहे चालना

मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावांमध्ये खुलेआम सर्रासरित्या अवैध्य देशी दारूची विक्री तसेच वरली मटका आणि अवैध वाळू वाहतूक चालवल्या जात आहे त्यातच हा वरून कोंबडा बाजार भरून परिसरातील कायदा सुव्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित केला जात आहे. या अवैध व्यवसायाला नेमकं पाठीशी कोण घालत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून केला जात आहे.

 

ज्येष्ठ पत्रकार रवी ढुमने यांच्या आत्महत्येचे कोडे उलगडले, डायरीतील कर्ज व फसवणुकीतील त्रासाच्या नोंदी व RSS चे विक्की नानवाणी यांच्यावर गंभीर आरोप व्हॉट्सॲप संदेश उघड; आत्महत्येप्रकरणी तपासाला गती

0

News Today 

वणी :- येथील ज्येष्ठ पत्रकार रवी ढुमने यांच्या आत्महत्येप्रकरणी आज महत्त्वाची माहिती समोर आली असून, त्यांच्या वैयक्तिक डायरीत केलेल्या नोंदी व मोबाईलवरील व्हॉट्सॲप संदेशांमुळे या घटनेला नवे वळण मिळाले आहे. RSS चे कार्यकर्ते विक्की नानवानी यांनी फसवणूक केल्याचे आरोप केले आहे.

कुटुंबीयांना रवी ढुमने यांच्या घरातून त्यांची वैयक्तिक डायरी सापडली असून, त्यामध्ये शेतीवरील कर्ज व्यवहार आणि फसवणुकीबाबत तणाव असल्याचा उल्लेख आढळून आल्याची माहिती आहे. डायरीतील नोंदींमध्ये त्यांनी एका व्यक्तीचे नाव नमूद करत, आपण आर्थिक अडचणीत सापडलो असून मानसिक दबावाखाली असल्याचे संकेत दिल्याचे सांगितले जात आहे.

रवी ढुमणे यांच्या डायरीतील नोंदी सापडल्याने त्यांचा मुलगा नयन आनंदराव उर्फ रवी ढुमणे यांनी  विक्रम उर्फ विक्की नानवाणी, सुमित रामचंद्र नानवाणी, राजू राजया बालगोणीवार, योगेश रामचंद्र नानवाणी, श्रीनिवास राजा या बालगोनीवार यांचे विरोधात पोलिसात तक्रार सादर केली आहे.

तसेच त्यांच्या मोबाईल फोनमध्ये विक्की उर्फ विक्रम नानवानी यांना पाठवलेले काही व्हॉट्सॲप संदेश पोलिसांच्या हाती लागले असून, त्या संदेशांमध्ये शेतीच्या कर्जाच्या व्यवहारासंदर्भात नाराजी, तक्रार आणि मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित संदेश व डायरीतील नोंदी पोलिसांकडून तपासाअंती पडताळून पाहिल्या जात आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवी ढुमने यांनी आर्थिक व्यवहारामुळे आपण अडचणीत आल्याचे आणि त्याचा मानसिक परिणाम झाल्याचे या लिखाणातून व्यक्त केले असल्याचे समजते. मात्र, हे सर्व उल्लेख प्राथमिक स्वरूपाचे असून, त्यावरून कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.

या प्रकरणात वणी पोलीस डायरी, मोबाईल संदेश, कॉल रेकॉर्ड्स तसेच संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी करीत असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही प्रकार घडला आहे का, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे वणी शहरात तसेच पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली असून, सत्य लवकरात लवकर समोर यावे, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. 

त्याबाबत विक्की नानवाणी वांनी विचारणा केली असता सदर शेतीच्या विक्री प्रकरणी परवानगी होणे बाकी होते म्हणून त्यांनी शेत मार्गेज करून पैसे दिले अशी माहिती दिली आहे.

नगरपरिषदेची ट्यूबवेल बंद पाडून खासगी बोअरवेलचा घाट; जनतेच्या पाण्यावर गदा, वणीत संतापाचा उद्रेक कमळाबाईच्या माजी नगरसेवकाचा महाप्रताप ; माजी आमदारांच्या ‘आशीर्वादाने’ नगरपरिषदेवर दबाव टाकल्याचा नागरिकांचा दावा “मामा मेहेरबान तो नगरसेवक पैलवान” अशी ओरड होत आहे

0

News Today 

वणी : वणी शहरातील टांगोर चौक परिसरात नगरपरिषदेची तब्बल १५ ते १७ वर्षे सुरू असलेली सार्वजनिक ट्यूबवेल बेकायदेशीरपणे बंद पाडून त्या ठिकाणी खासगी बोअरवेल खणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे गणेशपूर रोड, उतारी भाग, रंगारीपुरा, सर्वोदय चौक, भोईपुरा, गांधी चौक व सती घाट परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून जनतेत तीव्र संताप उसळला आहे.

“मामा मेहेरबान तो नगरसेवक पैलवान अशी म्हण आता शहरात रंगताना दिसून येत आहे. भाजपच्या या माजी नगरसेवकाने प्रचंड मोठा महाप्रताप घडविल्याने जनमानसात मोठा रोष निर्माण होत आहे.

या प्रकरणातील संबंधित व्यापारी हा टांगोर चौकातील एका नामांकित मिठाई भंडाराचा संचालक असून तो भारतीय जनता पार्टीकडून नगरपालिकेत मागील काळात स्वीकृत नगरसेवक असल्याची माहिती आहे. या नगरसेवकाचे माजी आमदार ‘मामा’ यांच्याशी जवळचे संबंध असल्याने त्यांच्या माध्यमातून नगरपरिषदेवर राजकीय दबाव आणल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

माहितीनुसार, सदर ट्यूबवेल २०१०-११ च्या भीषण दुष्काळी परिस्थितीत नगरपरिषदेकडून खोदण्यात आली होती. या ट्यूबवेलवरून वणी शहरातील मोठ्या भागाला पाणीपुरवठा केला जात होता. या प्रकल्पासाठी लोखंडी व महागडी पाइपलाइन टाकण्यात आली असून आंबेडकर चौक, सर्वोदय चौक, मुख्य बाजारपेठ व वॉटर सप्लाय विभागापर्यंत ती जोडलेली आहे. या संपूर्ण यंत्रणेवर आजपर्यंत अंदाजे ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती आहे.

नागरिकांच्या आरोपानुसार, संबंधित व्यापाऱ्याच्या प्रतिष्ठानसमोर ही ट्यूबवेल व टँकर भरण्याची सुविधा ‘अडथळा’ ठरत होती. त्यामुळे या सार्वजनिक ट्यूबवेलचा कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी दोन-तीन दिवसांपूर्वी ती मुद्दाम बंद ठेवण्यात आली. त्यानंतर ट्यूबवेलमधील मोटार काढून त्यामध्ये दगड व गोटे टाकून ती पूर्णपणे जाम करण्यात आली. त्याच ठिकाणी खासगी पाण्यासाठी बोअरवेल खणल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत.

या गंभीर प्रकारामुळे वणी शहरात पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र झाला असून नागरिकांत भाजपाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून खासगी स्वार्थ साधल्याचा हा प्रकार असल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी शिंदे सेनेचे नेते विजयबाबू चोरडिया यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना कळविले असून जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याशीही संपर्क साधून तातडीने चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.

सार्वजनिक पाण्यावर गदा आणणाऱ्या या प्रकरणाकडे प्रशासन गंभीरपणे पाहणार का, की राजकीय दबावापुढे पुन्हा एकदा जनतेच्या हक्काचे पाणी मुरणार, असा सवाल आता वणीकर विचारत आहेत.

झरी-जामनीत राजकीय उलथा- पालथ, नगर पंचायतीवर शिंदेसेनेचा झेंडा — शिलाताई चौधरी यांची नगराध्यक्षपदी निवड सेनेचे नेते विजयबाबू चोरडियांच्या खेळीने तालुका हादरला

0

News Today 

झरी-जामनी नगर पंचायतीच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. उबाठा गटाच्या नगराध्यक्षा सौ. संगीताताई बिजगुनवार यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर शिंदेसेनेच्या सौ. शिलाताई चौधरी यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निर्णायक घडामोडीमुळे संपूर्ण झरी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

नगर पंचायतीच्या विशेष सभेत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. एकूण १५ नगरसेवकांपैकी १३ नगरसेवकांनी शिलाताई चौधरी यांच्या बाजूने मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौधरी यांना अधिकृतरित्या नगराध्यक्षा घोषित केले. यावेळी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी भाजपमधून नाराज होऊन शिंदेसेनेत प्रवेश केलेले विजयबाबू चोरडिया असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विजयबाबू चोरडिया यांनी अत्यंत कुशल राजकीय खेळी करत नगरसेवकांची मोट बांधली आणि नगर पंचायतीतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलून टाकले. त्यांच्या या रणनीतीमुळे झरी तालुक्याच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.

नव्या नगराध्यक्षा शिलाताई चौधरी यांच्या निवडीनंतर शिंदेसेना गटात जल्लोषाचे वातावरण होते. यावेळी विजयबाबू चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते मनीष सुरवार, विनोद मोहितकर, चंद्रकांत घुगुल, नगरसेवक दिनेश जैस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्षा पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बोलताना शिलाताई चौधरी यांनी, “झरी-जामनी नगर पंचायतीच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करणार असून जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न करू,” असा विश्वास व्यक्त केला.
शीलाताई चौधरी यांनी या निवडीचे श्रेय शिवसेनाप्रमुख तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड , माजी आमदार विश्वास नांदेकर, आणि विजयबाबू चोरडिया यांना देण्यात आले

या सत्ताबदलामुळे येणाऱ्या काळात झरी-जामनी नगर पंचायतीतील विकासकामे, राजकीय समीकरणे आणि तालुक्यातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

१० वर्षात बोदकुरवारांना जे जमल नाही ते विजयबाबू चोरडिया यांनी १० आठवड्यात घडवून आणलं

मागील १० वर्ष भारतीय जनता पार्टीचे वणी विधानसभेवर आमदार म्हणून बोदकुरवार यांचे वर्चस्व होते. तसेच ते झरी तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी असून देखील झरी पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकविणे त्यांना शक्य झाले नाही परंतु भाजपला राम राम ठोकून शिंदेसेनेत प्रवेश घेऊन अवघ्या दहा आठवड्याचा कालावधीत विजयबाबू चोरडिया यांनी झरी नगर पंचायतीवर शिंदे सेनेचा झेंडा फडकवून दाखविल्याने जे १० वर्षात भाजपला जमलं नाही ते विजयबाबूंनी दहा आठवड्यात करून दाखवलं अशी चर्चा संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यात सुरू झाली आहे.

 

वणी येथील पत्रकार रवी ढुमने यांची आत्महत्या; शहरात हळहळ

0

News Today

वणी (ता. वणी):
येथील विद्यानगरी परिसरात राहणारे ज्येष्ठ पत्रकार रवी ढुमने वय ५० वर्ष यांनी सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे वणी शहरासह पत्रकार बांधवांमध्ये मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, रवी ढुमने हे विद्यानगरी, वणी येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत असून . मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याच्या तयारीला लागले आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

रवी ढुमने हे वणी तालुक्यातील एक परिचित पत्रकार म्हणून ओळखले जात होते. सामाजिक प्रश्न, स्थानिक घडामोडी आणि सामान्य जनतेच्या समस्या मांडण्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर विविध सामाजिक, राजकीय व पत्रकार संघटनांकडून शोक व्यक्त करण्यात येत असून, ढुमने कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

 

पुनवट ग्रामपंचायतीत सरपंचांचा कथित विश्वासघात; उपसरपंच्याचा आरोप, सत्तेतील कमळाबाईच्या एका माजी आमदाराने “मोक्याच्या भूखंडाचे लाटले श्रीखंड”, खासगी शाळेला जागा देण्याचे प्रकरण

0

News Today 

वणी :- तालुक्यातील पुनवट ग्रामपंचायतीतील शासकीय जमीन गट क्र. ०२, क्षेत्र ३.५५ हेक्टेअर (ई-वर्ग) या जमिनीच्या लिलाव व उपलब्धतेसंदर्भातील वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. सरपंचांनी घेतलेल्या निर्णयांमुळे ग्रामवासीयांचा विश्वासघात झाल्याचा आरोप उपसरपंचांसह ग्रामस्थांकडून होत असून, सदर जमिनीच्या व्यवहारात आर्थिक अपहाराची दाट शक्यताही वर्तवली जात आहे.

हा मौल्यवान भूखंड अगदी गावालगत मुख्य राज्यमार्गावर असून खासगी DAV शाळेला देण्यात कोणतीच हरकत नसल्याचे प्रमाणपत्र (NOC) ग्राम पंचायतीने कोणतीही ग्रामसभा न घेता मासिक सभेत दिल्याने गावात प्रचंड गोंधळ उडाला आहे. या करोडो रुपयाच्या जमीन प्रकरणात कमळाबाईचा एका माजी आमदार (मामा) यांनी सरपंच यांना हाताशी धरून भूखंडातील श्रीखंड चाटून पुसून खाल्याचा आरोप उपसरपंच मिलिंद कांबळे यांनी केला असून या भूखंडाची रीतसर चौकशीची मागणी केली आहे.

सरपंचांचा लिलाव थांबविण्याचा प्रस्ताव

दिनांक ०५/०३/२०२४ रोजी सरपंच पुनवट यांनी सदर शासकीय जमिनीच्या २०२४–२५ या वर्षासाठी ठेकेपत्राबाबत तहसिलदारांकडून मार्गदर्शन मागितले. त्याच दिवशी तहसिलदारांनी जमिनीचा लिलाव करू नये, असा स्पष्ट आदेश देत प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी वणी, गट विकास अधिकारी वणी आणि सरपंचांना दिली.

उपसरपंचांचा विरोध, पण प्रशासनाचे दुर्लक्ष

उपसरपंचांनी लिलाव व्हावा म्हणून गट शिक्षणाधिकारींना निवेदन दिले. प्रतिलिपी तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या. मात्र या सर्व निवेदनांना प्रशासनाने ‘केराची टोपली’ दाखवल्याचा आरोप उपसरपंचांनी केला आहे.

तहसिलदारांचा पत्रव्यवहार, पण चार महिने विषय दडवला?

दिनांक २५/०४/२०२५ रोजी तहसिलदारांनी ग्रामपंचायत सचिव व सरपंचांना शासकीय जमीन शाळेच्या नवनिर्माणासाठी उपलब्ध करून नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, अशा सूचना केल्या.

परंतु सरपंचांनी हा विषय तब्बल चार महिने गावापासून लपवून ठेवला, असा आरोप करण्यात येतो.

मासिक सभेत चार-चार मते; सरपंचांनी निर्णायक मत वापरून प्रस्ताव मंजूर

शेवटी २५/०८/२०२५ रोजी मासिक सभेत हा विषय ठेवण्यात आला. सभेत चार विरुद्ध चार अशी मतवाटणी झाली. तेव्हा सरपंचांनी निर्णायक मताचा अधिकार वापरून प्रस्ताव मंजूर केला.

यालाही उपसरपंचांनी तीव्र विरोध करत निर्णायक मत ग्राह्य धरू नये व विशेष ग्रामसभा बोलवावी, अशी मागणी २८/०८/२०२५ रोजी BDO यांच्याकडे केली.

आता प्रकरण राज्य व केंद्र सरकारपर्यंत

न्याय न मिळाल्याने उपसरपंचांनी ०३/११/२०२५ रोजी जिल्हाधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त, महसूल व सामान्य प्रशासन मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, तसेच पंतप्रधान व राष्ट्रपती कार्यालयाकडेही तक्रार पाठवली आहे.

ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान?

या शासकीय जमिनीच्या लिलावातून दरवर्षी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न येते, जे जिल्हा परिषद शाळेला मिळते. लिलाव न झाल्याने गावाला व शाळेला मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप उपसरपंचांनी केला आहे.

याशिवाय निर्णय ‘एककल्ली’ पद्धतीने घेतल्याने आर्थिक उलाढालीचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. या सर्व घडामोडीला सत्तेतील कमळाबाईचा एक माजी आमदार मामा यांनी पूनवट गावाला चांगलेच मामा बनवून सोडले आहे. या माजी मामा व त्याच्या पुढाऱ्यांना येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जागा दाखविण्या चंग गावकरी बांधत आहे. अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सरपंच्यांचे म्हणणे काय ?

याविषयी पुनवट ग्राम पंचायतीचे सरपंच प्रतिभ जेउरकर यांना दूरध्वनी वरून विचारणा केली असता त्यांनी असे उत्तर दिले की, यात मासिक सभेत विषय ठेवण्यात आला व बहुमताने ठराव पारित करून नाहरकत देण्यात आले आहे व ही जागा ग्राम पंचायतीच्या मालकीची नाही असा दावा करील या जागेचे शासकीय मूल्यमापन करून वेकोली ती रक्कम अदा करणार असल्याची माहिती दिली.

बाजार मूल्यानुसार या जागेची किंमत किती ?

शासकीय मूल्यमापनाने (valuation) ही जागा केवळ काही लाखाची होऊ शकते परंतु ही जागा बाजारमूल्यानुसार सुमारे १५ ते  २० कोटी रुपयांची असल्याची जोरदार चर्चा गावात सुरू आहे. 

अमरावती आयुक्तांकडून सोनेगाव पोलीस पाटील निलंबन प्रकरणातील स्थगिती आदेश कायम

0

News Today 

वणी:- अमरावती विभागाचे अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी सोनेगाव (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील पोलीस पाटील संजय लक्ष्मीनारायण जयस्वाल यांनी दाखल केलेल्या अपिल अर्जावर महत्त्वाचा अंतरिम आदेश जारी केला आहे.

महाराष्ट्र ग्राम पोलीस (नेमणूक, वेतन भत्ते व सेवा अटी) आदेश १९६८ अंतर्गत दाखल झालेल्या या अपिलमध्ये उपविभागीय दंडाधिकारी, वणी यांनी २३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशाविरुद्ध आव्हान करण्यात आले आहे.

अपिलार्थीच्या विनंतीनुसार यापूर्वी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थगिती दिली होती. आज, ३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या अधिवक्त्यांनी स्थगितीची मुदतवाढ मागितली असून, अपर आयुक्तांनी ती मान्य केली आहे. त्यामुळे पूर्वीचा स्थगिती आदेश कायम ठेवण्यात आला आहे.

या आदेशाची प्रत उपविभागीय अधिकारी, वणी यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.

भीषण अपघात : बसला ट्रकची समोरासमोर धडक; दोन ठार, १५ जखमी, आमदार संजय देरकर तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने मदतकार्यास गती

0

News Today 

मारेगाव तालुक्यातील जळका फाट्याजवळ गुरुवारी रात्री सुमारे ८.१५ वाजता झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. चंद्रपूरहून यवतमाळकडे जाणारी बस (क्रमांक MH 40 Y 5782) व विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा गंभीर अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय देरकर हे तातडीने दाखल झाल्याने मदतकार्या गतीमान झाले.

धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की ट्रकने बस अक्षरशः अर्धी चिरून टाकली. बसमधील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून अनेक प्रवाशी तसेच बस व ट्रक चालक गंभीर जखमी आहेत.

अपघातातील मृतक व जखमी प्रवाशांची अधिकृत नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

घटनेची माहिती मिळताच आमदार संजय देरकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य गतीमान करून मृतदेह व जखमी प्रवाश्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या. प्राथमिक उपचारांनंतर बहुतांश जखमींना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

वणी नगर परिषदेची निवडणूक : मतासाठी पैशांची देवघेव करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांची प्रसिध्दीपत्रकातून भूमिका

0

News Today 
वणी – नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असताना निवडणूक विभाग तसेच पोलिस प्रशासन याकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा गंभीर आरोप बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांनी विशेष प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.

इंगळे यांनी म्हटले आहे की, निवडणुकीत मतासाठी पैसे घेणारे आणि पैसे देणारे अशा दोघांविरुद्धही तत्काळ आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मतदारांना पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ समोर आला असतानाही निवडणूक विभाग “मूग गिळून बसला आहे” तर पोलिस यंत्रणा “डोळे झाकून चालली आहे”, असा इंगळे यांनी आरोप केला.

सदर प्रकरणाचा गांभीर्याने विचार न केल्यास लवकरच निवडणूक विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिला असून पोलिस स्टेशन, वणी येथे रीतसर तक्रार दाखल केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पैसे वाटप करून सशक्त लोकशाहीला खिळ बसवत लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले असल्याचा आरोपही इंगळे यांनी केला. या प्रकरणी निवडणूक विभाग व पोलिस यंत्रणा कोणती कारवाई करणार, याकडे संपूर्ण वणी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

मतमोजणी पुढे ढकलल्याने खळबळ; EVM सुरक्षेवर प्रश्नचिन्ह – मतदारांमध्ये संतापाची लाट

0

News Today 

मुंबई:- राज्यात आज, २ डिसेंबर २०२५, रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या. मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी निवडणूक आयोगाने आश्चर्यकारक निर्णय घेत मतमोजणीची तारीख थेट २१ डिसेंबर २०२५ पर्यंत पुढे ढकलली.

आयोगाच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

वाद कोर्टात, पण शंका EVM वर?

काही नगरपरिषदांच्या निवडणुकीसंदर्भात न्यायालयात वाद प्रलंबित असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. परंतु हा निर्णय जाहीर होताच मतदारांमध्ये EVM सुरक्षिततेबाबत संशय निर्माण झाला आहे.

लोकांच्या चर्चेत एकच मुद्दा:

“मतमोजणी इतक्या उशीराने का? EVM कुठे ठेवणार? सुरक्षा कोण पाहणार?”

मतदारांमध्ये आयोगाच्या निर्णयाविषयी रोष वाढताना दिसतो आहे. सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मतदारांमध्ये रोषाची भावना तीव्र

मतदारांचे म्हणणे आहे की, मतदान प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली असताना निकाल मात्र जवळपास अठरा दिवसांनी जाहीर करणे योग्य नाही.
अनेक मतदारांनी प्रशासनावर पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे.

एक स्थानिक मतदार म्हणाले :

“EVM काही दिवस ठेवून दिल्या, तर शंका येणे स्वाभाविकच आहे. निकाल लांबवण्यामागे नेमके कारण काय?”

राजकीय पक्षांचा सूरही संशयाचा

काही स्थानिक पक्षांनीही आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मतमोजणी पुढे ढकलण्यामागील कारणांची सविस्तर स्पष्टता द्यावी, अशी मागणी केली आहे.

विरोधकांनी तर हा निर्णय “मतदारांच्या विश्वासावर गदा” आणणारा म्हणत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

मतमोजणीपूर्वी जबाबदारी आयोगाची

आता २१ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीपर्यंत EVM ची सुरक्षा, पारदर्शकता आणि विश्वासार्हता—या तिन्ही मुद्द्यांवर निवडणूक आयोगाची कसोटी लागणार आहे.

मतदारांची वाढती नाराजी पाहता आयोगाने तातडीने संवाद साधून परिस्थिती स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.