News Today दिलीप भोयर
वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील कायर गावातील अजय पांडुरंग शेंडे (वय ३०) या तरुणाने आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे. काल, दिनांक २९ सप्टेंबर रोजी ब्राह्मणी फाट्याजवळ या तरुणाचा मृतदेह आढळून आला. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
शोध घेतल्यावर मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असता तो कायर (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील रहिवासी असल्याचे समोर आले. सदरचा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून आज ३० रोजी सकाळी घटनास्थळी कायर येथील काही तरुण गेले असता त्यांना एका रुमालीत एक कृषी केंद्राचे बिल आढळले. त्यावरच त्याने आत्महत्येचे कारण स्पष्टपणे लिहिले आहे की, मी अजय शेंडे रा. कायर ओबीसीतून मराठा समजले आरक्षण दिल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. या चिठ्ठीची सत्यता अजून पर्यंत पडताळणी झाली नसून पोलिसांनी याचा कसून तपास करण्याची गरज आहे. सदरची चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली नसल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली आहे. आधीच ओबीसी समाजात मराठा आरक्षणाच्या संदर्भात तीव्र अस्वस्थता आहे. अशातच अजय शेंडे यांच्या मृत्यूमुळे या प्रश्नाला अधिक गंभीर वळण मिळन्याची शक्यता आहे.
ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, “सरकारने तात्काळ लक्ष घालून ओबीसी समाजाचा विश्वास संपादन केला पाहिजे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल.” अशी चर्चा सुरू झाली आहे.
अजय शेंडे यांचा मृत्यू हा केवळ एका तरुणाचा बळी नसून, ओबीसी समाजाच्या मनात दडलेल्या असंतोषाचा व भावनिक जखमेचा ज्वालामुखी आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
राज्यभर या घटनेची चर्चा सुरू झाली असून, “ओबीसींच्या हक्कांवर कुठल्याही परिस्थितीत गदा येऊ देणार नाही” अशा घोषणांनी वातावरण तयार होत आहे. येत्या काही दिवसांत या प्रश्नावरून मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
टीप – न्यूज टुडे सदर चिठीची पडताळणी करीत नाही. कृपया नोंद घ्यावी. संपादक



