शहापूर, ठाणे :- राष्ट्रीय ओबीसी, बहुजन शिक्षक संघ-महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा ठाणे ग्रामीण व शहापूर येथील कार्यकर्ते भरत पार्वती परशुराम निचिते यांना ‘डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
भरत निचिते यांनी ‘आम्ही भारतीय लोक’ या संघटनेमार्फत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर, आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. संत महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सामाजिक-शैक्षणिक उपक्रम राबवले.
*वडिलांच्या उत्तरकार्यालाही समाजकार्याची जोड*
वडिलांच्या उत्तरकार्याच्या वेळीही त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्क-अधिकारासाठी ‘आदरांजली बॅनर’ लावून जनजागृती केली. शासन व प्रशासनामध्ये ओबीसींची प्रमुख भूमिका का असावी व ओबीसींची टक्केवारी किती असावी, यावर त्यांनी बॅनरद्वारे प्रकाश टाकला.

*आरक्षण लढ्यात अग्रेसर*
ओबीसी समाजाला शैक्षणिक, नोकरी व राजकीय आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी शासन-प्रशासनाला पत्रव्यवहार व आंदोलनाद्वारे निवेदने दिली. 14 मे 2016 रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ओबीसी हक्कांवर व्याख्यान आयोजित केले होते.
*आमरण उपोषणातून आवाज*
*26 नोव्हेंबर 2023* रोजी राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण केले. या उपोषणाच्या माध्यमातून मंत्रिमहोदयांशी संवाद साधून ओबीसींच्या प्रमुख भूमिकेबद्दल ठाम मागणी मांडली.
*गावपातळीवर जनजागृती*
2013 ते 2019 या काळात शहापूर व वाडा तालुक्यात ग्रामगीता व रॅलीच्या माध्यमातून गावपातळीवर जनजागृती केली. या सभांमधून प्रत्येक ग्रामपंचायतीत “जातनिहाय जनगणना होत नसेल तर आम्ही जनगणनेवर बहिष्कार टाकू” असा ठराव पास करून घेतला.
त्यांच्या या अखंड व निस्वार्थ कार्याचा विचार करून राष्ट्रीय ओबीसी, बहुजन शिक्षक संघ-महाराष्ट्र राज्य या संघटनेने हा पुरस्कार जाहीर केला आहे.
—
*डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कार* मिळाल्याबद्दल श्री. भरत पार्वती परशुराम निचिते यांचे मनापासून अभिनंदन!
शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समता, बंधुत्व आणि न्यायाच्या विचारांचा वारसा खांद्यावर घेऊन, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपण जो लढा उभारत आहात तो खरंच प्रेरणादायी आहे.
या कार्याची दखल
– वडिलांच्या दुःखद निधनानंतरही खचून न जाता समाजजागृतीचे काम सुरू ठेवलेत
– गावपातळीवर जाऊन ओबीसी बांधवांना त्यांचे हक्क, अधिकार समजावून सांगितलेत
– शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न उपोषणाच्या माध्यमातून मांडलेत
– तरुण वयातच शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यसैनिक किसन बाबा मेरे यांच्या विचारांचे पाईक बनून काम करत आहात
शहापूर तालुक्यातून उभा राहिलेला हा लढवय्या आवाज आज महाराष्ट्रभर पोहोचतोय, ही अभिमानाची गोष्ट आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या शेतकरी व ओबीसी समाजाच्या कैवारी महापुरुषाच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार आपल्या कार्याची पावती आहे.


