Thursday, April 16, 2026
Google search engine
HomeUncategorized१७३३ कोटींचा निधी – पण वणीकरांना दिले खड्डे, कोसळलेल्या शाळा आणि ना...

१७३३ कोटींचा निधी – पण वणीकरांना दिले खड्डे, कोसळलेल्या शाळा आणि ना मिळाला रोजगार !” जनतेचा संताप उफाळला : “हा निधी कागदावरच खर्च झाला की काय?”

जनतेचा संताप उफाळला : “हा निधी कागदावरच खर्च झाला की काय?”

News Today

वणी :- विधानसभा मतदारसंघात मागील दहा वर्षांत तब्बल १७३३ कोटी विकास निधी आल्याचा दावा माजी आमदारांकडून करण्यात आला. मात्र वास्तव इतके भयावह आहे की गावोगावी खड्ड्यांनी भरलेले रस्ते, पावसात वाहणाऱ्या वर्गखोल्या, पाण्यासाठी आणि वीजेसाठी तडफडणारे शेतकरी, तर बेरोजगारीसोबत झुंजणारे तरुण – एवढेच लोकांच्या पदरी पडले. त्यामुळे वणीकरांचा संताप ऊफाळून आला असून, “१७३३ कोटी कुठे गाडले?” असा थेट सवाल चौकाचौकात घुमतोय.

रस्त्यांवर खड्ड्यांचा महास्फोट

वणी–कोरपना राज्य मार्गाची अवस्था ‘मृत्यूचा सापळा’ म्हणून लोक ओळखू लागले आहेत. खोल खड्डे आणि खोलीसमान गटारांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. इतकेच नव्हे तर चंद्रपूर–मुकुटबन बससेवाही थांबवावी लागली. प्रवाशांना हजारो रुपयांचा खर्च करून खाजगी प्रवास करावा लागत आहे.

शिक्षण ठप्प, शाळा उध्वस्त

उच्चशिक्षणाचे मोठे दावे करण्यात आले; पण दहा वर्षांत एकाही नवीन महाविद्यालयाचा शिलान्यास झाला नाही. ग्रामीण शाळांमध्ये वर्गखोल्यांचे छप्पर गळते, पावसाळ्यात मुले पिशव्या नव्हे तर बादल्या घेऊन बसतात. मुलांच्या भवितव्याशी असा निर्दयी खेळ हेच का विकासाचं चित्र?

शेतकरी उध्वस्त – सिंचन गायब

निधीच्या नावाखाली मोठ्या जाहिराती केल्या गेल्या, पण सिंचन प्रकल्प कागदावरच अडकले. शेतकऱ्यांना वीजपुरवठा अपुरा, पंप बंद, पिकं नष्ट; अशा परिस्थितीत शेतकरी हताश झाला आहे. निधीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळालाच नाही.

तरुणांची पळवाट – बेरोजगारी पसरली

रोजगारनिर्मितीसाठी एकही ठोस प्रकल्प उभा राहिला नाही. मोठ्या उद्योगांचेच नव्हे तर छोटे व्यवसायिक प्रकल्पही सुरू झालेले नाहीत. त्यामुळे तरुणांना रोजगारासाठी नागपूर, पुणे, मुंबईकडे पलायन करण्यावाचून पर्याय उरलेला नाही.

नागरिकांची घणाघाती टीका

स्थानिक लोकांचा आवाज आज ठाम आहे –
“माजी आमदारांनी फक्त बिगाऱ्याच्या गाढवाला पिसं लावल्यासारखे दाखवे केले. १७३३ कोटींचा गौऱवगीत गायलं, पण आम्हाला खड्ड्यांशिवाय काहीच दिसलं नाही. आमच्या स्वप्नांचा, विकासाचा आणि भविष्याचा सुद्धा खड्डाच खोदला!

अंतिम सवाल

दहा वर्षांत ‘१७३३ कोटींचा गाजावाजा’ झाला, पण वणीकरांना मिळालं काय? उद्ध्वस्त रस्ते, ढासळलेली शिक्षणसंस्था, शेतीचं विनाश आणि बेरोजगारांचे टोळके. त्यामुळेच आज एकच आक्रोश ऐकू येतोय—
“१७३३ कोटी कुठे गेले, कोणाच्या खिशात गेले?”असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter