एका आयफोनच्या जिद्दीसाठी कुटुंब झाले उद्धवस्त
News Today
छत्रपती संभाजीनगर : मोबाईल फोनच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादाचे अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारे रूप समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर १८ वर्षीय तरुणाने दरीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांचाही दरीत पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर धक्कादायकरीत्या आईनेही दरीत उडी घेतल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल चांदवडे हा तरुण मोबाईल फोनच्या मुद्द्यावरून कुटुंबीयांशी नाराज झाला होता. त्यानंतर तो खवड्या डोंगराच्या कड्यावर जाऊन उभा राहिला. त्याला समजावून परत आणण्यासाठी कुटुंबीयांसह स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे तीन तास प्रयत्न केले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तसेच त्याच्या आई-वडिलांनी त्याला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी मुलाला परत येण्याची विनवणी केली. मात्र, समजावण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर तरुणाने दरीत उडी घेतली. त्याला वाचविण्यासाठी पुढे गेलेले वडील मुरलीधर चांदवडे हेही खाली कोसळले.
मुलगा आणि पती दरीत कोसळल्याचे पाहून आई संगीता चांदवडे यांनीही टोकाचे पाऊल उचलत दरीत उडी घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.

केवळ मोबाईलचा प्रश्न की त्यामागे आणखी काही?
या घटनेनंतर सोशल मीडियावर ‘आयफोनसाठी तीन जीव गेले’ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. मात्र, केवळ मोबाईल फोन हाच या घटनेमागील अंतिम कारण होता, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. १८ वर्षांच्या तरुणाने एवढ्या टोकाच्या निर्णयापर्यंत का जावे, त्यामागे कोणते मानसिक किंवा कौटुंबिक कारण होते, याचा तपास होणे गरजेचे आहे.
या घटनेने आधुनिक जीवनशैली, मोबाईलचे वाढते व्यसन, मुलांच्या अपेक्षा, पालकांचे संस्कार आणि तरुणांच्या मानसिक आरोग्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एखाद्या वस्तूसाठी किंवा क्षणिक रागातून आयुष्य संपविण्याचा निर्णय घेणे किती भयंकर परिणाम घडवू शकते, याची जाणीव या घटनेने करून दिली आहे.
सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरही प्रश्नचिन्ह
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर काही अत्यंत संतप्त आणि असंवेदनशील प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, अशा प्रसंगी दोषारोप किंवा अपमानास्पद भाषा वापरण्याऐवजी घटनेमागील परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.
मुलाने घेतलेला निर्णय चुकीचा होता, यात शंका नाही; मात्र त्याला वाचविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धडपडणाऱ्या आई-वडिलांनाही दोष देणे योग्य ठरणार नाही. उलट, या घटनेतून पालक आणि तरुण दोघांनीही भावनिक संकटाच्या प्रसंगी संवाद, संयम आणि तातडीची मदत घेण्याचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे.
एका कुटुंबातील तीन जीवांच्या या दुर्दैवी अंताने मोबाईलपेक्षा माणसांचे आयुष्य कितीतरी मौल्यवान आहे, हा अत्यंत वेदनादायी संदेश समाजासमोर ठेवला आहे.


