
News Today
नेरड (पू.) येथे शनिवारी पार पडलेली ग्रामसभा तब्बल पाच तास चालली आणि वातावरण तापलेलेच राहिले. सरपंच कार्तिकाताई कुचनकर अध्यक्षस्थानी होत्या तर उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक उपस्थित होते.

गावकऱ्यांनी घरकुल यादी, वॉटर फिल्टर प्रकल्प, गावातील रस्ते, सामान्य फंड, १५वा वित्त आयोग निधी तसेच विविध जमा-खर्चाचा हिशोब या मुद्द्यांवर सरळसरळ प्रश्न विचारून पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

भाऊराव चीने, विठ्ठल ठावरी, गणपत आमने, मनोज ठावरी, प्यारेलाल मेश्राम, दिलीप भोयर, देवराव ताजने, बबन ठावरी, दिनेश कुचणकर, संजय लेडांगे , बंडू झाडे, अतुल पिदुरकर, संतोष झाडे, मारोती झाडे, यांसारख्या अनेक नागरिकांनी खर्चातील तफावतीं केलेल्या कामासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली.

काही आर्थिक तफावती निदर्शनास आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी खर्चाचा तपशील सादर करून खुलासा दिला, ज्यामुळे नागरिकांचा काही अंशी संताप निवळला.

विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत प्रथमच ग्रामसभा पूर्ण कोरमसह पार पडली. यावेळी गावातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला, ज्यामुळे ग्रामसभेला ऐतिहासिक स्वरूप लाभले.



