News Today
वणी, दि. 20 जुलै : वणी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, परमडोह येथे शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती वणी यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनानुसार, शाळेतील एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती झाल्याने शाळेत शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे. शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असून उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
रिक्त झालेल्या पदावर तातडीने शिक्षक नियुक्त करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच, योग्य कालावधीत मागणीची पूर्तता न झाल्यास तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते संदीप थेरे, शाळा समिती अध्यक्ष महेंद्र देहारकर व्यक्त केली आहे.


