Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeNewsअड्याळ टेकडी प्रकरण तापले; गुरुदेवभक्तांचा आंदोलनाचा इशारा, वरोऱ्यातून दिले निवेदन

अड्याळ टेकडी प्रकरण तापले; गुरुदेवभक्तांचा आंदोलनाचा इशारा, वरोऱ्यातून दिले निवेदन

तहसीलदारांचा मालकी हक्कासंदर्भातील अहवाल मागे घेण्याची मागणी; वरोरा एसडीओंना निवेदन

News Today 

वरोरा प्रतिनिधी : ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील भक्त निवासाच्या बांधकामाला देण्यात आलेली मंजुरी, जमिनीच्या मालकी हक्काचा वाद आणि तहसीलदारांनी दिलेल्या अहवालावरून गुरुदेवभक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा; अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वरोरा तालुक्यातील गुरुदेव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

यासंदर्भात गुरुदेव मंडळाच्या वतीने सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी वरोरा येथील उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांना निवेदन देण्यात आले. अड्याळ टेकडीवरील जमिनीच्या मालकी हक्काचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत असताना शासन निधीतून भक्त निवासाचे बांधकाम सुरू करण्यात आल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच २८ जुलै २०२६ रोजी तहसीलदारांनी दिलेला मालकी हक्कासंदर्भातील अहवाल वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचा आरोप गुरुदेवभक्तांनी केला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या भू-वैकुंठ समितीमार्फत अड्याळ टेकडी परिसरात अनेक वर्षांपासून आध्यात्मिक, सामाजिक व जनजागृतीचे कार्य सुरू आहे, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित जमिनीवर समितीचा दीर्घकाळ ताबा व वहिवाट असल्याचेही गुरुदेव मंडळाच्या प्रतिनिधींनी नमूद केले आहे.

अड्याळ टेकडीवरील मालकी हक्कासंदर्भात काही संस्थांनी न्यायालयात दावे दाखल केले होते. मात्र कनिष्ठ न्यायालय तसेच जिल्हा न्यायालयाने संबंधित दावे फेटाळल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यानंतर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या कार्यवाहीत भू-वैकुंठ समितीच्या ताबा व वहिवाटीबाबत अनुकूल निरीक्षण झाल्याचा दावा गुरुदेव मंडळाच्या प्रतिनिधींनी केला आहे.

दरम्यान, २२ जुलै २०२६ रोजी तलाठी मंडळाने केलेल्या पंचनाम्यात ग्रामपंचायतीच्या अधिकारक्षेत्रासंदर्भातील मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर २८ जुलै रोजी तहसीलदारांनी अड्याळ टेकडीवरील काही गट क्रमांकांवर अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळ, मोझरी यांची मालकी असल्याचा अहवाल दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या अहवालालाच गुरुदेवभक्तांनी तीव्र विरोध दर्शविला असून, तो तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.

तीन प्रमुख मागण्या

गुरुदेव मंडळाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाकडे भक्त निवासाच्या बांधकामास देण्यात आलेली मंजुरी रद्द करावी, तहसीलदारांचा मालकी हक्कासंदर्भातील अहवाल मागे घ्यावा आणि या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

अड्याळ टेकडी प्रकरणावरून गुरुदेवभक्तांचा असंतोष दिवसेंदिवस वाढत असून, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच विविध जिल्ह्यांतील हजारो गुरुदेवभक्तांना आंदोलनात सहभागी करून घेण्याची तयारी सुरू असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.

यावेळी वाल्मिक वैद्य, कुंदन वाटकर, प्रबोधनकार आशिष माणूसमारे, सुधाकर गोवरदीपे, माणिक डुकरे, डॉ. अंकुश आगलावे, गुलाब गाडगे, चंद्रशेखर वाटकर यांच्यासह वरोरा तालुक्यातील गुरुदेव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुदेवभक्तांच्या धार्मिक भावना तसेच न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान राखून प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष व वस्तुनिष्ठ चौकशी करून कायदेशीर आणि पारदर्शक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी शासन-प्रशासनाची राहील, असा इशारा गुरुदेव मंडळाच्या प्रतिनिधींनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter