News Today
वणी :- ग्रामपंचायत मुर्धोनी व नेरड येथील कथित आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार तसेच दोषींवर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ २२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजतापासून वणी येथील तहसील कार्यालयासमोर दोन्ही गावांतील नागरिकांनी एकाच मंडपात बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. दोन्ही गावांच्या मागण्या स्वतंत्र असल्या तरी प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात हे आंदोलन एकत्रित स्वरूपात छेडण्यात आले आहे.
या उपोषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सदर पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर व कॉम्रेड अनिल घाटे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आंदोलनास औपचारिक सुरुवात करण्यात आली.
या उपोषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सदर पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर व कॉम्रेड अनिल घाटे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आंदोलनास औपचारिक सुरुवात करण्यात आली.
मुर्धोनी ग्रामपंचायतीतील तत्कालीन सरपंच व सचिव यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या विविध निधींमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या गैरव्यवहारांची सखोल व पारदर्शक चौकशी करून संबंधित प्रकरणांचा लेखी अहवाल देण्यात यावा, तसेच ग्रामपंचायत लेखासंहितेनुसार रोखड बुक व बँक स्टेटमेंटच्या आधारे तक्रारदार गावकऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी, पंचनामा व चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तर नेरड ग्रामपंचायतीतील नागरिकांनी दोषी आढळलेल्या तत्कालीन सरपंच, सचिव व संबंधित अधिकाऱ्यांवर ग्रामपंचायत अधिनियमानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी लावून धरली आहे. तसेच झालेल्या गैरव्यवहाराची रक्कम वसूल करून दोषींवर निलंबनाची तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या बेमुदत आमरण उपोषणात नेरड येथील संजय लेडांगे, पांडुरंग ठावरी, गणपत आमने, मनोज ठावरी, रोशन तुरनकर, बंडू झाडे, विठ्ठल लेडांगे, विठ्ठल ठावरी, बबन ठावरी, रवींद्र तलांडे, महादेव कुमरे, गुलाब राखुंडे, सागर वैद्य, सतीश झाडे आदी सहभागी झाले आहेत.
मुर्धोनी येथील संदीप भोयर, भारत कारडे, अजय भोयर, प्रेम उमरडेकर, मुन्ना येरेकर, नयन आवारी, ज्ञानेश्वर घुले, संदीप कार्लेकर, प्रवीण फलके आदी नागरिक उपोषणात सहभागी आहेत.
प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या निवेदनांवर अद्याप ठोस निर्णय न घेतल्यामुळे नागरिकांना आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, तसेच वेळेत दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.



