Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedवणीतील महिलांची मागणी उफाळली – शहरात महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची तात्काळ गरज, न....

वणीतील महिलांची मागणी उफाळली – शहरात महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची तात्काळ गरज, न. प. ला निवेदन


नगरपरिषद प्रशासनास निवेदन; लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा

वणी (प्रतिनिधी) :-
वणी शहर हे यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख व्यापारी केंद्र असून येथे दररोज हजारो महिला खरेदी-विक्रीच्या कामानिमित्त शहरी व ग्रामीण भागातून ये-जा करतात. परंतु एवढ्या मोठ्या लोकवस्तीच्या शहरात महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक प्रसाधनगृह उपलब्ध नसणे, ही आजच्या प्रगत काळात अत्यंत लाजिरवाणी व गंभीर बाब ठरत आहे.

हीच बाब लक्षात घेऊन सौ. वृषालीताई प्रवीण खानझोडे, माजी उपसभापती पं. स. वणी यांच्या नेतृत्वाखाली वणी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शहरातील चार प्रमुख चौकांमध्ये महिला प्रसाधनगृहांची तात्काळ निर्मिती करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. संबंधित चौकांमध्ये खालील ठिकाणांचा समावेश आहे:

  1. छत्रपती शिवाजी महाराज चौक

  2. साई मंदिर चौक

  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक

  4. महात्मा गांधी चौक

नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शहरी व ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने वणी शहरात खरेदीसाठी येतात, त्यामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होते. मात्र त्याच महिलांसाठी अत्यंत आवश्यक असलेली सुविधा – सार्वजनिक प्रसाधनगृह – कुठेही उपलब्ध नसणे ही शोकांतिका आहे.

गेल्या ११ वर्षात शहरात विविध विकासकामांचे मोठ्या गाजावाजात उदघाटन झाले, रस्ते, गटारी, दिवे, चौक, उद्यान यामध्ये भरपूर निधी खर्च करण्यात आला, मग महिलांसाठी आवश्यक असलेल्या प्रसाधनगृहासाठी निधी का उपलब्ध होऊ शकत नाही? असा प्रश्न आता महिलांमध्ये उभा राहत आहे.

‘लाडक्या बहिणीं’ची उपेक्षा!

सध्या शासन ‘लाडक्या बहिणी’चा मान महिलांना देत आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या मुलभूत गरजांकडेच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षितता या दृष्टीने सार्वजनिक महिला शौचालयांची अत्यंत आवश्यकता असून नगरपरिषदेकडे वारंवार निवेदने, तक्रारी दिल्यानंतरही काहीही हालचाल न झाल्याचे महिलांनी नमूद केले.

तीव्र आंदोलनाचा इशारा

या निवेदनाच्या अखेरीस प्रशासनाने जर याबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास, येत्या काही दिवसांत वणी व परिसरातील महिला वर्ग रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
ही मागणी फक्त सुविधा नसलेल्या महिलांची नसून, त्यांच्या आरोग्य, प्रतिष्ठा व सुरक्षिततेशी निगडित आहे, आणि तिच्याकडे वेळेवर लक्ष दिले गेले नाही, तर प्रशासनाच्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असे महिलांनी स्पष्ट केले.

निवेदन प्रसंगी उपस्थित महिला:

या निवेदनप्रसंगी सौ. वृषालीताई खानझोडे यांच्यासोबत पूजा पानघाटे, शिला मेश्राम, पुष्पाताई आत्राम, ईशा ठाकुरवार, मंदा सोनारखन, सुवर्णा चतुर, उज्वला कोवे, ललिता खैरे, कांचन सिडाम, पौर्णिमा तूराणकर व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

📝 निष्कर्ष:
शहराच्या मुख्य चौकांत महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची गरज ही केवळ मागणी नसून महिलांच्या प्रतिष्ठेचा व आरोग्याचा प्रश्न आहे. प्रशासनाने यावर तात्काळ निर्णय घेऊन कृती आरंभ करणे अपेक्षित आहे. अन्यथा वणी शहरात उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter