Wednesday, July 29, 2026
Google search engine
Home Blog Page 5

वणीतील तंबाखू तस्करी प्रकरणात पोलीस–माफिया संगनमताचा संशय; दोषी तपास अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी

0

News Today 

यवतमाळ:- वणी शहरातील पंचशील नगर परिसरात ८ डिसेंबर २०२५ रोजी उघडकीस आलेल्या सुगंधित तंबाखू तस्करी प्रकरणात आता गंभीर वळण लागले असून, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरच संशयाची छाया निर्माण झाली आहे. या प्रकरणात तपास अधिकाऱ्याच्या संशयास्पद कार्यप्रणालीविरोधात युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

८ डिसेंबर रोजी पंचशील नगर येथील जागरूक नागरिकांनी ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर तंबाखूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून सुगंधित तंबाखूची मोठी खेप जप्त केली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाने (FDA) देखील कठोर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मात्र, या कारवाईनंतर तपास ज्या पद्धतीने पुढे जात आहे, त्यावरून पोलिसांचे तंबाखू माफियांशी संगनमत असल्याचा आरोप होत आहे. गुन्ह्यात प्रत्यक्ष वापरलेले वाहन (क्रमांक MH-24-BL-7051), त्याचा चालक व मालक यांची संपूर्ण माहिती उपलब्ध असतानाही तब्बल एक महिना उलटूनही सदर वाहन जप्त करण्यात आलेले नाही. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्ष साक्षीदार उपलब्ध असतानाही ही दिरंगाई होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

अजिंक्य शेंडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, वाहन जप्त न केल्यामुळे तस्करीमागील आर्थिक साखळी व मुख्य सूत्रधार उघड होण्यास अडथळा निर्माण होत आहे. ही बाब केवळ प्रशासकीय दुर्लक्ष नसून आरोपींना वाचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा संशय बळावत आहे. तपास अधिकाऱ्याची संथ आणि उदासीन भूमिका पाहता शहरात बेकायदेशीर धंद्यांना पोलीस संरक्षण मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

युवासेनेच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये, संबंधित वाहन तात्काळ जप्त करून मालक व चालकावर कठोर कारवाई करणे, FDA ने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार तंबाखू मागवणाऱ्या मुख्य आरोपीला त्वरित अटक करणे, तसेच तपासात दिरंगाई करणाऱ्या तपास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करणे यांचा समावेश आहे.

जर येत्या ४८ तासांत ठोस कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जनतेचा पोलिसांवरील विश्वास टिकवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, पोलीस प्रशासन पुढील काळात काय भूमिका घेते, याकडे नागरिक आणि सामाजिक संघटनांचे लक्ष केंद्रित झाले आहे. यावेळी युवासेना समन्वयक आयुष ठाकरे, सुरेश शेंडे उपस्थित होते.

आज वणी येथे माळी समाज कार्यालय उद्घाटन

0

News Today 

वणी :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी वणी येथे माळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ होत आहे. हे कार्यालय भास्कर वाढई कॉम्प्लेक्स, बस स्टॉपसमोर, सरकारी दवाखाना रोड, वणी येथे दुपारी २ वाजता भव्यरित्या आयोजित केले जाणार आहे. या उपक्रमाने माळी समाजाच्या सामाजिक कार्याला नवीन गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

कार्यालयाचे उद्दिष्ट

माळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे हे कार्यालय संघटनात्मक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय उन्नतीसाठी स्थापन केले आहे. समाजाच्या समस्या मांडणे, चर्चा करणे, मार्गदर्शन करणे आणि हक्कांसाठी लढा देण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः शिक्षण, रोजगार, विवाह आणि सामाजिक सुधारणांसाठी समाजबांधवांना एकत्र आणण्याचा हेतू आहे.

समाजासाठी महत्व आहे.

कार्यालय समाजाला दिशा देणारे, प्रश्न सोडवणारे आणि सर्वांगीण विकासाचे केंद्र बनेल. माळी समाजाच्या विविध उपक्रमांप्रमाणे, जसे वधुवर परिचय मेळावे आणि गुणवंत सन्मान, येथेही अशा योजना राबवल्या जातील. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना प्रेरणा घेऊन समाजसुधारणांवर भर दिला जाईल.

उपस्थितीसाठी आवाहन

माळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सर्व समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शुभारंभाने समाजकार्य मजबूत होईल आणि नवीन कार्याला चालना मिळेल. सर्वांनी सहभागी होऊन या उपक्रमाला यश मिळवून द्यावे.

बौद्ध धर्मीय युवक-युवती परिचय मेळाव्याचे वणीत आयोजन

0

News Today 

वणी : स्नेहनिकेतन अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्था, वणी (तालुका वणी, जिल्हा यवतमाळ) यांच्या वतीने बौद्ध धर्मीय युवक-युवतींसाठी परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिचय मेळावा शनिवार, दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी आकाश हॉल, गणेशपुर रोड, वणी येथे संपन्न होणार आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाला एक पवित्र संस्कार मानले जाते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात योग्य जीवनसाथीचा शोध घेणे अनेकांसाठी कठीण होत आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि सुसंस्कृत व्हावी, या उद्देशाने सदर बौद्ध धर्मीय युवक-युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा 1 जानेवारी ‘शौर्य दिवस’ तसेच 3 जानेवारी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती’ या महत्त्वपूर्ण दिनांच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत असून, सामाजिक समता, बंधुता आणि प्रगतीच्या विचारांना अनुसरून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बौद्ध धम्मातील मूल्ये जपून, सुसंस्कृत आणि सुशिक्षित युवक-युवतींना एकमेकांचा परिचय व्हावा, हा या मेळाव्यामागील मुख्य हेतू आहे.

या परिचय मेळाव्यात विवाह इच्छुक बौद्ध धर्मीय युवक व युवतींना आपली नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणीसाठी संस्थेच्या सचिव आयु. प्रणिता ठमके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : 8605649793

या सामाजिक उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त बौद्ध धर्मीय युवक-युवतींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्नेहनिकेतन अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्था, वणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

GNR कंपनीत कामगाराचा संशयास्पद मृत्यू; अपघात की घात? वणी तालुक्यात खळबळ 

0

News Today 
वणी :- तालुक्यातील निलजई गाव परिसरात कार्यरत असलेल्या GNR कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही कंपनी WCL भालर उपप्रबंधक कार्यालयाच्या अंतर्गत येत असून कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करत आहे.

ही घटना ३० डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास घडली. मात्र हा प्रकार अपघात आहे की घातपात, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

घटनेनंतर गंभीर अवस्थेत असलेल्या कामगाराला चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच चिकित्सकांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी कंपनीकडून अत्यंत संशयास्पद मौन पाळले जात आहे. GNR कंपनीचे प्रतिनिधी मधू मन्नेम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेबाबत कोणतीही माहिती देण्यास असमर्थता दर्शवली.

विशेष म्हणजे सदर मृत कामगार हा परप्रांतीय असल्याचे सांगण्यात येत असून, त्याचे नाव जाहीर करण्यासही कंपनीने नकार दिला आहे.

घटना घडताच कंपनीत काम करणाऱ्या इतर कामगारांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळ परिस्थिती चिघळली असून, या भागात मोठ्या प्रमाणावर कामगार कार्यरत असताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती संबंधित पोलिस स्टेशनला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडूनही अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कामगारांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा घटनांमुळे खनन क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ग्रामपंचायतीत लाखोंची अफरातफर; तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक अडचणीत , गटविकास अधिकारी यांनी दिले उचित चौकशीचे आश्वासन, वाचा सविस्तर बातमी

0

News Today 

वणी तालुक्यातील नेरड (पुरड) येथील ग्रामपंचायतीमध्ये सन २०२२ ते २०२५ या कालावधीत मोठ्या प्रमाणात आर्थिक अफरातफर व प्रशासकीय अनियमितता झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पंचायत समिती वणीच्या आदेशानुसार मा. विस्तार अधिकारी व सहाय्यक अभियंता यांनी केलेल्या चौकशीत तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक/ग्रामविस्तार अधिकारी दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्रामस्थांनी यापूर्वी दि. १५ सप्टेंबर, १४ ऑक्टोबर व १६ ऑक्टोबर २०२५ रोजी लेखी तक्रारी दाखल केल्यानंतर पंचायत समिती वणीने दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सादर करण्यात आलेल्या अहवालात एकूण नऊ मुद्द्यांवर गंभीर अनियमितता झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

१५ वा वित्त आयोग निधीतून करण्यात आलेल्या कामांमध्ये तब्बल ४ लाख ९० हजार २६० रुपयांची अफरातफर झाल्याचे निष्पन्न झाले असून अनेक वाउचर व बिले उपलब्ध नाहीत. तसेच एल.ई.डी. स्ट्रीट लाईट खरेदीतही मोठी तफावत आढळून आली असून ४२ बल्बचे बिल असताना प्रत्यक्षात २९ बल्बच बसविण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये २६ हजार ४६१ रुपयांची आर्थिक हानी झाल्याचे चौकशी अहवालात नमूद आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार घेणे बंधनकारक असलेल्या मासिक सभा व ग्रामसभा न घेतल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजावर कोणतेही लोकनियंत्रण राहिले नसल्याचे चित्र आहे. तसेच जन सुविधा योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामासाठी कोणताही वैध ठराव नसताना रेड झोन क्षेत्रात काम करून ४ लाख ६७ हजार ८९० रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

याशिवाय एकाच व्यक्तीस दोन शासकीय पदांचे मानधन देणे, कॅशबुकमध्ये अपूर्ण नोंदी ठेवणे तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी मंजूर निधी खर्च न करणे असे गंभीर प्रकारही चौकशीत समोर आले आहेत.

या सर्व प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून अफरातफरीची संपूर्ण रक्कम वसूल करावी तसेच संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी वणी यांच्याकडे केली आहे. आता प्रशासन या प्रकरणात कोणती ठोस कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, माजी उपसरपंच विनायक तुरणकर, संजय लेडांगे, विठ्ठल ठावरी, मनोज ठावरी, गणपत आमने, बंडू झाडे, पांडुरंग ठावारी, गुलाब राखुंडे, रोशन तुरणकर, भाऊराव चीने, जगदीश जुनगरीयांचेसह असंख्य ग्रामवासी उपस्थित होते.

नेरड येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या बँक प्रतिनिधीपदी अनिल कुचनकर

0

News Today

नेरड–पुरड–हिवरधरा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या बँक प्रतिनिधी पदासाठी अनिल कुचनकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सोसायटीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

या प्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष गजानन किन्नेकर यांच्यासह संतोष कुचनकर, गणपत लेडांगे, बाबाराव तुराणकर, वसंता थेटे, भाऊराव मिलमीले, रविभाऊ नक्षीने, उमेश कुचनकर, रामदास करलुके, अंबादासजी उंबरे, चंदु बोंडे, सुचिता ठावरी, बेबी राजगडकर आदी संचालक व सदस्य उपस्थित होते. तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव मुळे साहेब आणि निवडणूक अधिकारी यांनीही उपस्थित राहून निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

अनिल कुचनकर यांच्या निवडीमुळे सोसायटीच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सर्व उपस्थितांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत सोसायटीच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शिवसेनेचा वाघ हरपला – माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे मुंबईत दुःखद निधन

0

News Today

वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विश्वास नांदेकर यांचे मुंबई येथे दिनांक २१ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता दुःखद निधन झाले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात ते गेल्या महिन्याभरापासून उपचार घेत होते. उपचारादरम्यान अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने वणी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण शिवसेना परिवारावर शोककळा पसरली आहे. दिनांक २३ डिसेंबर रोजी त्यांचेवर वणी तालुक्यातील त्यांचेमुळ गाव पठारपूर येथे सकाळी १० वाजता अंत्यविधी आटोपणार आहे.

विश्वास नांदेकर हे २००४ ते २००९ या कालावधीत वणी विधानसभेचे आमदार होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान दिले. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य तसेच मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी ते नेहमी आक्रमक भूमिका घेत असत.

अन्याय, भ्रष्टाचार आणि शोषणाविरोधात ते तुटून पडणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. जनतेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची त्यांची तयारीच त्यांची ओळख होती. याच निर्भीड आणि आक्रमक स्वभावामुळे त्यांना “शिवसेनेचा वाघ” म्हणून ओळखले जात होते.

ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक आणि निष्ठावंत शिवसैनिक होते. बाळासाहेबांच्या विचारांवर त्यांची नितांत श्रद्धा होती आणि त्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीतही त्यांचा मोठा वाटा होता.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक क्षेत्रातून तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत. वणी मतदारसंघातील नागरिकांनी एका कर्तृत्ववान, लढवय्या आणि जनतेच्या हक्कासाठी झटणाऱ्या नेतृत्वाला आज कायमचे गमावले आहे.

विश्वास नांदेकर यांच्या पश्चात कुटुंबीय, असंख्य कार्यकर्ते आणि चाहत्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.


भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

वणीत अवैध व्यवसाय विरोधात पोलिसांचा धडाका : वर्षभरात १०६ जुगार तर ६५ विक्रेत्यांवर कारवाई – मागोवा २०२५

0

News Today 

वणी:-  शहर व ग्रामीण अवैध दारूविक्री अवैध्य वरली मटका  जुगाराला आळा घालण्यासाठी वणी पोलिसांनी मागील एका वर्षात मोठी मोहीम राबवली आहे. या कालावधीत तब्बल १०६ वरली मटका जुगारांच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ६५ अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण वणी विभागात अश्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच वणी पोलिसांकडून अश्या कारवाया केल्याची उल्लेखनीय बाब समोर आली आहे. 

ही कारवाई पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने करण्यात आली. दारूबंदी व जुगार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापे टाकून देशी-विदेशी अवैध दारू, व अवैध्य जुगार , वरली मटका व्यावसायिकांवर कारवाई करीत साहित्य व मुद्देमाल जप्त करून त्यांच्या मुसक्या आवळत अत्यंत यशस्वीपणे ही मोहित राबविली.

अवैध दारूमुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम, गुन्हेगारी वाढ आणि नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका लक्षात घेता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली. तसेच कायदा व सुव्यवस्थेला अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांच्या या कारवाईमुळे वरली मटका, जुगार  व अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

वणी पोलिसांकडून भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले असून, नागरिकांनी अवैध दारूविक्रीबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 –

⚠️ सावधान! WhatsApp हॅक करून बँक खात्यांवर डल्ला – हॅक झालेल्यांच्याच अकाउंटमधून फसवणूक संदेशांचा प्रसार

0

News Today

वणी शहरासह परिसरात सध्या सायबर फसवणुकीचा अत्यंत गंभीर प्रकार समोर येत आहे. Bank of India च्या नावाने “Reward Points”, “आजच संपणार”, “₹7250 जमा होतील” अशा आमिषपूर्ण मजकुरासह PDF / APK फाइल WhatsApp वर पाठवली जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, ज्यांचा WhatsApp एकदा हॅक होतो, त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना व सर्व WhatsApp ग्रुपमध्ये हाच फसवणुकीचा मेसेज आपोआप पुढे पाठवला जात आहे. त्यामुळे हा मेसेज विश्वासार्ह वाटून अनेक निरपराध नागरिक त्याची शिकार होत आहेत.

🔴 फसवणूक कशी वाढते?

नागरिक PDF / APK फाइल उघडतात मोबाईलमध्ये हॅकिंग सॉफ्टवेअर (Malware) इन्स्टॉल होते

WhatsApp, बँक OTP, UPI, संपर्क यादीवर हॅकर्सचा ताबा जातो, त्याच व्यक्तीच्या WhatsApp मधून सर्व कॉन्टॅक्ट्स व ग्रुपमध्ये तोच मेसेज पसरवला जातो, काही मिनिटांतच बँक खाते रिकामे होते

❌ काय करू नये?

ओळखीच्या व्यक्तीकडून आला तरी PDF / APK / लिंक उघडू नका

“Reward”, “Cashback”, “Account Update” अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका लक्षात ठेवा – कोणतीही बँक WhatsApp वर APK किंवा PDF पाठवत नाही.

काय करावे?

असा मेसेज त्वरित Delete करा, मेसेज पाठवणारा नंबर Block व Report करा, फाइल उघडली असल्यास त्वरित: बँकेत संपर्क साधून खाते सुरक्षित करा UPI व नेटबँकिंग बंद करा, जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा

📢 नागरिकांना आवाहन

हा मेसेज केवळ एक व्यक्तीपुरता मर्यादित नसून हॅक झालेल्या WhatsApp मधूनच वेगाने पसरत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून आणखी नागरिक सायबर फसवणुकीपासून वाचतील.

👉 सावध रहा – सतर्क रहा – सायबर फसवणुकीपासून स्वतःला व समाजाला वाचवा!

मोठी खळबळ ; एमआयडीसीत भीषण स्फोट : पाण्याच्या टाकीत अपघात; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जखमी, वाचा सविस्तर बातमी

0

News Today 

नागपूर (बुटीबोरी): दुधा-मांगली अतिरिक्त एमआयडीसीतील अवादा कंपनीत दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता पाण्याच्या १५-१६ लाख लिटर क्षमतेच्या टाकीचा जोरदार स्फोट झाला. या दुर्घटनेत सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

स्फोटाची तीव्रता इतकी होती की टाकीची पत्रे आणि लोखंडी संरचना दूरवर उडाली. त्यात काम करत असलेले कामगार अडकले. जखमींना तात्काळ एम्स नागपूरला हलवण्यात आले असून, त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.

मृत कामगारांची नावे आणि माहिती:अरविंद कुमार ठाकुर (२८, चंपारण, बिहार)अशोक कंचन पटेल (४२, पहाडपूर, बिहार)अजय राजेश पासवान (२६, मुजफ्फरपूर, बिहार)सुधांशु कुमार नागेश्वर साहणी (३६, मुजफ्फरपूर, बिहार)बुलेट कुमार इंद्रजीत शाह (३०, पश्चिम चंपारण, बिहार)शमीम अन्सारी (४२, मुजफ्फरपूर, बिहार)घटनेची कल्पना येताच बुटीबोरी पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

 

बचावकार्य युद्धपातळीवर राबवले गेले. परिसरात शोककळा पसरली असून, मृतकांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या प्रकरणाने औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

टाकीची देखभाल, सुरक्षा तपासणी आणि क्षमता तपासण्यात दुर्लक्ष झाले का, याची चौकशी अपेक्षित आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.