Saturday, May 2, 2026
Google search engine
Home Blog Page 26

वणी येथे खरीप हंगामपूर्व नियोजनाची तालुका स्तरीय आढावा बैठक उत्साहात पार पडली

0

News Today 

वणी (प्रतिनिधी): वणी येथील महसूल भवनात तालुका कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम २०२५ पूर्व नियोजनाची तालुका स्तरीय आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. संजय देरकर होते.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे विधानसभा अध्यक्ष मा. दिलीप भोयर, इंजी. कुंडलिक ठावरी, अविनाश राऊत, भगवान मोहिते, डॉ. जगन जूनगरी, डॉ. बोबडे, पांढरकवड्याचे उपविभागीय कृषी अधिकारी चंदन निगोट , तसेच वणी तालुका कृषी अधिकारी पवन कावरे, झरी तालुका कृषी अधिकारी अमोल आमले, मारेगाव तालुका कृषी अधिकारी दीपाली खवलेआदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत बोलताना आमदार संजय देरकर यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड आणि शेतीपूरक व्यवसायांकडे वळावे, असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांमध्ये कृषीविषयक जागृती निर्माण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे गरजेचे आहे.”

बैठकीला वणी विधानसभा क्षेत्रातील कृषी विभागाचेअधिकारी, कर्मचारी, कृषी सेवा केंद्रांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. खरीप हंगामासाठी बियाणे, खते, कीडनाशके, सिंचन व्यवस्था व विविध योजनांची अंमलबजावणी यावर सखोल चर्चा करण्यात आली.

मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि समस्यांवर उपाय सुचवले. सकारात्मक चर्चासत्राने बैठकीचा समारोप झाला.

वणीचा गौरव – कु. स्वरा गोखरे हिला S.S.C. परीक्षेत ९६% गुण – 

0

News Today

वणी : येथील वसंत गंगा बिहार येथील रहिवासी जयंत गोखरे यांची कन्या स्वरा गोखरे हिने यंदाच्या दहावीच्या (S.S.C.) परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून वणी शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.

स्वराने आपल्या अथक परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास व पालकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामध्ये कुटुंबातील सर्वांचा मोठा सहभाग असून, तिला मिळालेले हे यश नवोदित विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरणारे आहे.

स्वराच्या या यशाबद्दल परिसरातून आणि शाळेकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच शिक्षक व नातेवाइकांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

वाळूचा मार्ग मोकळा : घरकुल धारकांसाठी मोठा दिलासा, आ. संजय देरकर यांच्या पाठपुराव्याला यश

0

News Today 

वणी  (प्रतिनिधी) – घरकुल धारकांना शासनमान्य ५ ब्रास वाळू तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी आमदार संजय देरकर यांनी जिल्हाधिकारी मीना यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून वाळू प्रश्नावर तोडगा काढला आहे. या चर्चेच्या माध्यमातून अनेक गरजू लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

आज दुपारी ४.०० वाजता आमदार संजय देरकर यांच्या घरी तालुक्यातील घरकुल लाभार्थी महिला व पुरुषांनी आमदार यांना घेराव घातला व घरकुलासाठी वाळूची मागणी केली. यावेळी आमदार देरकर यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याशी फोनवर चर्चा केली.

या चर्चेत त्यांनी घरकुलासाठी लागणारी वाळू तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, ज्या ग्रामपंचायती वाळू वाहतुकीस सक्षम आहेत, त्यांनी तहसीलदार कार्यालयात तत्काळ अर्ज करावा. अशा ग्रामपंचायतींना वाहतुकीसाठी आवश्यक ती परवानगी देण्यात येईल.

या निर्णयामुळे घरकुल बांधकामासाठी वाळू मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि लाभार्थ्यांना वेळेत घरकुल पूर्ण करता येईल. आमदार संजय देरकर यांच्या पुढाकारामुळे आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे वाळू प्रश्नावर यशस्वी तोडगा निघाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, सुधीर थेरे, इंजी. कुंडलिक ठावरी, अनिल देरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व सक्षम ग्राम पंचायतींनी वाळूसाठी गुरुवारला तहसील कार्यालयात हजर राहावे – आ. संजय देरकर यांचे आवाहन

वणी विधानसभेतील सर्व घरकुल धारणा लागणाऱ्या वाळूसाठी वाळूची वाहतूक करणाऱ्या सक्षम ग्राम पंचायतींनी आपापल्या लाभार्थ्यांची यादी व ग्राम पंचायतीच्या लेटर पॅडवर मागणी पत्र घेऊन घरकुल लाभार्थ्यांना सोबत घेऊन तारीख १५ मे रोजी गुरुवारला सकाळी ११. वाजता आपापल्या वणी, मारेगाव, झरि जामनी तहसील कार्यालयात आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार संजय देरकर यांनी केले आहे.

पुरड – कुंड्रा रस्त्यावर बंद सेन्सर पेव्हरने थेट डांबरीकरण; कंत्राटदारांची मनमानी, सा. बां. विभागाचे अधिकारी मौन

0

News Today 

वणी, ता. १३ मे  तालुक्यातील पुरड – कुंड्रा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या रस्त्याच्या विकासासाठी मंजूर केलेल्या करोडो रुपयांच्या निधीचा योग्य वापर न होता, बंद सेन्सर पेव्हरचा वापर करून थेट डांबरीकरण करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

या कामासाठी उच्च प्रतीचा दर्जा राखण्याच्या सूचना असूनही कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत आहेत. सेन्सर पेव्हर वापरल्यास रस्ता समतोल, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारा होतो, हे सर्वज्ञात असतानाही केवळ खर्च वाचवण्यासाठी आणि वेळ चुकवण्यासाठी ही चाल खेळली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

PWD (सार्वजनिक बांधकाम विभाग) चे अधिकारी मात्र या साऱ्या प्रकाराकडे डोळेझाक करत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही ना तपासणी झाली, ना कारवाई. यामुळे प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यातील साठगाठ असल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.

स्थानिकांनी काम त्वरित थांबवून गुणवत्तेची चौकशी करण्याची, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. 

ग्रामस्थांच्या मते, “सरकारी निधीचा असा अपव्यय खपवून घेतला जाणार नाही. जर प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशी भूमिका ग्रामस्त घेत आहे.

बघा व्हिडिओ

चारगाव (शिरपूर) घाटावर वाळू सत्याग्रह आंदोलनाची घोषणा; भाजप नेत्यांचा सरकारविरोधी एल्गार

News Today 

वणी (प्रतिनिधी) – “गरिबांच्या हक्काचे वाळू राजकारणाच्या गटारात जाऊ देणार नाही,” अशा ज्वलंत भावना व्यक्त करत वणी तालुक्यातील चारगाव (शिरपूर) घाटावर वाळू सत्याग्रह आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलन दिनांक १५ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, याचे नेतृत्व भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर करणार आहेत. पिदुरकर ही स्वतः भाजपाचे पदाधिकारी असून चक्क सरकारच्या विरोधात आंदोलन करीत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे.

विरोधकांच्या आंदोलनांनी सरकारची गोची होणे अपेक्षित असते, पण यावेळी विशेष बाब म्हणजे केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्या सरकारविरोधात भाजपच्याच नेत्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे हा मुद्दा अधिकच गाजण्याची शक्यता आहे.

वाळू धोरण गरिबांसाठी संकट निर्माण करणारे

सध्याचे वाळू उत्खनन धोरण गरिबांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ठरत असून, स्थानिकांना व घरबांधणी करणाऱ्या गरीब कुटुंबांना मोठा फटका बसत आहे. गावपातळीवर वाळू सहज उपलब्ध नसल्याने सामान्य जनतेला अवाजवी दराने वाळू खरेदी करावी लागत आहे, तर दुसरीकडे दलालांचे राजकारण फोफावले आहे.

सरकारच्या भूमिकेवरच भाजप नेत्यांचा सवाल

माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी थेट सरकारलाच जबाबदार धरत, “गरिबांची कामं थांबली, भ्रष्टाचाराने बळ मिळवले, आणि वाळू माफियांना पाठबळ मिळतंय. हे आम्ही चालू देणार नाही,” असा रोखठोक इशारा दिला आहे.

राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ

सत्ताधाऱ्यांच्याच गोटातील नेत्यांनी सरकारविरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकप्रकारे खळबळ माजली आहे. १५ मे रोजी होणाऱ्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, हे आंदोलन फक्त वाळू प्रश्नापुरते मर्यादित राहते की अन्य मुद्द्यांनाही गती मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सत्तेत असूनही विरोधाची भूमिका घेणं हे भाजपचं दुटप्पी – संजय निखाडे जिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा गट 

सत्तेत असूनही विरोधाची भूमिका घेणं हे भाजपचं दुटप्पी राजकारण दर्शवतं,” अशी परखड प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी दिली. त्यांनी म्हटलं की, “केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही भाजपकडून जनतेला दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाळू धोरणावर स्वतःचं अपयश लपवण्यासाठी आंदोलनाचा दिखावा केला जातोय.”

निखाडे पुढे म्हणाले, “जर निर्णय घेण्याची क्षमता नसती तर भाजपने सत्तेवर राहण्याचा नैतिक हक्क गमावला आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी हे असं आंदोलन केलं जातंय, हे दुर्दैवी आहे.”

ही प्रतिक्रिया भाजपच्या धोरणांवर व कृतीवर कठोर सवाल उपस्थित करत असून, सत्ताधाऱ्यांची जबाबदारी झटकण्याची प्रवृत्ती निखाडे यांनी स्पष्टपणे उघड केली आहे.

वाळूच्या आंदोलनात टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार – दिलीप भोयर अध्यक्ष , वणी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट

वणी तालुक्यात वाळूच्या नावाखाली सुरु असलेलं राजकारण हे केवळ जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. काहीजण वाळू आंदोलनाच्या आडून केवळ टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहेत. खरे मुद्दे बाजूला ठेवून स्वार्थ साधण्याचा हा प्रकार जनतेला माहीत आहे. वाळूची धोरण हे सरकार ठरवत असतात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांना माहीत आहे. की घरकुलासाठी वाळू गरजेची आहे. तरी देखील गरीबांना वाळू न मिळण्यासाठी यांनी धोरणे आखली आहे. आणि हे आंदोलन जर करत असेल तर सरकार आहे कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

करायचेच असेल तर मुख्यमंत्र्यांचा आणि पालक मंत्र्यांचा निषेध करून आंदोलन कराव आम्ही सोबत राहू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी व्यक्त केली. 

आज वाघदरा येथे रस्ते सुधारणा व मोरी बांधकामाच्या कामासाठी भूमिपूजन समारंभ , आमदार संजय देरकर करणार भूमिपूजन

0

News Today 

वणी (ता. प्र. ) –  तालुक्यातील वाघदरा  जोड  मार्गावर सुमारे १.५० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सुधारणा व २०० मीटर मोरी बांधकाम कामासाठी भूमिपूजन समारंभ आज ता. १३ मे रोजी दुपारी ४ वाजता विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या जि.प. बांधकाम विभाग क्रमांक १, यवतमाळ यांच्या अंतर्गत अंदाजे ३४ लाख ६३ हजार ३८२ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

या भूमिपूजन समारंभाचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. शितलताई गौरकार, सरपंच प्रा.ग्रा. वाघदरा ह्या उपस्थित असणार आहे. तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच व मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित राहणार आहे.

या रस्त्याच्या कामामुळे वाघदरा या गावाची दळणवळण सुधारेल तसेच स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधीही मिळतील, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. दिनांक १३ मे २०२५ रोजी हा समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यर्त्यांनी तसेच शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकारी , शाखा प्रमुख व सर्व प्रतिष्ठित ग्रामवासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

वणी तालुक्यातील पुरड – कुंड्रा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; एकाच वर्षात मार्ग उध्वस्त होण्याची शक्यता

0

News Today 

वणी (प्रतिनिधी): वणी तालुक्यातील पुरड ते कुंड्रा मार्गाचे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने करण्यात आले असून, अवघ्या एका वर्षात हा रस्ता उखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदार यांनी गंभीर दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक जनतेतून होत आहे.

सदरील रस्त्याचे डांबरीकरण सेन्सर पेव्हरच्या साहाय्याने करणे आवश्यक होते, मात्र सेन्सर बंद ठेवून पारंपरिक पद्धतीने हे काम करण्यात आले. त्याचबरोबर, रस्त्यावरील बी.सी. (Bituminous Concrete) कोट हा नियमाप्रमाणे ५० एम.एम. असायला हवा होता, परंतु प्रत्यक्षात तो २५ एम.एम. पेक्षाही कमी जाडीचा टाकण्यात आल्याचे उघड झाले आहे.

बी.टी. कोटही सेन्सरशिवाय साधारण पद्धतीने टाकण्यात आल्यामुळे संपूर्ण मार्गाचा दर्जा अत्यंत हलका असून यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराला ‘जनतेच्या पैशाची उधळपट्टी’ संबोधत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ आणि सक्त कारवाईची मागणी केली आहे.

संपूर्ण प्रकरणात उपविभागीय अभियंता परताणी आणि शाखा अभियंता राठी हे दोघेही डोळ्यावर पट्टी बांधून आंधळेपणाने वागत असल्याचे आरोप भोयर यांनी केले. यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे.

स्थानिक नागरिक आणि जनप्रतिनिधींनी या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. 

 

जी.आर.एन. कंपनीने दिलेला शब्द फिरवला; भाकपचे पुन्हा कामबंद आंदोलन सुरू

0

स्थानिक बेरोजगारांना रोजगार नाकारल्याचा आरोप; आंदोलन ‘भाकप स्टाईल’ने उग्र करण्याचा इशारा

News Today 

वणी (जि. यवतमाळ), १० मे:
बेलोरा (निलजई) परिसरातील जी.आर.एन. कंपनीत स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देण्याचे लेखी आश्वासन देऊनही कंपनीने फक्त ड्रायव्हर पदांपुरतेच भरती करत इतर पदांवरील नियुक्तीपासून स्थानिकांना वंचित ठेवले आहे. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) पुन्हा एकदा कामबंद आंदोलन सुरू केले असून, हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

२५ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान भाकपच्या नेतृत्वाखाली कंपनीसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर ३५ स्थानिक बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यावरून आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, आता कंपनी केवळ ड्रायव्हर पदांसाठीच स्थानिकांची निवड करत असून, लेबर किंवा इतर पदांसाठी बाहेरील मजुरांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप भाकपने केला आहे.

भाकप वणी विधानसभा क्षेत्राचे नेते काॅ. अनिल हेपट, जिल्हा सचिव काॅ. अनिल घाटे, शिंदोला जि.प. सर्कलचे नेते काॅ. मोरेश्वर कुंटलवार, व काॅ. मिलींद रामटेके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आंदोलनात शेकडो युवक सहभागी झाले आहेत.

काॅ. अनिल हेपट यांनी स्पष्ट इशारा दिला की, “कंपनीने तात्काळ आपले आश्वासन पूर्ण करावे अन्यथा भाकप स्टाईलने आंदोलन तीव्र करण्यात येईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी कंपनीवर राहील.”

स्थानिक युवकांचा रोजगाराचा मुद्दा पुन्हा एकदा पेट घेत असून, प्रशासन आणि कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.

यवतमाळ येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा ट्रॅक्टर मोर्चा तात्पुरता स्थगित

0

News Today

वणी, ८ मे – देशात सध्या उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांवर नियोजित केलेला ट्रॅक्टर मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करून घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती वणी येथील आमदार संजय  देरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र देशहिताचा विचार करत शिवसेना पक्षाने संयमाचे धोरण स्वीकारले असून लवकरच नव्याने आंदोलनाची तारीख जाहीर करण्यात येईल, असे आमदार संजय देरकर यांनी स्पष्ट केले आहे.

पक्षाच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असून सध्याच्या संवेदनशील परिस्थितीत हा निर्णय अत्यंत योग्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

नांदेपेरा चौकात वाढत्या वाहतूक अडथळ्यांविरोधात संभाजी ब्रिगेडचे निवेदन 

0

News Today  प्रतिनिधी, वणी

नांदेपेरा मार्गे वणी शहरात येणाऱ्या अवैध वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक अडचणींवर उपाययोजना कराव्यात, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय पांडुरंग धोबे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १ मे २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी वणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नांदेपेरा चौकातून शहरात येणाऱ्या अवैध ट्रक व मालवाहतूक वाहनांमुळे सायंकाळच्या वेळेत नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि पर्यावरणाचेही नुकसान होत आहे.

या पार्श्वभूमीवर चौकात लावण्यात आलेल्या CCTV कॅमेर्‍यांचे तातडीने परीक्षण करून खालील तीन प्रमुख बाबींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

CCTV फुटेजचे बारकाईने परीक्षण करावे.

अवैध वाळू वाहनधारकांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

भविष्यात अशा प्रकारची वाहतूक अडचण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.

रात्री ९च्या नंतर पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत अविध्य वाळू वाहतुकीने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.