साहेब, आमच्या डोळ्यातील अश्रू पण तुमच्यामुळेच आले होते….
News Today
दिलीप भोयर
वणी :- भाजपाचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आपल्या अनपेक्षित पराभवाने प्रचंड खचले. कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते कमालीचे भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यातील घरंगळणारे अश्रू बघून मी स्वतः फार अस्वस्थ झालो.
साहेब, अश्रूंची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ते आपल्या डोळ्यात येते. हेच अश्रू तुम्ही दुसऱ्यांच्या डोळ्यातून पाडले नसते तर आज हे अश्रू तुमच्या डोळ्यात आले नसते. डोळ्यातील अश्रू सांगून जातात की आपल मन या पराभवाने किती दुःखी झाल आहे. यावरून आपणास हे खुल सांत्वन पत्र आहे.
सन्माननीय संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब तुम्ही २०१४ ला प्रथम आमदार झाले. सर्वांना आनंद झाला आमदार झाल्या नंतर जो काही विकास मतदारसंघात केला. त्या बद्दल देखील दुमत नाही. आपण लोकप्रतिनिधी आहात म्हणजे तुमच्या मतदार संघातील सर्व मतदारांचे व जनतेचे प्रतिनिधी आहात.
सर्वांच्या सुख दुःखात तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होणे ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी असते. एक काळजी वाहू लोकप्रतिनिधींची ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे. आपण ती पाडली यात काहीही शंका नाही.
तुम्ही सर्व जनतेचे लोकप्रतीनिधी असताना तुमच्यात एक न्यूनगंड तयार झाला की मी केवळ भाजपाचे प्रतिनिधित्व करीत आहे. जो कोणी व्यक्ती भाजपाच्या विरोधात बोलत असेल किंव्हा त्यांच्या चुकीच्या धोरणाला विरोध करीत असेल तर त्या व्यक्तीचा संविधानाने दिलेला अधिकार आहे. परंतु तुम्ही आणि तुमचे चेलेचपाटे काटेकोरपणे काटा काढण्याच्या दृष्टीकोनातून काम करायचे. हे जनता खुल्या डोळ्यांनी बघत होती हो साहेब….
आपण ज्या देशात व राज्यात किंवा गावात आहोत त्या ठिकाणी लोकशाही नावाची एक प्रणाली आहे. ज्यात आपले अभी व्यक्ती स्वतंत्र या देशातील संविधानाने सर्वांना दिले आहे. अनेक लोकांच्या मनात भीती असते. तर कोणी दुसरे काय म्हणेल म्हणून, बोलून दाखवत नव्हते. तर काही लोक आपल्याला काय करायचे आहे. म्हणून दुर्लक्ष देखील करीत होते. पण सारेच गप्प बसतील असे होत नाही. लोकशाहीमध्ये मतभेद असतील आणि ते राहतात याला कोणी नाकारू शकत नाही. मतभेद किंवा विरोध नसेल तर ती लोकशाही असूच शकत नाही.
जेव्हा अनेक गावातील सरपंच जेव्हा तुमच्याकडे गावातील समस्या घेवून यायचे तेव्हा तुम्ही त्यांच्या गळ्यात भाजपचा शेला टाकल्याशिवाय विकास कामे देत नव्हते. अहो साहेब त्यांच्या मनाचा थोडा तरी विचार करायचा असता ना त्यांनी गावच्या विकासासाठी आपले अंतर्मन मारून ते तुमच्या हाताने स्वताच्या गळ्यात शेला टाकून घेत होते. तेव्हा त्यांच्या हृदयातून अश्रू धारा असायच्या त्या कधीच तुम्हाला दिसल्या नाही. किंवा त्यांच्या अश्रूंची किंमत तुम्हाला कळू शकली नाही. असे एक नाही तर अनेक उदाहरण आहे. जे तुमच्या डोळ्यासमोर घडत असताना तुम्ही बघू शकले नाही.
अहो साहेब अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरीब रोज मजूरी करणाऱ्यास लोकांवर देखील तुम्ही क्रूरदुष्टी टाकली हो. का तर ते मुस्लिम आहे म्हणून त्यांचा द्वेष करणे आणि त्यांच्या रोजगारावर बुलडोजर चालवणे हे योग्य नव्हतं हो साहेब. त्या रोजगारावर त्याची त्याच्या लेकराबाळाच्या पोटाची खळगी असते हो साहेब. त्यावर त्यांचे सर्व कुटुंबाचा उधार निर्वाह चालत असतो. त्यात मुलांचं शिक्षण असेल, वृध्द आई वडिलांचे आजारावर उपचार असेल पत्नीची देखभाल असेल हे सर्व काही त्या रोजगारावर असते हो. ज्यावेळी त्यांची जिंदगी उध्वस्त होत होती त्यावेळी त्यांच्या घरी असलेल्या वृध्द आई वडिलांच्या डोळ्यात त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात त्यांच्या मुलांच्या डोळ्यात असेच अश्रू होते हो. ते आपल्याला कधीच दिसले नाही. तेव्हा जर आपण या अश्रूंची किंमत जाणली असती तर आज हे अश्रू तुमच्या डोळ्यात आले नसते हो.
तुम्ही व्यक्तिगत मला तरी कुठ सोडलं हो, माझे ही व्यवसाय तुम्ही उध्वस्त केले. तेव्हा जनता बघत होतो हो, मी तर २०१५ मध्येच माझी पत्रकारिता सोडून छोटे मोठे व्यवसाय सुरू केले हो. की या पत्रकारितेने कुणाचे ही व्यक्तिगत नुकसान होऊ नये या उद्देशाने मी माझ्या पत्रकारितेला पूर्ण विराम दिला होता हो. पण तुम्हाला आणि तुमच्या चेल्याचपट्याना माझ्या व्यवसायाबद्दल प्रचंड खाज होत होती हो.
अनेकदा माझ्या व्यवसायाबद्दल तोंडी तक्रारी केल्यात. पण तुम्ही ही जाणीव कधी केली नाही की, माझ्या ही व्यवसायावर माझं कुटुंब आहे. त्यावेळी तुम्ही आमदारकीचा तोरा दाखवत होते. तर तुमचे चेले चपाटे पदाचा गैरवापर करीत होते. आज या चेल्यांचा ही इतिहास माझ्या जवळ जमा आहे. यांना तर मी हातच लावला नाही मात्र अजून वेळ संपली नाही, हिशोब बरोबर होणार……
असो तरी मी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून सतर्क केलं देखील पण तुमच्यातला आमदरपणाचा तोरा काही कमी होत नव्हता. तुम्ही व्यक्तिगत फार चांगले आहे हो साहेब, तुमच्या व्यक्तिगत स्वभावाला कुठेच तोड नाही. परंतु जो सत्तेचा आणि आमदारकीचा अहंपणा कुठं तरी दिसत होता ते तुम्हाला कळत नव्हत. तुमचा पराभव तुमच्या अंहकाराने केला हो साहेब. तुमचा अहंकार तुमच्याशी गद्दारी करून गेला. तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका पण सत्त हेच आहे.
जीवनात काही करा पण एखाद्या पत्रकाराला अजिबात डीवचू नका सारेच पत्रकार पायावर लोटांगण घालत नाही. सारेच पत्रकार पैशाच्या मागे जात नाही. हे सुध्दा धान्यात ठेवा. सर्व जनतेला जगविण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यांच्या हाताला काम देणे हे सरकारच कर्तव्य आहे. त्याच बरोबर ज्यांनी स्वयंरोजगार उभे केले असेल तर त्यांच्या रोजगाराचे संरक्षण,सुरक्षा करणे हे देखील सरकारचे कर्तव्य आहे. पण तुम्ही अक्षरशः उध्वस्त केले. ज्यावेळी कोणाचे रोजगार उध्वस्त होते ना त्यावेळी असेच अश्रू बाहेर येतात. ते जर आपल्याला त्यावेळी दिसले असते तर आज तुमच्या डोळ्यात पराभवाचे अश्रू दिसले नसते.
असो विकास कामाचे तर “जो तळे राखतो तो पाणी पितोच” त्यात काही शंका नाही. परंतु मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली हे धोरण जनतेसमोर गुपीत राहत नाही. विकासाचा व्यवसाय केला की थोडाफार अहंकार वाढतो आणि तोच अहंकार माणसाला मातीत घालतो. असो तरी पण तुम्ही आमचे अगोदरही मित्र होते आजही मित्र असणार आहे. एक मित्र म्हणून तुमच्या डोळ्यातील अश्रू बघून माणुसकीच्या नात्याने मला देखील दुःख झाले, शेवटी आपण माणसे आहोत. एक दिवस आपलाही जीवाचा शेवट आहे. सोबत काहीच येणार नाही हो साहेब. बस येवढीच जान असणे गरजेचे आहे. स्वताला सावरा आणि काळजी घ्या. तुमच्या वेदनांची मला जाणीव आहे.
तुमच्या डोळ्यातील अश्रू बघून आमच्या मनाला वेदना झाल्या हे साहजिकच आहे. आपल्याला एखादा सल्ला द्यावा इतपत मी काही मोठा नाही. परंतु आपल्याला जशा वेदना होते तशाच वेदना दुसऱ्यांना देखील होतात त्यामुळे एकमेकांच्या वेदनांची जाणीव ठेवली पाहिजे. तेव्हाच आपली माणुसकी जिवंत असते, आणि माणुसकी जिवंत असली पाहिजे. शेवटी आपण सारे मानव आहोत. ज्या देहात आपण राहतो त्या देहाची एक दिवस राख होतेच म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार माणसात असू नये एवढंच…आणि जर काही आमच्या माध्यमातून चूक झाली असेल तर मी व्यक्तिशः आपली दिलगिरी व्यक्त करतो. शेवटी तुम्ही वयाने आणि कर्तुत्वाने मोठे आहात.
🙏 धन्यवाद🙏
बघा व्हिडिओ..
https://youtu.be/DI8XptYGTMI?si=zfceO-0f8Mp3ftYg
आपला मित्र
दिलीप भोयर
वणी
संपादक : वणी न्युज टुडे