News Today
मुर्धोनी व नेरड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराविरोधात वणी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषण आंदोलनाचा दुसऱ्या दिवशी तोडगा निघाला. गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी ठोस कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनाच्या तोडग्यासाठी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर, शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख संजय निखाडे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हा संपर्क प्रमुख विजयबाबू चोरडिया, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष गजानन विधाने, मनीष सुरावार, माजी सभापती सुधाकर गोरे, विनोद मोहितकर, किशोर नांदेकर, गजानन किन्हेकर, गणपत लेडांगे कॉ. अनिल घाटे आदींनी पुढाकार घेतला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना नारळपाणी पाजून उपोषणाची औपचारिक सांगता करण्यात आली.
प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानुसार, मुर्धोनी ग्रामपंचायतीतील गैरप्रकारांची चौकशी दिनांक २७ जानेवारी रोजी चौकशी समितीकडून करण्यात येणार आहे. तसेच नेरड ग्रामपंचायतीची फेरचौकशी दिनांक २९ जानेवारी रोजी करण्यात येईल. या चौकशी प्रक्रियेला गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार स्वतः उपस्थित राहणार असून, ज्या ग्रामसेवकांच्या कार्यकाळात गैरप्रकार घडले आहेत त्यांना चौकशीच्या दिवशी उपस्थित ठेवून प्रत्यक्ष चौकशी करून दोषींवर ठोस कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी नेरड गावातील संजय लेडांगे, पांडुरंग ठावरी, गणपत आमने, मनोज ठावरी, रोशन तुरनकर, बंडू झाडे, विठ्ठल लेडांगे, विठ्ठल ठावरी, बबन ठावरी, बाबाराव तुरणकर, रवींद्र तलांडे, महादेव कुमरे, गुलाब राखुंडे, सागर वैद्य, सतीश झाडे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच मुर्धोनी गावातील संदीप भोयर, भारत कारडे, अजय भोयर, प्रेम उमरडेकर, मुन्ना येरेकर, नयन आवारी, ज्ञानेश्वर घुले, संदीप कार्लेकर, प्रवीण फलके आदी नागरिकही उपस्थित होते.
उपोषणाची सांगता होत असताना दोन्ही गावांतील असंख्य नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली. वेळेत कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.



