

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा कोणताही जनसंपर्क नसल्याने मतदारांमध्ये उमटला नाराजीचा सूर

News Today
वणी (प्रतिनिधी) : वणीत नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच भाजपच्या छावणीत असंतोषाचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. पक्षाने कोणताही जनसंपर्क किंवा स्थानिक ओळख नसलेल्या महिलेला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. तर दुसरी कडे शिंदे सेनेच्या झंझावताने माजी आमदाराला चांगलाच घाम फुडत आहे. त्यामुळे भाजपच्या हवा सर्वत्र गुल होताना दिसून येत आहे.

अनेक वर्षे पक्षासाठी रात्रंदिवस परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडत बाहेरील उमेदवाराला पुढे करून पक्ष नेतृत्वाने स्वतःच्या पायावर धोंडा मारल्याचे बोलले जात आहे.२ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी २६ नोव्हेंबरपासून अधिकृत प्रचाराला सुरुवात होणार असली तरी वणीत राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.

राज्यात शिंदे सेना आणि भाजप अनेक ठिकाणी एकत्र लढत असतानाच वणीत मात्र शिंदे गटाने स्वतंत्र झेंडा फडकवत भाजपसमोर गंभीर आव्हान उभे केले आहे.विजयबाबू चोरडिया यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेने आपल्या संघटकीय व राजकीय कौशल्याच्या बळावर भाजपचे अनेक स्थानिक कार्यकर्ते आपल्या गोटात ओढण्यात यश मिळवले आहे.

त्यामुळे भाजपला ‘भाडोत्री’ प्रचारकांच्या जोरावर निवडणुकीचा डंक वाजवावा लागत आहे. घराघरातून नाराजीचा सूर उमटत असून ‘भाजपने आमच्याच कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला’ अशा भावना उफाळल्या आहेत.नगरसेवक उमेदवारीच्या वाटपातही कार्यकर्त्यांच्या मताला थारा मिळाला नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी गुप्तपणे शिंदे सेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्धार केला असल्याच्या चर्चाही जोमात आहेत.

राजकीय जाणकारांच्या मते, स्थानिक पातळीवर शिंदे सेनेचा वाढता प्रभाव, भाजपमधील आंतरिक कलह आणि उमेदवारीतील गैरसमज हे घटक भाजपच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. आगामी नगर परिषद निवडणुकीत वणीतील हा रोष ‘मतपेटीतला स्फोट’ ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.





