लाभार्थ्यांच्या तक्रारींची चौकशी करा; राकाँपचे दिलीप भोयर यांचे तहसीलदारांना निवेदन
News Today
झरी जामनी : संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे प्रलंबित अर्ज, मंजूर प्रकरणांचे रखडलेले अनुदान तसेच लाभार्थ्यांकडून कथित आर्थिक व्यवहाराची मागणी होत असल्याच्या तक्रारींची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
संजय गांधी निराधार योजनेतील अनेक गरीब, वयोवृद्ध व गरजू लाभार्थी मागील वर्षभरापासून आपल्या प्रकरणासाठी तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. काही लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर होऊनही त्यांचे अनुदान अद्याप खात्यात जमा झालेले नाही. तसेच आर्थिक व्यवहार करणाऱ्या लाभार्थ्यांची कामे प्राधान्याने केली जात असून, आर्थिक व्यवहार करण्यास असमर्थ असलेल्या गरजू लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवली जात असल्याच्या तक्रारी निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
या संदर्भात संबंधित लिपिक सूत्रावे यांच्या संपूर्ण कार्यकाळातील कामकाजाची कार्यालयीन चौकशी करून, चौकशी निष्पक्षपणे होण्यासाठी त्यांचा तत्काळ टेबल बदलण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. तसेच प्रलंबित सर्व प्रकरणांची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ तातडीने मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
गरीब व निराधार नागरिकांसाठी शासनाने सुरू केलेल्या योजनेत कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार किंवा अडवणूक होत असल्यास तो अत्यंत गंभीर प्रकार असून, त्यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचे दिलीप भोयर यांनी यावेळी सांगितले. संबंधित तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
सदर निवेदन तहसीलदार अक्षय रासने यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती, झरीचे उपसभापती मंगेश मोहितकर, सामाजिक कार्यकर्ते हरिदास गुर्जलवार तसेच प्रलंबित निराधार लाभार्थी कमलाबाई धोटे, इंदिराबाई निखाडे, कमलबाई निखाडे, मोतीराम कुमरे, जनाबाई मोहरले, साहिल खाडे, कल्पना अहिलापुरम, यशोदा विरुटकर, पार्वती खुलसंगे, सखुबाई बोरकर, ताराबाई आसुटकर, बाबाराव निमकर आदी उपस्थित होते.
यावेळी पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव उपस्थित होते.


