Thursday, July 30, 2026
Google search engine
Home Blog Page 20

वणीतील हॉटेल उद्योजक तथा कट्टर शिवसैनिक मोन्टू वाधवानी यांचे दुःखद निधन

0

News Today

वणी – वणीतील सुप्रसिद्ध हॉटेल उद्योजक आणि समाजप्रिय व्यक्तिमत्त्व दिलीप उर्फ मोन्टू वाधवानी (वय 56) यांचे दीर्घ आजाराने शनिवार, 9 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. मागील चार महिन्यांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र प्रकृती खालावत गेल्याने अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मोन्टू वाधवानी हे सिंधी कॉलनीतील “मोन्टू का धाबा” या लोकप्रिय रेस्टॉरन्टचे संचालक होते. त्यांच्या रुचकर जेवणासाठी तसेच आपुलकीच्या वागणुकीसाठी ते परिसरात विशेष प्रसिद्ध होते. व्यावसायिक क्षेत्रासोबतच ते सामाजिक व राजकीय क्षेत्रातही सक्रीय होते. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी शिवसेनेच्या विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.

आपुलकीचा स्वभाव, मोकळेपणाने संवाद साधण्याची हातोटी आणि गरजूंना मदतीचा हात देण्याची वृत्ती यामुळे वणीच्या नागरिकांच्या मनात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने वणी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज (10 ऑगस्ट) दुपारी वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा दुपारी 2 वाजता शेतकरी मंदिरासमोर असलेल्या राहत्या घरातून निघणार आहे. त्यांच्या निधनाने वणी शहराने एक उदार मनाचा, समाजप्रिय आणि हसतमुख व्यक्ती गमावली असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

वणी तुडेच्या सर्व वाचकांकडून तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बोरगाव (मे) येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर

0

News Today 

वणी :- तालुक्यातील मौजा बोरगाव (मे), येथे दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी सोमवार दिनी महसूल विभाग, वणी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरास एन. व्ही. बांगडे, मंडळ अधिकारी, शिरपूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या शिबिरात शेतकरी बांधवांना ७/१२, ८-अ उतारे, तसेच शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले.

कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे तालुका कृषी अधिकारी वणी, दिलीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली व माहितीपत्रके वाटप करण्यात आले.

एम. आर. पत्रे, सहायक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना MREGS फळबाग लागवड योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, बांबू लागवड योजना, तुती लागवड योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत शेततळे, यांत्रिकीकरण, PMFME योजना यांची सविस्तर माहिती दिली व शेतकऱ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच गावातील १००% शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय.डी. तयार करून खरीप हंगामातील पिकांसाठी पिकविमा घेण्याचे आवाहन केले.

डी. आर. बरडे, सहायक कृषी अधिकारी यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे व शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच खरीप हंगामातील कापूस, तूर व सोयाबीन पिकांवरील कीड/रोग ओळख व एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली.

एस. एम. घुगे, सहायक कृषी अधिकारी यांनी तुती लागवड योजना, बांबू लागवड योजना व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना यावर मार्गदर्शन केले.

सरपंच प्रियांका प्रमोद कोल्हे यांच्या हस्ते दररोज फवारणी करणाऱ्या शेतमजुरांना फवारणीसाठी सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी एम. आर. पत्रे यांनी किटकनाशके खरेदी व वापरताना घ्यावयाची खबरदारी, विषबाधा झाल्यास प्रथमोपचार व फवारणीदरम्यान घ्यावयाच्या उपाययोजना यावर प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले.

या शिबिरात सरपंच प्रियांका प्रमोद कोल्हे, उपसरपंच पदमाकर देरकर, पोलीस पाटील प्रदीप बलकी, राशन दुकानदार सुधाकर तुराणकर, महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी अधिकारी, जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच गावातील शेतकरी बांधव व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कतरे, ग्राम महसूल अधिकारी, बोरगाव (मे) यांनी केले व त्यांनी उपस्थित सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

 

शांतीचा संदेश आणि गुरुपूजनाचा सोहळा: राज विद्या केंद्राच्या वतीने सामाजिक प्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार

0

News Today 

वणी (ता. वणी) | ३१ जुलै

राज विद्या केंद्र शास्त्री नगर व पूनवट शाखेच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मंदिर, वणी येथे एक सामाजिक प्रबोधन व गुरुपूजनाचा भव्य कार्यक्रम दिनांक ३१ जुलै रोजी दुपारी १ वाजता मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या विशेष आकर्षण ठरले ते प्रेम रावत यांच्या “शांतीचा नांदेश” या कार्यक्रमाचे आयोजन. या माध्यमातून समाजात शांतता, संयम आणि आत्मप्रबोधनाचा संदेश देण्यात आला. प्रेम रावत यांचे विचार आणि संवाद उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख करणारे ठरले.

या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते मा. देवराव पाटील धांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनातील अडचणी, आत्मसन्मान व संघटित लढ्याचे महत्त्व यावर सखोल विचार मांडले.

वसंत जिनिंगचे अध्यक्ष आ. आशीष खुलसंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दशरथ पाटील बोबडे, उत्तम गेडाम, घनश्याम पवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा तालुकाध्यक्ष सूर्यवीर चिकटे, तसेच सुरेश बारासागळे यांचाही कार्यक्रमाला सक्रिय सहभाग होता.

सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाजातील सद्य:स्थिती, युवा वर्गाची जबाबदारी, आत्मशोध व अध्यात्मिक प्रगती याविषयी मौल्यवान विचार मांडले. त्यांनी राज विद्या केंद्राच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामदास पखाले यांनी केले,

समारोपाच्या सत्रात उपस्थित नागरिकांनी “शांतीचा नांदेश” कार्यक्रमात आत्मपरीक्षण व शांततेच्या महत्त्वाचा अनुभव घेतला. एकूणच हा कार्यक्रम समाजप्रबोधन, अध्यात्मिक उन्नती आणि गुरुंच्या सन्मानासाठी एक प्रेरणादायी सोहळा ठरला.

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; तिघेजण गंभीर जखमी, मुकुटबन मार्गावरील पुरड जवळ भीषण अपघात

0

News Today 

वणी, २ ऑगस्ट – वणी कडून येणाऱ्या एका दुचाकीला विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. हा अपघात मुकुटबन-पुरड मार्गावरील नागमोडीवर  आज ता. २ रोजी सायंकाळ ५.३० वाजताच्या सुमारास घडला. अपघात घडतच ट्रक चालक हा आपला ट्रक घेऊन पसार झाला आहे. 

दुचाकी क्रमांक एम.एच.२९ सी.एल. १३२४ या वाहनावरून जात असलेला प्रफुल संजय गागरे (वय २०) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यासोबत असलेले आणखी दोन तरुणही गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

अपघातात तिघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ट्रकचा वेग खूपच जास्त असल्यामुळे धडक तीव्र होती आणि त्यामुळे दुचाकीस्वार रस्त्यावर दूर फेकले गेले.

या अपघाताची माहिती मिळताच काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्ण वाहिकेत टाकून रुग्णालयात रवाना केले आहे. असून स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारच्या अपघातांवर आळा घालण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

मुकुटबन मार्गावरील सैदाबाद फाट्याजवळ बल्कर वाहन पलटले; वाहतूक ठप्प

0

News Today 

वणी – आज दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सैदाबाद फाट्याजवळ एक कच्चे सिमेंट वाहतूक करणारे बल्कर (कॅप्सूल) वाहन पलटल्याची घटना घडली. सदर वाहन मुकुटबनकडून येत होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या बैलगाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.

या अपघातामुळे घटनास्थळी दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत करण्यात प्रशासनाला अपयश आले होते.

घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे आणि वणी वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शंकर राजगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी प्रमोद मडावी, नवनाथ कल्याणकर व इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते.

दरम्यान, कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त बल्कर हटवण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर करून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू होते.

वणी येथील SDPO गणेश किंद्रे यांची मुंबईला बदली – कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरीने कमावला विश्वास

0

News Today 

वणी (प्रतिनिधी): वणी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) गणेश किंद्रे यांची बदली मुंबई येथे झाली असून, त्यांनी मागील दोन वर्षांमध्ये वणी विभागात अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक कामगिरी बजावली आहे.

गणेश रामचंद्र किंद्रे हे कर्तव्यदक्ष, कायद्यासंदर्भात कठोर भूमिका घेणारे, तसेच लोकांशी मनमिळावू आणि संयमी स्वभावाचे अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कार्यशैलीत कठोरता आणि सौम्यता यांचा सुरेख समन्वय होता. त्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वेळोवेळी तात्काळ कारवाई करत परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली.

त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात आले, तर काही संवेदनशील घटना अत्यंत सूज्ञपणे हाताळण्यात आल्या. सार्वजनिक शांती आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी घेतलेली पावले स्थानिक नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली.

त्यांच्या बदलीमुळे वणीतील नागरिक, पोलीस दलातील सहकारी आणि स्थानिक प्रतिनिधींमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्याविषयी गौरवाचे व शुभेच्छांचे सूर व्यक्त होत आहेत.

मुंबईसारख्या मोठ्या आणि महत्वाच्या ठिकाणी फोर्स १ येथे त्यांची नियुक्ती होणे हे त्यांच्यावरील विश्वासाचे प्रतिक असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेसाठी निघालेल्या मंडल यात्रेचे ३ ऑगस्ट रोजी वणी शहरात स्वागत

0

News Today 

वणी (जि. यवतमाळ) – नागपूर येथून दिनांक २ ऑगस्टपासून निघालेल्या मंडल यात्रेचे आयोजन मंडल दिन (७ ऑगस्ट) निमित्ताने करण्यात आले असून ही यात्रा विदर्भातील सात जिल्ह्यांतून जात आहे. या यात्रेचा भाग म्हणून दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही यात्रा ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जनजागृती करत आहे. प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:

जातनिहाय जनगणना तात्काळ घ्यावी.

महाज्योती संस्थेला ₹१००० कोटींचा निधी मिळावा.

प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी भवन उभारण्यात यावे.

७२ वस्तीगृहे लवकर सुरू करावीत.

५०० विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती द्यावी.

नोकरभरतीतील कंत्राटीकरण व खाजगीकरण थांबवावे.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.

१००% शिष्यवृत्ती सर्व अभ्यासक्रमांसाठी मिळावी.

एक लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग तात्काळ भरावा.

सर्व नागरिकांनी या जाहीर सभेला आणि यात्रेच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी जातनिहाय जनगणना समिती, वणी, मारेगाव, झरी यांच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मोहन हरडे यांनी केले आहे.

 

वणी शहरातील विकास आराखड्याला नागरिकांचा विरोध — लोकप्रतिनिधी नसताना आराखड्याची अंमलबजावणी थांबवावी, संभाजी ब्रिगेडची मागणी

0

News Today

वणी (प्रतिनिधी) – वणी शहरासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्याला (डी.पी. प्लॅन) स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होत असून, या आराखड्याची अंमलबजावणी तात्काळ स्थगित करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांचेकडे करण्यात आली आहे.

या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय पांडुरंग धोबे यांनी दिनांक २९ जुलै २०२५ रोजी वणी नगर परिषदेकडे सविस्तर निवेदन सादर केले. सदर निवेदनात नागरिकांच्या वतीने काही गंभीर मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधींचा अभाव, नागरी सहभागाचा अभाव
सध्या वणी नगर परिषदेमध्ये कोणतेही निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अशा गंभीर आराखड्याची अंमलबजावणी लोकशाही मूल्यांना धरून होऊ शकत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच, डी.पी. आराखड्याबाबत शहरातील सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, गृहनिर्माण संस्था यांना कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

टी.पी. स्कीमवर संताप
Town Planning (टी.पी.) स्कीम अंतर्गत वैयक्तिक मालमत्तांवर आणि शेतीच्या जमिनींवर करण्यात आलेल्या हस्तक्षेपांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबत प्रशासनाने कोणतीही खुली चर्चा अथवा स्पष्टीकरण दिलेले नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

प्रमुख मागण्या पुढे
निवेदनात डी.पी. आराखडा तात्काळ स्थगित ठेवावा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, तसेच नागरिकांच्या उपस्थितीत खुली जनसुनावणी आयोजित करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय, आराखड्याविरोधात आलेल्या सर्व हरकती व सूचनांचा विधिवत विचार करून लेखी प्रतिसाद द्यावा, अशीही मागणी आहे.

या निवेदनामुळे वणी शहरात विकास आराखड्याबाबत नवा जनआंदोलनीय सूर उमटू लागला आहे. आता प्रशासन या मागण्यांकडे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कंपनीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जंगल तोड; सामान्य शेतकऱ्यांना बसतोय फटका, वन विभागाचे दुर्लक्ष

0

 

News Today 

तालुका प्रतिनिधी : मंगेश गोरे

तालुक्यातील मुंड्रा शिवार ते चिलई या भागात एका खासगी कंपनीने मोठ्या प्रमाणात जमीन विकत घेतल्याने आणि जंगलतोड सुरू केल्याने स्थानिक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कंपनी सुरू होणार असल्याच्या आमिषाखाली काही शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जमीन खरेदी करण्यात आली असून, या साऱ्या प्रक्रियेस ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सदर जमीन माईन्स के के गौरव गोयल माईन्स या नावाने घेतली गेली असून, संबंधितांनी आपल्या मनमानी पद्धतीने कारभार सुरू केल्याचे समजते. या जंगलतोडीमुळे परिसरातील जैवविविधतेवर परिणाम होत असून, उंदीर, नीलगाय, रानडुक्कर, माकडे यांसारखी वन्यप्राणी शेतात येत आहेत. त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे.

तसेच, कंपनीच्या कामामुळे गावाकडे जाणारे रस्ते खराब झाले असून, दळणवळणाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“बहुआयामी व्यक्तिमत्व डॉ. विनोदकुमार आदे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

0

News Today 

एका सामान्य कुटुंबात सामान्य मुल म्हणून जन्मलेला विनोदकुमार. इतर सामान्य मुलांसारखाच वाढला. त्यांना लहानपणापासून वेगळं काहीतरी करण्याचा छंद होता. चित्रे काढणे, रांगोळी काढणे, मुर्त्या बनवणे, गाणे म्हणणे, सायन्स मॉडेल बनवने, ऍक्टिंग करणे, कुठल्याही कार्यक्रमात फिल्मी स्टाईलने निवेदन करणे असं नेहमीच काहीतरी करत राहायचा. हा त्यांचा छंदही होता आणि गरजही होती.

त्यांनी ग्रामीण जीवन खूप जवळून अनुभवले. जीवनातील संघर्ष पाहिला. सगळ्या जबाबदाऱ्या पत्करून वडीलाला वाचवण्यासाठी डॉ. विनोदकुमार यांची धडपड हे विसरण्यासारखे नाही.

स्वतः मनकाविकाराने ग्रसित असणारा डॉ. विनोदकुमार याने वडीलाच्या उपचारात काही कमी पडू दिलं नाही, अखेर नियतीने डाव साधून कलावंत सदाशिव बापूराव आदे यांना हिरावले. त्यांचे वडील कलावंत सदाशिव यांना अखेरचा निरोप देताना समशान भूमीतील गर्दी! या कुटुंबाबद्दल बहुमान देणारी होती.

डॉ. विनोदकुमार यांनी वडिलांना श्रद्धांजली समर्पित करण्याकरिता आयोजित केलेला भव्य दिव्य कार्यक्रम हा विसरण्यासारखा नाही. साधुसंत, अधिकारी वर्ग, राजकीय नेते सामाजिक संघटना व त्यांच्या स्नेहीजनांनी दूरवरून या कार्यक्रमाकरिता घेतलेली‌ धाव या आदे कुटुंबाबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त करणारी आहे.

वडीलावर जीवापाड प्रेम करणारा विनोद कुमार यांनी बापाच्या जाणीव पेरणाऱ्या स्वलिखित बाप नावाचा काव्यसंग्रह तसेच अजून माझा बाप काही केल्या मरत नाही हा कथासंग्रह निर्माण केला. वडीलाचे महत्व लेकराविषयी त्यांची धडपड, वडीलाच्या योगदान आपल्या पुस्तकात शब्दबद्ध केले.
या अगोदर डॉ. विनोदकुमार आदे यांच टुकार नावाचं काव्यसंग्रह प्रकाशित आहे.

अतिशय दुर्गम भागातून नवरगाव, मारेगाव येथून अंगात असलेले कौशल्य घेऊन डॉ. विनोदकुमार वणीत स्थायिक झाले आणि कला क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. हाताला काम मिळू लागले हळूहळू एका वृत्तवाहिनीची निर्मिती करून वास्तिकतेवर प्रहार करत पत्रकारीतेत ही मजल मारली.

विविध क्षेत्रात कामगीरीबद्दल ठीकठिकाणी सत्कार झाले, मानसन्मान मिळाला. लहानपणापासून खूप हालअपेष्ठा भोगलेला विनोदकुमार यांनी स्वतःला कुठल्या व्यसनांच्या आहारी जाऊ दिले नाही. आज समाजात व्यसन मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. डिजिटल माध्यमांचा विकास झाला पण ही विविध सामाजिक माध्यमे चांगल्यापेक्षा वाईट कामासाठी अधिक वापरली जात आहेत.

समाजातील अन्याय, अत्याचार, शोषण, गरिबी, बेरोजगारी, भुकमरी अशा विविध विषयावरील डॉ. विनोदकुमार यांनी लेखन‌ व कविता, गिते लिहिले‌ आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून देखिल यावर जनजागृती-प्रबोधन केले.

अंगात असलेले शेकडो गुण आजही डॉ. विनोदकुमार यांना स्वस्त बसू देत नाही. त्यांचे जीवन पुढे उंचवण्यासाठी त्यांना बळ देणार आहे. डॉ. विनोदकुमार आदे कलाक्षेत्रात त्यांच्या अंगात असलेल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर खूप मोठी क्रांती घडवणार हे सर्वश्रुत आहे.

सर्व गुण संपन्न असलेल्या व्यक्तिमत्व
डॉ. विनोदकुमार सदाशिव आदे यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.