News Today
वणी:- मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मेंढोली-पिंपरी जोडरस्त्याच्या प्रश्नाने अखेर तीव्र स्वरूप धारण केले असून, वन विभागाच्या जागेतून जाणाऱ्या केवळ ६०० मीटरचा रस्ता न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मेंढोली येथील समाजकार्यकर्ते मनोज काळे यांनी ३ एप्रिलपासून मरणांत उपोषणाला सुरुवात केली आहे.

सदर रस्ता अपूर्ण असल्यामुळे पिंपरी गावात जाण्यासाठी नागरिकांना तब्बल ३० किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे, तर प्रत्यक्ष अंतर केवळ ३ किलोमीटर आहे. या समस्येमुळे शेतीकाम, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असून, अनेक वेळा ग्रामस्थांनी शासनाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
याच पार्श्वभूमीवर मनोज काळे यांनी मेंढोली शिवारातील जंगलालगतच्या शेतात मंडप उभारून उपोषण सुरू केले आहे. सध्याच्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलत्या हवामानाच्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू ठेवला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मनोज काळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका करत रस्त्याच्या कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी बांगळे यांच्यासह प्रत्यक्ष रस्त्याची पाहणीही करण्यात आली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू वांढरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे मोरेश्वर पोतराजे, राजू झाडे, वसंता कोहळे, प्रवीण झाडे, सुरेश गोरे, लटारी पिंपळकर , रामकृष्ण मोहारे , गजानन तुरणकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या उपोषणाला पिंपरी येथील सरपंच तातोबा पावडे, मेंढोली येथील सरपंच सविताताई ढवस, विनायक ढवस, पंढरी ताजने, प्रकाश भोसले पिपंरी व मेंढोली गावातील तमाम ग्रामवाशी आदी परिश्रम घेत आहे.
दरम्यान, प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


