Wednesday, July 29, 2026
Google search engine
Home Blog Page 18

झरि तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तूतारीने फोडला हुंकार –वंचितच्या एका नेत्यांसह विविध क्षेत्रातील तरुणांचा उत्स्फूर्त पक्षप्रवेश

0

News Today 

झरि :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या झरि येथे झालेल्या बैठकीत अनेक तरुणांनी पक्षप्रवेश करून पक्षाला नवे बळ दिले. आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता दिलीप भोयर यांच्या प्रतिष्ठानावार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांच्या मार्गदर्शनानुसार ही बैठक पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या एका नेत्यांसह विविध क्षेत्रातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश घेतला.

या बैठकीस अध्यक्ष म्हणून वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून वणी तालुका अध्यक्ष राजू वांढरे, झरि तालुकाध्यक्ष प्रमोद थेरे, वणी शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, झरि शहराध्यक्ष राकेश सोयम, परवेज पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेवर चर्चा करण्यात आली तसेच आगामी काळात झरि व परिसरात पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याचे निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे वणी तालुका उपाध्यक्ष नरेंद्र लोणारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष वाढीसाठी कटिबद्धपणे कार्य करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या प्रवेशावेळी प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली औपचारिक सोपस्कार पार पडले. यावेळी वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

नरेंद्र लोणारे यांच्या प्रवेशामुळे झरि व वणी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळाल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे. या बैठकीत झालेला तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हा आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे निरीक्षण राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. यावेळी सुनील विधाते, गणेश आत्राम, संतोष गजलवार, राजू बल्की, राजू कुचनकर, स्वप्नील मडावी, सूरज आवारी, अमर भोयर, आकाश कोडापे, कुणाल मिलमिले, सुभाष थेरे, अभय कुलमेथे, विपुल तलांडे, आदी उपस्थित होते.

झरि तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
या संघटनात्मक बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) गटाच्या झरि जामणी तालुका उपाध्यक्षपदी राकेश मरसकोल्हे, कुंडलिक मेश्राम, पुरुषोत्तम मोहितकर तर सचिव म्हणून राजेश पंधरे, कोषाध्यक्ष म्हणून अतिश तोडसम यांची नियुक्ती करण्यात आली तर शहर उपाध्यक्ष म्हणून गणेश पिस्तुलवार , अमर पुणवटकर यांची नियुक्ती करण्यात आली, या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी टाळ्यांच्या टाळ्यांचा कडकडाटाने स्वागत करण्यात आले. या नियुक्तीने झरि तालुक्यात पक्ष बळकटीला जोर येणार असल्याची चर्चा आहे.

उद्या झरी जामणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक बैठकीचे आयोजन व पक्ष प्रवेश

0

News Today 

झरी जामणी :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे दिनांक २९ ऑगस्ट रोजी झरी जामणी येथे महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांचे मार्गदर्कशाणाखाली करण्यात आले आहे. ही बैठक शासकीय विश्रामगृह, झरी येथे दुपारी ४ वाजता पार पडणार आहे. यावेळी तालुक्यातील विविध मान्यवर या पक्षात प्रवेश घेणार आहेत.

या बैठकीचे अध्यक्षस्थान वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर भूषविणार आहेत. प्रदेश संघटन सचिव रज्जाक भाई पठाण, समाज न्याय विभागाचे प्रदेश संघटन सचिव विजय नगराळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच वणी तालुका अध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सूर्यवीर चिकटे, जिल्हा प्रतिनिधी रामदास पखाले आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

बैठकीत पक्ष वाढीसाठी ठोस भूमिका घेणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुकांना प्रोत्साहन देणे व संघटन बळकटीसाठी आवश्यक नियोजन करणे या विषयांवर चर्चा होणार आहे.

बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी झरी तालुकाध्यक्ष प्रमोद थेरे व शहराध्यक्ष राकेश सोनम परिश्रम घेत असून, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तरी या बैठकीला तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून करण्यात आले आहे. 

वणी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ची नवीन कार्यकारिणी जाहीर, राजू वांढरे तालुकाध्यक्ष, तर प्रदीप खोब्रागडे सचिवपदी नियुक्त

0

News Today 

वणी (प्रतिनिधी) : वणी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)ने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  पार्टीच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन बळकट करण्यासाठी नवीन तालुका कार्यकारिणी जाहीर केली आहे. आज, दिनांक २७ रोजी दुपारी २ वाजता वणी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

या बैठकीस विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दिलीप भोयर अध्यक्षस्थानी होते, तर सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटन सचिव विजय नगराळे प्रमुख उपस्थितीत होते.

बैठकीदरम्यान तालुकाध्यक्षपदी राजू बापुराव वांढरे, तर सचिवपदी प्रदीप खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे, महेंद्र चांदोरे व प्यारेलाल मेश्राम यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून, संतोष रोगे यांची कोषाध्यक्ष म्हणून व सुरेंद्र झाडे यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली.

या वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा औपचारिक पक्ष प्रवेश करून त्यांचे स्वागत करण्यात आले. माजी तालुकाध्यक्ष प्रवीण खारकर यांनी स्वखुशीने आपला राजीनामा देत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

बैठकीस शहाराध्यक्ष विनोद ठेंगणे, युवा शाखेचे तालुकाध्यक्ष सूर्यवीर चिकटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामदास पखाले, मंगेश गोरे, अंकुश ठेंगणे, किशोर ठेंगणे, अमोल राऊत, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियुक्ती कार्यक्रमानंतर तालुक्यातील विविध स्थानिक समस्या, विकास आराखडे तसेच आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी व्यापक सदस्य नोंदणी मोहिमेसह नवे कार्यकर्ते जोडण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला.

या बैठकीनंतर वणी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) अधिक उत्साही व सज्ज दिसत असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष मजबूत पायाभूत रचनेसोबत मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

मोबाईल सेटिंग्जमध्ये अनधिकृत बदल – नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

0

News Today 

वणी, दि. २५ ऑगस्ट २०२५ :
मोबाईल सेटिंग्जमध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना परवानगीशिवाय बदल होणे हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या डिजिटल सुरक्षिततेवर तसेच वैयक्तिक माहितीच्या गुप्ततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडतर्फे प्रशासनाला निवेदन देत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी, शुक्रवार सकाळी ९ ते ११ या वेळेत त्यांच्या मोबाईलमध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय मोबाईल सेटिंग्ज आपोआप बदलल्या. ही बाब केवळ त्यांच्यापुरती मर्यादित नसून देशभरातील तब्बल ८० ते ९० टक्के मोबाईल वापरकर्त्यांच्या डायल पॅडमध्ये परवानगीशिवाय बदल झाल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.

या अनधिकृत बदलामुळे मोबाईल वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीची गुप्तता, डिजिटल व्यवहारांची सुरक्षितता तसेच इलेक्ट्रॉनिक साधनांच्या विश्वसनीयतेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती धोबे यांनी व्यक्त केली.

या संदर्भात मा. तहसीलदार, वणी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून त्यामध्ये पुढील मागण्या मांडण्यात आल्या आहेत –

  • मोबाईल सेटिंग्जमध्ये झालेल्या अनधिकृत बदलांची सखोल चौकशी करावी.

  • जबाबदार मोबाईल कंपन्या, सर्व्हर अथवा अॅप्लिकेशन्सचा तांत्रिक अहवाल सार्वजनिक करावा.

  • सामान्य नागरिकांच्या मोबाईल व माहिती सुरक्षिततेसाठी ठोस मार्गदर्शक तत्त्वे व उपाययोजना लागू कराव्यात.

  • इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) सहित सर्व शासकीय इलेक्ट्रॉनिक साधनांची स्वतंत्र तपासणी समितीमार्फत सुरक्षा तपासणी करण्यात यावी.

सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शासनाने तातडीने या प्रकरणी कार्यवाही करून नागरिकांना विश्वास द्यावा, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

या प्रसंगी आशिष रिंगोले, दत्ताभाऊ डोहे, वसंतभाऊ थेटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी वणी तालुक्यात राष्ट्रवादीची बुधवारी महत्वाची बैठक

0

News Today वणी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) वणी तालुक्याची महत्वाची बैठक बुधवार, दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी बरोबर १२ वाजता शासकीय विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शहराध्यक्ष विनोद ठेंगणे यांनी केले आहे.

बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून मा. रज्जाकभाई पठाण (राज्य संघटन सचिव) तसेच मा. विजयजी नगराळे (राज्य प्रतिनिधी सामाजिक न्याय विभाग) हे मार्गदर्शन करणार आहेत. तर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर हे राहणार आहेत.

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसंदर्भात महत्वाची चर्चा होणार असून, तालुक्यातील कार्यकारिणीची रचना देखील निश्चित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वणी तालुक्यातील विविध स्थानिक समस्या – शेतकऱ्यांचे वीज व पाणी प्रश्न, अपुऱ्या सिंचन सुविधा, रस्त्यांची दुरवस्था, बेरोजगारी, अपुरे आरोग्य सुविधा, तसेच शालेय विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी – या संदर्भातही चर्चा होणार आहे. या समस्यांवर ठोस भूमिका घेऊन, सरकारकडे पाठपुरावा करण्यासोबतच आवश्यकता भासल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे.

यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शहराध्यक्ष विनोद ठेंगणे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून बैठकीला यशस्वी करून संघटनेला बळकटी द्यावी, असे आवाहन केले आहे.

वणी येथे 7 सप्टें. रोजी म. रा. किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषद

0

News Today 

वणी — महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी येथे 7 सप्टें. ला दु.12 वाजता शेतकरी मंदीर येथे राज्यव्यापी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परीषदेला मार्गदर्शक म्हणुन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष काॅ.राजन क्षिरसागर (परभणी), प्रसिद्ध अर्तज्ञथ डाॅ.श्रिनीवास खांदेवाले(नागपूर),शेतकरी नेते काॅ.तुकाराम भस्मे(अमरावती), राज्याध्यक्ष अॅड.हिरालाल परदेशी (धुळे), राज्यसचिव काॅ.अशोक साेनारकर(अमरावती) आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे. परिषदेसाठी सर्व शेतकऱ्यांना क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या लढाऊ परंपरेने एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या परिषदेचे मुख्य मुद्दे–1)स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान हमी भावाचा कायदा करावा.
2)कापूस व सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करणे आणि शेतकऱ्यांना उत्पादनात हिस्सेदारी देणे.
3)आयात-निर्यात धोरण शेतकरी हिताच्या दृष्टीने ठरवणे.
4)पीक विमा कंपनी सरकारी असावी व नियम स्थानिक नैसर्गिक परिस्थिती पाहूनच ठरवावे.
5)सरकारी खरेदी केंद्रे वेळेत व पूर्ण क्षमतेने सुरू करणे, खुल्या बाजारातील लूट रोखणे.


6)जंगली जनावरांनी केलेल्या नुकसानीची तातडीने भरपाई करण्याचा कायदा करण्यात यावा.
‌ ही परिषद केवळ मागण्यांची यादी नसून शेतकरी हक्कासाठी ठाम संघर्षाची सुरुवात आहे. सर्व प्रगतिशील, लढाऊ, पुरोगामी विचारसरणीचे शेतकरी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावून शेतकरी चळवळ मजबूत करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य किसान सभा यवतमाळ जिल्हा कौन्सिलतर्फे काॅ.अनिल हेपट,अनिल घाटे,मोरेश्वर कुंटलवार,गणेश कळसकर,बंडु गोलर,वासुदेव गोहणे,रवि गोरे,गणेश शिटलवार,पंढरी मोहीतकर,पांडुरंग ठावरी,राकेश खामणकर,अथर्व निवडींग,सौ.छाया गावंडे,सुरेखा हेपट,प्रा.धनंजय आंबटकर,गुलाबराव उमरतकर,दिपक माहुरे,दिवाकर नागपुरे,संजय भालेराव,प्रा.प्रविण बंसोड,विजय ठाकरे,ऋषी उलमाले,दिलीप महाजन,अॅड.अरुण जवके,अमोल गौरशेट्टीवार,पि.जी.गावंडे,प्रदीप नगराळे, लक्ष्मणराव खंडारे आदींनी केले आहे.

मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0

News Today 

वणी :- मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर (वय 55 वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पोलिस दलासह नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

उमेश बेसरकर यांची बदली गेल्या वर्षी पुसद येथून होऊन ते मारेगाव येथे कार्यरत झाले होते. आपल्या शांत, मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात स्थान मिळवू शकले. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ते सदैव सक्त आणि तत्पर होते. आज तारीख २३ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांच्या छातीत दाटून आले आणि त्यांना वणी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता चिकित्सकांनी त्यांना मृत घोषित केले. 

त्यांच्या निधनामुळे मारेगावसह यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबियांचे दुःखात सहभागी होत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उमेश बेसरकर यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेरड पू. येथे शेतकऱ्यांचा पोळा सण उत्साहात संपन्न

0

वणी :- तालुक्यातील नेरड पू. आज ता. २२ रोजी  शुक्रवार शेतकऱ्यांच्या मित्र असलेल्या बैलांचा सन पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शेतकरी बांधवांमध्ये बैल सजविण्याची लगबग सुरू होती. बैलांना आंघोळ घालून रंगीत झगमगत्या सजावटीचे कपडे, मखमली झुल, गोंडे, घंटा व कड्या घालून त्यांची आकर्षक सजावट करण्यात आली.

संध्याकाळी गावातून सर्व  बैल जोड्या गावाबाहेरील हनुमान मंदिराच्या प्रांगणात एकत्रित आल्या व नंतर मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावकरी  “हर बोला हर हर हर हर महादेव” अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकत होते. पदावली भजनाचा देखील सुंदर कार्यक्रम झाला. महिलांनी पारंपरिक पद्धतीने बैलांची ओवाळणी केली.

संपूर्ण गावात या निमित्ताने आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेल्या बैलांचा सन्मान करत पोळा सण पारंपरिक उत्साहात साजरा झाल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले. 

वणीत इसमावर चाकू हल्ला, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

0

News Today 

वणी :- येथील पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या पटवारी कोणलीतील जीवन सातघरे या तरुणाविरुद्ध भांडण करून मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पटवारी कॉलनीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत गिरीधर पुसाम (वय 32, रा. पटवारी कॉलनी वणी यांच्यासोबत वाद घालून आरोपी जीवन भीमराव सातघरे शिवीगाळ करत धमक्या दिल्या. त्यानंतर आरोपीने फिर्यादीवर चाकू हल्ला करून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेची नोंद फिर्यादीने रात्री उशिरा वणी पोलीस ठाण्यात करून दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

दाखल गुन्हे असे :

कलम 118(1) : शांतता भंग करणे / भांडण, कलम 152(2) : गुन्हेगारी विश्वासघात / धमकी देणेz कलम 351(1) : हल्ला / मारहाण, कलम 352 : स्वेच्छेने दुखापत करणे, कलम 351(2) : गंभीर इजा करण्याचा प्रयत्न

पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मारोती पंडलिक पाटील यांच्याकडे सोपविला असल्याची माहिती आहे.

मोकाट जनावरांच्या समस्येवर मनसेचे ‘ढोरकी आंदोलन’ शहराध्यक्ष अंकुश बोढे यांचा अनोखा गुराखी अवतार; प्रशासनाची नमती भूमिका

0

News Today 

वणी (प्रतिनिधी):
शहरातील मोकाट जनावरे, त्यातून होणारे अपघात आणि नागरिकांच्या वाढत्या हालअपेष्टा या गंभीर समस्येकडे वारंवार निवेदनं देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखे आंदोलन छेडले. वणी शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी थेट गुराख्याचा पोशाख परिधान करून ‘ढोरकी’ अवतार घेतला आणि कार्यकर्त्यांसह शहरातील मोकाट जनावरे हाकत ढोल-ताशांच्या गजरात नगर परिषदेच्या आवारात नेऊन सोडली. या हटके आंदोलनामुळे प्रशासनात प्रचंड गोंधळ उडाला तर दुसरीकडे शहरभरात याची जोरदार चर्चा रंगली आहे.

पार्श्वभूमी : अपघातांची मालिका व नागरिकांची त्रस्त अवस्था

गेल्या काही महिन्यांपासून वणी शहरात रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे.

मुख्य रस्त्यांवर गायी-वासरं, बैल यांची वर्दळ सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत होते.

अनेक लहानमोठे अपघात घडून नागरिक जखमी झाले आहेत.

या विषयावर मनसेकडून वारंवार निवेदनं, पत्रव्यवहार करण्यात आला.

मात्र प्रशासनाने समस्या सोडविण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने अखेर मनसेने संघर्षाचा मार्ग स्वीकारला.

आंदोलनाचा थरार : गुराखी अवतार, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणाबाजी

२१ ऑगस्ट रोजी सकाळी शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी पारंपरिक गुराखी पोशाख घातला. त्यांच्या सोबत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फौज होती.

रस्त्यावरील मोकाट जनावरे एकत्र करून ढोल-ताशांच्या तालावर ते नगर परिषदेच्या दिशेने निघाले.

अचानक जनावरांचा कळप व मागे घोषणा देणारे कार्यकर्ते पाहून अधिकारी व कर्मचारी अचंबित झाले.

नगर परिषद आवारात पोहोचताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध नोंदवला.

प्रशासनाची प्रतिक्रिया : मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन

या अनपेक्षित आंदोलनामुळे दबावाखाली आलेल्या मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
त्यांनी आश्वासन दिले की –

शहरातील उपलब्ध गोशाळांची व कोंडवाड्यांची क्षमता तपासून,

पुढील पाच दिवसांत मोकाट जनावरे तिथे स्थलांतरित केली जातील.

या लेखी आश्वासनानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले.

मनसेची चेतावणी : पुढे जनावरे, कुत्रे व डुकरे थेट दालनात!

आंदोलनानंतर शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी इशारा दिला –

“नगर परिषदेने आजवर आमच्या पत्रांना केराची टोपली दाखवली. जर पाच दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर पुढच्यावेळी शहरातील मोकाट जनावरे, कुत्रे आणि डुकरे थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आणून सोडू.”

उपस्थिती व जनचर्चा

या आंदोलनात तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, धीरज पिदुरकर, शंकर पिंपळकर, मयुर गेडाम, मयुर घाटोळे, गोविंदराव थेरे, रमेश पेचे, लक्की सोमकुंवर, जुबेर खान, योगेश ताडम, हिरा गोहोकार, अहमद रंगरेज, अक्षय बोकडे, गौरव पुराणकर, सूरज पळसकर, वैभव पुराणकर, कृष्णा नीमसटकर, मनिषा नवघरे, हर्षल दांडेकर, कन्हैया पोद्दार, साहिल येरने, सूरज कोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

निष्कर्ष

मनसेच्या या ‘ढोरकी आंदोलनामुळे’ प्रशासनासोबत संपूर्ण शहराचे लक्ष वेधले गेले आहे. आता प्रत्यक्षात नगर परिषद पुढील पाच दिवसांत काय कारवाई करते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.