दीन दुगणी तर रात्र चौगणी उलाढाल, सताधरी अधिकारी मतवाल, पर्यावरणाचे हाल बेहाल
दिलीप भोयर
News Today
चंद्रपूर, २० जून: कोळशी घाटाच्या नदीपात्रात एकाच रात्री तब्बल २५ ते ३० लाख रुपयांच्या वाळूची बेकायदेशीर उलाढाल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रोक्लेम मशीनच्या सहाय्याने शेकडो हायवा टिप्परद्वारे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे हे सर्व काही महसूल विभागाच्या डोळ्यांदेखत होत असूनही त्यांनी डोळ्याला पट्टी बांधल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यात सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी चांगलेच हात साफ करून घेत असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, वाळू उपसा करण्यासाठी कायदेशीर रॉयल्टी टीपी (ट्रान्झिट पास) असलेल्या काही वाहनांचा वापर करण्यात येतो. मात्र, या टीपीचा एकाहून अधिक वेळा वापर करून, म्हणजेच एकाच टीपीवर अनेक चकरा करून, वाळूची मोठ्या प्रमाणावर चोरी केली जात आहे. ही बाब थेट महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
स्थानिक पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात आवाज उठवला असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. नदीपात्रात अवैध वाळू उपसण्यामुळे पर्यावरणावरही विपरित परिणाम होत आहे. नदीपात्राची खोली वाढल्यामुळे परिसरातील भूगर्भजल पातळीही घटत आहे.

या प्रकाराकडे शासन आणि पोलिस प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देऊन वाळू माफियांवर अंकुश ठेवावा, अशी जनतेची जोरदार मागणी आहे. अन्यथा, महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे अशा प्रकारची वाळू तस्करी आणखी वाढू शकते.
घुगुस येथील भाजपच्या एका “विवेक” नामक मास्तरचा कोळशी घाटावरील वाळूच्या तस्करीत मोठा सहभाग



