News Today
मारेगाव : मौजा उमरघाट (ता. मारेगाव) येथील आदिवासी समाजाच्या कब्ज्यातील शेतजमिनींच्या अवैध विक्रीचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. संबंधित प्रकरण सध्या मारेगाव न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, तरीसुद्धा काही व्यक्तींनी लोकांची दिशाभूल करून जमिनी विक्रीचे व्यवहार सुरू केल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे.

गाव नं. २५ मधील गट नं. ८, गट नं. १६, गट नं. १७/२ व गट नं. २८ या क्षेत्रातील शेतजमिनी मागील सत्तर वर्षांपासून आदिवासी बांधवांच्या ताब्यात आहेत. या जमिनीवरच त्यांचा मुख्य उपजीविकेचा आधार आहे. तथापि, पवन सुभाषचंद्र मुथा, अनिल लुथडे, अभय मोहता यांच्यासह इतर काही व्यक्तींनी कथितरीत्या बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतजमिनी विक्रीस काढल्या असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात आदिवासी बांधवांनी न्यायालयात दाद मागितली असून प्रकरणाचा निर्णय प्रलंबित आहे. तरीदेखील संबंधित जमिनी वादग्रस्त असल्याचे माहीत असूनही लोकांची फसवणूक करून व्यवहार रेटले जात असल्याचा आरोप आहे.

याशिवाय, श्री लुथडे (रा. नागरी, ता. वरोरा), श्री मुथा (रा. माढेली, ता. वरोरा), श्री. मोहता (रा. माढेली) यांच्यासह काहींनी WCL (वेकोली) चे बोगस राजपत्र Section 4 दाखवून वणी नॉर्थ क्षेत्र, भालर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

- कोणताही विक्री व्यवहार करू नये — इशारा
संबंधित शेतजमिनी वादग्रस्त व न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने कोणीही विक्री किंवा खरेदीचा सौदा करू नये, असा स्पष्ट इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे. अन्यथा अशा व्यवहारात अडकणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे वरोरा येथील अंकुश आगलावेयांचे कडून सूचित करण्यात आले आहे.



