शेतकरी नरेंद्र झाडे यांचा इशारा; उपसरपंचासह संबंधित सहायक पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी
मारेगाव, दि. १९ ऑक्टोबर २०२६ : दिलीप भोयर
कुंभीपोड पाझर तलाव परिसरातून आपल्या मालकीची सुमारे १५ वर्षे जुनी इलेक्ट्रिक मोटार पंप काढून नेल्याप्रकरणी मागील पाच दिवसांहून अधिक काळ उलटूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करीत साराटी येथील शेतकरी नरेंद्र गोविंदा झाडे यांनी प्रशासनाला तातडीचे निवेदन सादर केले आहे. या प्रकरणात २४ तासांच्या आत कायद्यानुसार ठोस कार्यवाही करून लेखी माहिती द्यावी; अन्यथा बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून तहसील कार्यालय, मारेगाव येथे न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
झाडे यांच्या तक्रारीनुसार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री अंदाजे १ ते २ वाजताच्या दरम्यान कुंभीपोड पाझर तलाव परिसरातून त्यांच्या मालकीची इलेक्ट्रिक मोटार पंप त्यांच्या संमतीशिवाय काढून नेण्यात आली. सदर मोटार सुमारे १५ वर्षे जुनी असून तिची अंदाजे किंमत ३० हजार रुपये आहे. शेतीच्या सिंचनासाठी वापरली जाणारी मोटार काढून नेल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात प्रशांत परशुराम टेकाम यांच्याविरुद्ध त्यांनी तक्रार केली आहे. मोटार काढून नेण्यामागील अधिकार काय होता, ती कोणाच्या ताब्यात आहे आणि तिची विक्री किंवा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला आहे काय, याची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा आधार नेमका काय?
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी उपशासंदर्भात आदेश दिल्यामुळे मोटार काढून नेण्यात आली असून गुन्हा नोंदविण्याची गरज नसल्याचे मारेगाव पोलीस स्टेशनच्या संबंधित सहायक पोलीस निरीक्षकांनी सांगितल्याचा आरोप झाडे यांनी केला आहे. मात्र, संबंधित आदेशात मोटार काढून नेण्याची स्पष्ट परवानगी होती काय, प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी कोणाला अधिकार देण्यात आला होता आणि लागू प्रक्रिया पाळण्यात आली काय, याची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी
मोटार काढून नेल्याबाबत तक्रार करूनही योग्य कायदेशीर कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप करीत झाडे यांनी संबंधित सहायक पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेची स्वतंत्र वरिष्ठस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तक्रारीतून दखलपात्र गुन्हा उघड होत असल्यास लागू कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा. तसेच कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा किंवा गैरवर्तन झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध नियमानुसार विभागीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मोटार काढून नेल्याप्रकरणी २४ तासांत कायद्यानुसार निर्णय घेऊन कार्यवाहीची लेखी माहिती द्यावी, प्रशांत परशुराम टेकाम यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हा उघड होत असल्यास FIR नोंदवून निष्पक्ष तपास करावा, मोटार पंपाचा शोध घेऊन ती सुरक्षित ठेवावी आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार परत मिळवून द्यावी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची लागूता आणि मोटार काढून नेण्याच्या कार्यवाहीची अधिकृतता तपासावी, संबंधित सहायक पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करून दोष आढळल्यास विभागीय कारवाई करावी.
या निवेदनाच्या प्रती वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना देण्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कायद्यानुसार कार्यवाही करावी, अन्यथा आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असे नरेंद्र झाडे यांनी स्पष्ट केले आहे.


