राष्ट्रपतींना निवेदन; निष्पक्ष चौकशी करून संविधानिक अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी
News Today
वणी, दि. १६ ऑक्टोबर : दिल्ली येथे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्याबाबत आंदोलनादरम्यान घडलेल्या कथित अनुचित प्रकाराचा वणी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून लोकशाही व संविधानिक मूल्यांचे संरक्षण करावे, या मागणीसाठी राष्ट्रपती महोदया यांना उपविभागीय अधिकारी, वणी यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाला जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा, आपले मत मांडण्याचा आणि शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, आंदोलनादरम्यान लोकप्रतिनिधींशी घडणाऱ्या अनुचित घटनांमुळे लोकशाही मूल्ये, संविधानिक अधिकार आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात, अशी भूमिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून मांडली.
संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या संविधानिक अधिकारांचे संरक्षण करावे तसेच नागरिकांचा अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंतीही राष्ट्रपतींकडे करण्यात आली.
लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे ही लोकशाही व्यवस्थेची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी वणी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.
या वेळी वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकेश पानघाटे, वणी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जय आबड यांच्यासह संजय खाडे, टिकाराम कोंगरे, डॉ. कावडे, ओम ठाकूर, वंदना आवारी, डेविड पेरकावार, फरीद शेख, सुधीर खंडाळकर, जगदीश चौधरी, राजेश कोरडे, करुणा कांबळे, अल्का मोवाडे, काजल शेख, रामदास कुचणकर, अनिल ठाकुरवार, सुरेश बन्सोड, अशोक नागभीडकर, सुरज पुल्लेवार, रोहित मालेकर, मनोज वाकटी, कुंदन पेंदोर, निखिल मडावी, तेजराज बोढे, नीलिमा काळे, सतीश पुसदकर, प्रदीप खेकारे, अविनाश पानघाटे, पंजाब कुमरे, प्रा. वऱ्हाटे आणि रवि कांबळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


