- निविदेतील अटी वगळून मनमर्जीने होत आहे काम
धन दांडग्यांची मालमत्ता वाचविण्यासाठी रस्त्याची रुंदी केली परस्पर कमी
धनदांडग्यांचे वाल कंपाऊंड वाचविण्यासाठी नालीचा प्रवाह मोडला
News Today
दिलीप भोयर
वणी:- शहरातील साई मंदिर ते नांदेपेरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु या रस्त्याचे काम कंत्राटदार आर.व्ही. उंबरकर कडून करण्यात येत आहे. तब्बल ६ कोटी रुपयांच्या या रस्त्याच्या निविदेतील मंजूर कामाला वगळून लोक प्रतिनिधीच्या मर्जीने काम सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक तक्रारी नंतर ही सा. बा. विभाग व कंत्राटदार कोणालाही न जुमानता आपल्या मर्जीने काम करीत आहे.
नित्कृष्ट दर्जाचे होत असलेले नाली बांधकाम
सदर रस्त्याच्या मंजूर निविदेनुसार रस्त्याच्या मध्य १ मिटरचे डिव्हायडर व त्याच्या दोन्ही बाजू ने ७.५० मीटर सिमेंट रस्ता, २.५० मीटरचे पेव्हर ब्लॉक व १.५० मीटर रुंदीचे सिमेंट ड्रॅनेजसह एकूण २४ मीटर रुंदीचे बांधकाम करावयाचे आहे. मात्र साई मंदिर ते न. प. शाळा क्रमांक ५ पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या हद्दीत अतिक्रमण करून अनेक पक्के घर, दुकाने व अपार्टमेंट बांधण्यात आले आहे. तर त्यापुढे अनेक जणांनी अतिक्रमण करून घराचे वाल कंपाऊंड बांधले आहे.
रस्त्याचा बांधकाम सुरू करताना भूमी अभिलेख विभागाने मोजमाप करून रस्त्याची हद्द आखून दिली. रस्त्याच्या केंद्रापासून १२ मीटरचे आत काही मोठ्या लोकांच्या इमारती असल्यामुळे त्या इमारती तोडणे गरजेचे होते. मात्र विधानसभा निवडणूक आणि मालमत्ता धारकांचा दबाव असल्यामुळे परस्पर रस्त्याची रुंदी कमी करण्याचे मौखिक आदेश देण्यात आले. त्यामुळे कंत्राटदाराकडून कोणतेही अतिक्रमण न तोडता सर्पाकार रचनेनुसार नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे रस्त्याचा देखरेखी करिता सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अभियंता कामावर हजर राहत नाही. त्यामुळे कंत्राटदार आपल्या सोयीने काम करीत आहे.
याच इमारती वाचविण्यासाठी रस्त्याची रुंदी केली कमी
नांदेपेरा मार्ग हा आजच्या घडीला शहरात सर्वात जास्त रहदारीचा मार्ग झाला आहे. या मार्गावर शाळा, कॉलेज, दवाखाने असल्यामुळे दिवसभर रहदारी असते. तर रेल्वे फाटक बंद असताना मोठा ट्रॅफिक जाम होत असतो. अशातच कोट्यावधीच्या या रस्त्याच्या कामात बांधकाम विभाग, लोक प्रतिनिधी व कंत्राटदाराच्या संगनमताने मोठा गौडबंगाल होत आहे. याबाबत सा. बां. विभागाचे उपविभागीय अभियंता आसुटकार यांच्याशी संपर्क केला असता त्यांची चौकशी करून कारवाई करणार असे सांगितले. परंतु कारवाई होईल की नाही याची कोणालाही शास्वती नाही. सदर कामात सुरु अनियमितता बाबत शहरातील एका समाजसेवकाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.