News Today
वणी, दि. २५ ऑगस्ट २०२५ :
मोबाईल सेटिंग्जमध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना परवानगीशिवाय बदल होणे हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या डिजिटल सुरक्षिततेवर तसेच वैयक्तिक माहितीच्या गुप्ततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडतर्फे प्रशासनाला निवेदन देत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी, शुक्रवार सकाळी ९ ते ११ या वेळेत त्यांच्या मोबाईलमध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय मोबाईल सेटिंग्ज आपोआप बदलल्या. ही बाब केवळ त्यांच्यापुरती मर्यादित नसून देशभरातील तब्बल ८० ते ९० टक्के मोबाईल वापरकर्त्यांच्या डायल पॅडमध्ये परवानगीशिवाय बदल झाल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.

या अनधिकृत बदलामुळे मोबाईल वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीची गुप्तता, डिजिटल व्यवहारांची सुरक्षितता तसेच इलेक्ट्रॉनिक साधनांच्या विश्वसनीयतेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती धोबे यांनी व्यक्त केली.

या संदर्भात मा. तहसीलदार, वणी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून त्यामध्ये पुढील मागण्या मांडण्यात आल्या आहेत –
-
मोबाईल सेटिंग्जमध्ये झालेल्या अनधिकृत बदलांची सखोल चौकशी करावी.
-
जबाबदार मोबाईल कंपन्या, सर्व्हर अथवा अॅप्लिकेशन्सचा तांत्रिक अहवाल सार्वजनिक करावा.
-
सामान्य नागरिकांच्या मोबाईल व माहिती सुरक्षिततेसाठी ठोस मार्गदर्शक तत्त्वे व उपाययोजना लागू कराव्यात.
-
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) सहित सर्व शासकीय इलेक्ट्रॉनिक साधनांची स्वतंत्र तपासणी समितीमार्फत सुरक्षा तपासणी करण्यात यावी.

सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शासनाने तातडीने या प्रकरणी कार्यवाही करून नागरिकांना विश्वास द्यावा, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
या प्रसंगी आशिष रिंगोले, दत्ताभाऊ डोहे, वसंतभाऊ थेटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



