News Today
झरी जामणी : गुप्तधन शोधण्यासाठी जाण्याच्या कारणावरून तिघेजण एका शेतकऱ्याला घरातून सोबत घेऊन गेले. मात्र त्यानंतर संबंधित शेतकरी घरी परत न आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बेपत्ता शेतकऱ्याच्या पत्नीने पाटण पोलिसांकडे तक्रार करून पतीचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे.
मारोतीपोळ (ग्रामपंचायत मुलगव्हाण), ता. झरी जामणी, जि. यवतमाळ येथील गोपाल राजू घसळकर (३५) हे दिनांक २८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता घरातून बाहेर गेले. त्यांच्या पत्नी सौ. संगीता गोपाल घसळकर यांच्या म्हणण्यानुसार, लेतू सीताराम टेकाम (३५), राजू पुलाजी आत्राम (२७) आणि सुनील चंपत टेकाम (२२) हे तिघे गोपाल घसळकर यांना बोलावण्यासाठी घरी आले होते. त्यानंतर ते तिघांच्या सोबत घराबाहेर गेले.

मात्र २८ जुलैपासून गोपाल घसळकर हे घरी परतलेले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यांच्यासोबत गेलेल्या व्यक्तींकडे पत्नीने वारंवार विचारणा केली असता, “तो जंगलात आहे”, “झाडावर बसून आहे”, “तो जिवंत आहे” अशी उत्तरे देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय “पोलीस ठाण्यात रिपोर्ट देऊ नका”, “तो पागल झाला आहे”, “त्याच्यावर कर्ज आहे म्हणून तो लपून बसला आहे” अशा प्रकारची उत्तरेही संबंधितांकडून मिळाल्याचा आरोप पत्नीने केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराबाबत संशय निर्माण झाला असून, पतीसोबत काही अनुचित घटना घडली असण्याची भीती पत्नीने व्यक्त केली आहे.
या घटनेबाबत सौ. संगीता घसळकर यांनी ४ ऑगस्ट २०२६ रोजी पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांनी सदर प्रकरणाची नोंद हरविलेल्या व्यक्तीच्या स्वरूपात केली असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
दरम्यान, गोपाल घसळकर यांना शेवटचे वरील तिघेजण सोबत घेऊन गेल्याने त्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधितांचे मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स तपासावेत, गोपाल यांना नेमके कुठे नेण्यात आले याचा शोध घ्यावा तसेच जंगल परिसरासह संशयित ठिकाणी शोधमोहीम राबवावी, अशी मागणी पत्नीने केली आहे.
गुप्तधन शोधण्याच्या नावाखाली नेमके काय घडले? गोपाल घसळकर सध्या कुठे आहेत? त्यांना सोबत घेऊन गेलेल्या तिघांना त्यांच्या ठावठिकाण्याची माहिती आहे का? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.
बेपत्ता पतीचा तातडीने शोध घेऊन या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, अशी मागणी सौ. संगीता घसळकर यांनी केली आहे.


