
२० तारखेपासून वाळू घरकुल धारकांना मिळण्याचे संकेत
News Today
वणी (प्रतिनिधी) – वणी तालुक्यातील घरकुल विकासकामांसाठी तहसीलदार वणी यांनी ४५०० ब्रास वाळूच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे सादर केला आहे. संबंधित प्रस्ताव खाणीकर्म विभागाने मंजूर केला असून, अंतिम निर्णयासाठी तो जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

मात्र, काल तारीख १५ रोजी जिल्हाधिकारी विकास मीना यांची अमरावती येथील विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली असल्याने वाळूसंबंधीचा प्रस्ताव सध्या प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

वाळूच्या उपलब्धतेचा प्रश्न सध्या वणी तालुक्यातील अनेक विकासकामांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर हे सातत्याने पाठपुरावा करीत आहे.

वणी बरोबर मारेगाव तहसील कार्यालयात देखील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचे उपस्थितीत वाळू संदर्भात बैठक संपन्न झाली असता यावेळी तहसीलदार श्री निलावार गटविकास अधिकारी,माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एक हजार ब्रास वाळू साठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. असाच प्रस्ताव झाडीतून देखील सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे वणी विधानसभेतील वाळू प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

वाळू वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यासोबत सातत्याने आमदार संजय देरकर हे पाठपुरावा करीत असून जसे आदेश धडकतील वाळूचा वाटप करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार निखिल धूळधर यांनी दिली आहे.
वाळू घोरणावर उचित चर्चा करताना आमदार संजय देरकर
गावपातळी वाळू नियोजन समिती मार्फत होणार वितरण
गाव पातळीवर वाळू नियोजन समिती गठित असून या समितीचे अध्यक्ष विद्यमान सरपंच असणार आहे. तर सचिव म्हणून विद्यमान तलाठी हे असणार आहे. तर सदस्य म्हणून पोलिस पाटील, ग्रामसेवक, तंटामुक्ती अध्यक्ष व इतर लोक असणार आहे.
या समितीने ज्या घाटावरून वाळूची वाहतूक केल्या जाणार आहे. त्या ठिकाणावरून तर लाभार्थ्यांच्या घरापर्यंत वाहतुकीचा व वाहनात वाळू भरायचा खर्च योग्य आकारणी करून सर्वांना समान दराने वाळू उपलब्ध करुन द्यायची आहे. केवळ वाळूची जे शासकीय रॉयल्टी असणार आहे ते शुल्क माफ असणार आहे. घरकुलाचा संपूर्ण डेटा ग्रामपंचात स्थरावर उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वांना वाळू उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आमदार संजय देरकारांच्या कार्यप्रणालीवर घरकुल धारक समाधान व्यक्त करीत आहे.

जनतेने भाजपला सत्तेसाठी निवडून दिलं आहे, आंदोलन करण्यासाठी नव्हे. आमदार संजय देरकर यांची बेधडक प्रतिक्रिया:
“भाजपचं वाळू आंदोलन म्हणजे लोकांची डोळ्यात धूळफेक करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. एकीकडे महसूल खातं भाजपच्या मंत्र्याकडे आहे, त्याच खात्याच्या माध्यमातून वाळू धोरण आखलं जातं आणि दुसरीकडे त्याच पक्षाचे कार्यकर्ते सत्याग्रहाच्या नावाखाली आंदोलन करतायत – ही केवळ नाटकीपणाच नाही तर जनतेची दिशाभूलही आहे.
भाजपला जर खरोखर वाळूच्या गैरव्यवहाराची चिंता असेल, तर त्यांनी आपल्या मंत्र्यांकडून ठोस निर्णय घ्यायला लावावेत. आंदोलन करून अधिकाऱ्यांवर खापर फोडणं म्हणजे जबाबदारी झटकण्याचा सोपा मार्ग आहे. सत्ता चालवायची असेल तर जबाबदारी घ्या, आणि जनतेची बुद्धीमत्ता कमी लेखू नका. भाजप हे ५ महिन्यापासून सत्ता भोगता आहे. परंतु वाळूवर धोरण ठरवता आलं नाही.
जनतेने भाजपला सत्तेसाठी निवडून दिलं आहे, आंदोलन करण्यासाठी नव्हे. जनतेच्या प्रश्नांवर उपाय शोधणं हेच त्यांचं कर्तव्य आहे – आंदोलन नव्हे. अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार संजय देरकर यांनी दिली आहे.



