News Today
वणी:- नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचे वारे आता अधिक वेगाने वाहू लागले असून, अधिकृत प्रचाराला अजून सुरुवातही झालेली नसतानाच कमळाबाई गटाच्या अंतर्गत वादांनी जोर धरला आहे. दिनांक १८ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या दरम्यान दीपक टॉकीज परिसरातील एका नगरात (गोकुळच्या दारी) पक्ष प्रवेशाच्या दरम्यान कमळाबाई समर्थित दोन संभाव्य उमेदवारांमध्ये तीव्र बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद उमेदवारीच्या वाटपावरून झाल्याची गोपनीय माहिती आहे. आणि हे प्रकरण दळपण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्या जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही बाचाबाची केवळ शब्दांच्या चकमकीपर्यंत न थांबता जुने वैर आणि परस्पर स्पर्धेमुळे तीव्र ‘हमरी–तुमरी’पर्यंत पोहोचली होती. दोन्ही कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याने परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
घटना अधिक बिघडू नये म्हणून उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पदाधिकाऱ्यांनी दोन्ही कार्यकर्त्यांना तिथून दूर नेऊन प्रसंगाचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मोठी धुमश्चक्री टळल्याचे स्थानिक स्रोतांनी सांगितले.
दरम्यान, रात्री उशिरा घडलेल्या या प्रकरणानंतर स्थानिक राजकीय वर्तुळात एक वेगळाच सवाल उपस्थित होत आहे—अधिकृत आचारसंहिता लागू असूनही सत्ताधारी कमळाबाई गटाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक विभागाकडून मोकळीक मिळतेय का? या घटनेवर निवडणूक विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे आता स्थानिक नागरिक आणि विरोधी गटांचे लक्ष लागले आहे.
या अंतर्गत कलहामुळे कमळाबाई गटाची प्रतिमा धुळीस मिळण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना गटांतर्गत भांडणांनी पुढील काही दिवसांत आणखी नवे वळण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.



