
ग्रामगीता तत्त्वज्ञानाचार महायज्ञ व पालखी पदयात्रा शिबिर महोत्सवाचे आयोजन
News Today
गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) :
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त यावर्षीही श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज मोझरी येथे विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ९ ते ११ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणाऱ्या या पुण्यतिथी महोत्सवात “ग्रामगीता तत्त्वज्ञानाचार महायज्ञ” व “पालखी पदयात्रा शिबिर महोत्सव” या प्रमुख कार्यक्रमांचा समावेश असून देशभरातील श्रद्धाळू व अनुयायांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विविध विषयांवर मार्गदर्शन
शिबिर महोत्सवात समाजजीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवर सत्रे आयोजित केली जाणार आहेत. त्यामध्ये “ग्रामगीता प्रणित आदर्श गाव निर्माण संकल्प”, “ग्रामसभा व नागरिकांचे अधिकार व कर्तव्य”, “ग्रामनाथांच्या समस्या व उपाय” यासारख्या ग्रामविकासाशी संबंधित सत्रांचा समावेश आहे. तसेच “सर्वधर्म समन्वय संमेलन”, “अनिष्ट रूढी तोडणाऱ्यांचा सत्कार”, “युवक संमेलन”, “महिला संमेलन” व “सप्तखंजरी वादक समाज प्रबोधन” या कार्यक्रमांद्वारे समाजजागृती घडवून आणली जाणार आहे.

मौन श्रद्धांजलीचा विशेष क्षण
पुण्यतिथी महोत्सवातील विशेष कार्यक्रम म्हणून शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित भाविकांनी दोन मिनिटे मौन पाळून राष्ट्रसंतांना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक–आध्यात्मिक सोहळा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या “ग्रामगीता” या ग्रंथामध्ये ग्रामविकास, नैतिकता, सर्वधर्म समन्वय आणि सामाजिक परिवर्तनाचे विचार मांडले आहेत. त्यांचा वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा पुण्यतिथी महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आयोजक मंडळाने सांगितले.
या अध्यात्म–सामाजिक सोहळ्यात सहभागी होऊन राष्ट्रसंतांच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा तसेच कार्यक्रमांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.



