Friday, April 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedवणी शहरात राजकीय भूकंप — भाजपचे दिग्गज नेते विजय चोरडिया यांचा शिंदे...

वणी शहरात राजकीय भूकंप — भाजपचे दिग्गज नेते विजय चोरडिया यांचा शिंदे गटात प्रवेश; भाजपचा वाजला खुळखुळा

News Today

दिलीप भोयर

वणी (प्रतिनिधी): वणी शहराच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ व प्रभावशाली नेते, समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे विजय चोरडिया यांनी भाजपला “जय श्रीराम” ठोकत “जय महाराष्ट्र” म्हणून शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत झाला. माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश झाल्याची माहिती आहे. 

चोरडिया यांनी शिंदे गटाचा झेंडा हातात घेत “जय महाराष्ट्र!” च्या घोषणांनी वातावरण दणाणून टाकले. त्यांच्या प्रवेशामुळे वणी शहरातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक राजकारणात शिंदे गटाची पकड अधिक मजबूत होत असून भाजपच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

विजय चोरडिया हे वणी शहरात सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांमुळे अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे सर्वपक्षीय संबंध चांगले असल्याचेही पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांत त्यांच्या नेतृत्वामुळे भाजपला वणी परिसरात मजबूत पायाभरणी मिळाली होती. मात्र, पक्षातील सततचा उपेक्षाभाव आणि  एका (मामा) माजी आमदाराकडून होणारा अपमान यामुळे त्यांनी अखेर भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिंदे गटात प्रवेशानंतर बोलताना चोरडिया म्हणाले, “वणीच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी गती मिळेल, असा मला विश्वास आहे.”

राजकीय वर्तुळात या हालचालीने खळबळ उडाली असून, येत्या नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाचा दावा अधिक बळकट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या वणी शहरात चर्चेचा एकच विषय आहे —
“भाजपचा खुळखुळा वाजला, शिंदे गटाचा जयघोष झाला!” या घडामोडीनंतर वणीचे राजकारण नव्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter