Friday, April 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedलिंकिंगद्वारे खत खरेदीची सक्ती — कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या जिल्हा प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

लिंकिंगद्वारे खत खरेदीची सक्ती — कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या जिल्हा प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

News Today 
वणी (प्रतिनिधी): शेतकरी अस्मानी व दुष्काळी संकटात सापडलेले असताना खत खरेदीसाठी जबरदस्तीचा प्रकार समोर आला आहे. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या खत कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधी भूपेंद्र पाल सिंग (रा. यवतमाळ) यांच्यावर लिंकिंगद्वारे खते खरेदीची सक्ती केल्याप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई झरी-जामणी तालुक्यातील कृषी विक्रेत्यांच्या तक्रारीनंतर करण्यात आली. स्थानिक कृषी निविष्ठा विक्रेत्यांना अनुदानित युरिया, डीएपी सोबत कंपनीची इतर खते खरेदी करण्यास सक्ती करण्यात येत असल्याची बाब उघड झाली होती. यवतमाळ जिल्हा कृषी साहित्य उत्पादक आणि विक्रेता असोसिएशनने या प्रकरणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते.

त्यानंतर झरी तालुका कृषी अधिकारी घनश्याम वसंत बहिरम यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून पाटण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी भूपेंद्र पाल सिंग हे कृषी विक्रेत्यांना युरिया किंवा डीएपी खत देताना इतर खते लिंक करून खरेदी करण्याची सक्ती करत होते. काही विक्रेत्यांनी नकार दिल्यास त्यांना विना-लिंकिंग खते देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही नमूद आहे.

या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3(2) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 7 नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाटण पोलिसांकडून सुरू आहे.

कृषी विभागाकडून अशा प्रकारच्या सक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला असून शेतकऱ्यांमध्ये या कारवाईनंतर समाधानाचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter