News Today
वणी : स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील खंडोबा-वाघोबा देवस्थान सभागृह येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेत शालेय गट (वर्ग ६ ते १०) यांना “लोकमाता अहिल्याराणी होळकर यांचे लोककल्याणकारी कार्य” हा विषय देण्यात आला होता, तर खुल्या गटासाठी “OBC (VJ, NT, SBC) च्या उज्ज्वल भवितव्यासाठी जातनिहाय जनगणना आजची गरज” हा विषय ठेवण्यात आला होता. या दोन्ही गटांत मिळून एकूण ४६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन समाजसेविका सौ. निलिमाताई काळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रा. बाळासाहेब राजूरकर होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये संजय खाडे (संचालक, कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई), प्रदीप बोनगीरवार (अध्यक्ष, सुशगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, वणी), आशिष खुलसंगे (अध्यक्ष, वसंत जिनिंग, वणी), रमेश बुच्चे (सेवानिवृत्त प्राचार्य), धनराज भोंगळे (माजी नगरसेवक) आणि भैयाजी पिंपळकर यांचा समावेश होता.

संजय खाडे यांनी आपल्या भाषणात तरुणांना प्रेरित करताना सांगितले की, “वक्तृत्व ही केवळ कला नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. तरुणांनी आपल्या विचारांना निर्भयपणे मांडले पाहिजे.”
स्पर्धेतील परीक्षक म्हणून नामदेवराव जेनेकर, प्रा. विजय बोबडे आणि लक्ष्मण इद्दे यांनी काम पाहिले. स्पर्धकांच्या परखड व सखोल विचारांनी परीक्षक व उपस्थित श्रोते भारावून गेले.

विजेत्यांमध्ये शालेय गटातून तरफीया शेख हिने प्रथम क्रमांक पटकावला. मनस्वी घोनमोडे व पूर्वी देशमुख यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. खुल्या गटातून प्रेम जरपोतवार प्रथम, जगदीश भगत द्वितीय तर हर्षल साळवे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमात ओबीसी समाजरत्न पुरस्कार प्रा. दिलीप मालेकार यांना तर ओबीसी समाजभूषण पुरस्कार नामदेवराव जेनेकर आणि किशोर ओचावर यांना प्रदान करण्यात आले.

मनोगतात बोलताना ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांनी वक्तृत्व स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “वक्तृत्व ही केवळ बोलण्याची कला नसून, समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे आणि स्वतःला प्रभावीपणे व्यक्त करण्याचे साधन आहे. स्पर्धा, कार्यशाळा आणि नियमित सरावाने हे कौशल्य आत्मसात करता येते.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ कांडरकर यांनी केले. संचालन योगिता विरुटकर व विलास शेरकी यांनी तर स्वागतगीत अशोक चौधरी यांनी सादर केले.

आयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय, श्री गुरुदेव सेवा मंडळ, सावर्ला तसेच OBC (VJ/NT/SBC) जातनिहाय जनगणना समिती, वणी-झरी-मारेगाव यांनी संयुक्तपणे केले होते. आयोजकांनी पुढील वर्षीही ही स्पर्धा घेण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेंद्र बुच्चे यांनी आभार मानले.



