कुंड्रा मार्गावरील बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी
News Today (मंगेश गोरे)
वणी, ता. २५ सप्टेंबर – तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कुंड्रा गावाकडे जाणारी बससेवा मागील वर्षापासून बंद असल्यामुळे शालेय विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वणी आगाराकडे तात्काळ बससेवा सुरू करण्याचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य व वणी पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकर गोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले.

कुंड्रा गावासह शिरपूर, वेळाबाई, मोहदा, कृष्णापूर, पुरड, मुकुटबन या मार्गावर बससेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करत आहेत. आर्थिक व सामाजिक स्तरावर विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून ग्रामीण प्रवाशांनाही दैनंदिन व्यवहारासाठी प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यावेळी सुधाकर गोरे म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून बससेवा बंद असल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, शेतकरी व सामान्य लोकांना दैनंदिन कामांसाठी प्रवास करणे अवघड झाले आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ही बससेवा तात्काळ सुरू करावी, अन्यथा आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील.”

या मागणीसाठी दिलेल्या निवेदनावर किशोर नांदेकर, बंटी ठाकूर, अमित केशवाणी, सजू तोमस्कर, डॉ. राजूरकर, अंकुश भाऊ ठावरी आदींच्या स्वाक्षऱ्या असून गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला.
नागरिकांची अपेक्षा आहे की प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शिरपूर–कुंड्रा–मुकुटबन मार्गावरील बससेवा पुन्हा सुरू करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल.



