News Today
वणी, प्रतिनिधी : महसूल विभाग, वणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” कार्यक्रमाच्या प्रसिद्धी साहित्यामध्ये स्थानिक खासदार प्रतिभा धानोरकर यांचा समावेश न करण्यात आल्याचा मुद्दा काँग्रेस पक्षाकडून उपस्थित करत उपविभागीय अधिकारी, महसूल विभाग, वणी यांच्याकडे तालुका अध्यक्ष विवेक पानघाटे यांनी लेखी स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एस.बी. हॉल, वणी येथे आदिवासी विकास विभाग मंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” हे शासनाचे लोकाभिमुख पाऊल असून अशा उपक्रमांमुळे नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळत असल्याने या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
मात्र, या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी महसूल विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रिका, निमंत्रणपत्रिका, सोशल मीडियावरील प्रचार साहित्य तसेच कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या मुख्य बॅनरमध्ये संबंधित मतदारसंघाच्या स्थानिक खासदारांचे नाव व छायाचित्र नसल्याचे निदर्शनास आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्थानिक खासदार हे मतदारसंघातील जनतेचे लोकनियुक्त प्रतिनिधी असून शासनाच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये त्यांना प्रोटोकॉलनुसार योग्य स्थान मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे संबंधित खासदारांचे नाव व छायाचित्र प्रसिद्धी साहित्यामधून वगळण्यामागील कारण काय, याबाबत महसूल विभागाने स्पष्ट स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, भविष्यात महसूल विभाग अथवा शासनामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व अधिकृत कार्यक्रमांच्या निमंत्रणपत्रिका, बॅनर, पोस्टर्स, सोशल मीडिया प्रसिद्धी साहित्य तसेच इतर प्रचार माध्यमांमध्ये संबंधित लोकप्रतिनिधींना शासनाच्या नियमांनुसार व प्रोटोकॉलनुसार योग्य प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक स्पष्टीकरण द्यावे तसेच भविष्यात अशा प्रकारची त्रुटी पुन्हा होणार नाही यासाठी योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.


