


News Today
वणी (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र शासनाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ आणि अन्न सुरक्षा नियम २०११ अंतर्गत सुगंधित तंबाखू, गुटखा आणि तंबाखू मिश्रित पान मसाल्यांवर कठोर बंदी लागू केली असतानाही, वणी शहरात या घातक पदार्थांचा व्यापार बेधडक सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.

जुन्या बसस्टॉपजवळील एका कृषी केंद्रासमोरील दुकानात सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळाली आहे. ही तंबाखू शहरात विविध छोट्या किराणा दुकांनांतून आणि पानठेल्यांमधून ग्राहकांपर्यंत पोहोचवली जात असल्याचेही समजते.

अन्न सुरक्षा अधिनियमाच्या कलम 26(2)(i) व नियम 2.3.4 नुसार तंबाखू आणि निकोटीनयुक्त कोणत्याही पदार्थाचे अन्नपदार्थ म्हणून उत्पादन किंवा विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीदेखील, काही व्यापारी आणि पुरवठादार प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत हे पदार्थ खुलेआम विक्रीस ठेवत आहेत.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका नागरिकाने संताप व्यक्त करत सांगितले,

“राज्य सरकारने लोकांच्या आरोग्यासाठी हा कायदा केला. पण शहरात गुटखा आणि सुगंधित तंबाखू सहज उपलब्ध आहे. पोलीस आणि एफ.डी.ए. विभाग दोघेही डोळेझाक करत आहेत.”

या अगोदरही महादेव नगरातील एका आरोपीवर गुटखा तस्करीचा गुन्हा दाखल होऊन तो कोठडीत गेला होता, परंतु काही काळातच तो पुन्हा या बेकायदेशीर धंद्यात सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरून प्रशासनाची कारवाई केवळ “कागदोपत्री” असल्याचे स्पष्ट होते.

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग आणि स्थानिक पोलीस यांना कायद्यानुसार अशा तंबाखू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून माल जप्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु अशा प्रकारच्या छाप्यांची नोंद मागील काही महिन्यांत नाही.

नागरिकांनी आता “प्रशासनाने जागे होऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू” असा इशारा दिला आहे.

राज्य सरकारने लागू केलेल्या बंदीच्या अधिसूचनेनुसार, सुगंधित तंबाखू विक्रीचा गुन्हा केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो. तरीदेखील वणीतील काही विक्रेत्यांना या कायद्याची पर्वा नसल्याचे चित्र दिसत आहे.

शहरातील तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या तंबाखू माफियांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे, अशी एकमुखी मागणी वणीकरांकडून होत आहे.



