सुरुवाती बिंदूपासून काम सुरु न करता मधून सुरु केला काम
सा. बा. अभियंता व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
News Today
दिलीप भोयर
वणी :- शहरातील साई मंदिर चौक ते नांदेपेरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत चार पदरी सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आला आहे. सद्या या रस्त्याच्या एका बाजूने ड्रेनेज बांधकाम तर दुसऱ्या बाजूला रुंदीकरण करण्यासाठी खुदाई सुरु आहे. कोट्यवधीच्या या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखरेख ठेवणे गरजेचे आहे. मात्र बांधकाम विभागाचे उप अभियंता व कनिष्ठ अभियंता या कामाकडे ढुंकूनही पाहत नसल्यामुळे कंत्राटदाराच्या मर्जीने काम सुरू आहे.
कंत्राटदारांनी सदर कामाची सुरुवात साई मंदिर चौकापासून करायला हवी होती. त्यासाठी रस्त्याच्या बाजूच्या अनेक पक्या इमारतीचे १ ते ४ मीटर पर्यंत अतिक्रमण तोडावे लागणार होते. परंतु निवडणूक काळात लोक प्रतिनिधीबद्दल मतदारांची नाराजगी पथ्यात पडण्याची भीतीमुळे सदर अतिक्रमण तोडण्याची कारवाई वगळण्यात आली.
जिल्हा मार्ग, राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गाची हद्दिपासून इमारत बांधकाम नियमात एकसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र शासन नगर रचना विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम १५४ अन्वये दिनांक ०५/०८/२०१९ रोजी शासन आदेश निर्गमित केले. या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या नागरी भागात ३ ते ६ मीटर व अनागरी भागात रस्त्याच्या मध्यपासून ३७ मीटर जागा सोडून इमारत बांधकाम करता येणार. तसेच राज्य महामार्ग असलेल्या नागरी व औद्योगिक भागात रस्त्याच्या मध्यपासून २० मीटर किंवा रस्त्याच्या हद्दिपासून ४.५ मीटर जागा सोडून बांधकामांना परवानगी आहे.
साई मंदिर चौक ते नांदेपेरा मार्ग या रस्त्याची राज्य महामार्ग श्रेणीत नोंद आहे. त्यामुळे या रस्त्याच्या निविदेमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने १२-१२ मीटर बांधकाम करण्याची अट आहे. असे असताना वरिष्ठ पातळीवर कोणतीही परवानगी न घेता परस्पर रस्त्याची रुंदी कमी जास्त करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.