
News Today
वणी (प्रतिनिधी) : वणी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)ने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्टीच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन बळकट करण्यासाठी नवीन तालुका कार्यकारिणी जाहीर केली आहे. आज, दिनांक २७ रोजी दुपारी २ वाजता वणी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

या बैठकीस विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दिलीप भोयर अध्यक्षस्थानी होते, तर सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटन सचिव विजय नगराळे प्रमुख उपस्थितीत होते.
बैठकीदरम्यान तालुकाध्यक्षपदी राजू बापुराव वांढरे, तर सचिवपदी प्रदीप खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे, महेंद्र चांदोरे व प्यारेलाल मेश्राम यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून, संतोष रोगे यांची कोषाध्यक्ष म्हणून व सुरेंद्र झाडे यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली.

या वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा औपचारिक पक्ष प्रवेश करून त्यांचे स्वागत करण्यात आले. माजी तालुकाध्यक्ष प्रवीण खारकर यांनी स्वखुशीने आपला राजीनामा देत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
बैठकीस शहाराध्यक्ष विनोद ठेंगणे, युवा शाखेचे तालुकाध्यक्ष सूर्यवीर चिकटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामदास पखाले, मंगेश गोरे, अंकुश ठेंगणे, किशोर ठेंगणे, अमोल राऊत, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियुक्ती कार्यक्रमानंतर तालुक्यातील विविध स्थानिक समस्या, विकास आराखडे तसेच आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी व्यापक सदस्य नोंदणी मोहिमेसह नवे कार्यकर्ते जोडण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला.
या बैठकीनंतर वणी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) अधिक उत्साही व सज्ज दिसत असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष मजबूत पायाभूत रचनेसोबत मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



