News Today
वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील अडेगाव येथील शेतकरी अंकित शंकर डोहे यांनी परिसरातील औद्योगिक प्रदूषणाविरोधात तीव्र भूमिका घेतली असून, नुकसानभरपाई न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपूर व ईशान्य कल्सी परिसरातील डोलोमाईट कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणावर धूर आणि धूळ निर्माण होत आहे. विशेषतः EXCELLO FIN LEA LIMITED CHILAI DOLOMITE MINES CHILAI आणि ईशान्य कल्सी कंपनीमधून निघणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतीचे गंभीर नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अंकित डोहे यांच्या मते, कंपनीतून निघणारा धूर थेट शेतांवर परिणाम करत असून पिके नष्ट होत आहेत. तसेच कंपनीच्या वाहतुकीमुळे उडणारी धूळ शेतात साचत असल्याने जनावरांनाही त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून दरवर्षी नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, ८ दिवसांच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ईशान्य कल्सी कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


