News Today
भद्रावती, दि. २४ ऑगस्ट २०२६ : भू वैकुंठ अड्याळ टेकडीच्या जमिनीच्या मालकी व ताबा-वहिवाटीबाबत अखिल भारतीय संस्था गुरुकुंज मोझरी यांच्यासोबत न्यायालयीन वाद सुरू असताना, संबंधित जमिनीवर सुरू असलेल्या भक्त निवासाच्या बांधकामास शासकीय निधीतून मंजुरी देण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्यात आला आहे. या प्रकरणी भद्रावती तालुक्यातील भू वैकुंठ अड्याळ टेकडीप्रेमी शेकडो गुरुदेव सेवकांनी एकत्र येत भद्रावतीचे तहसीलदार यांना दि. २४ ऑगस्ट रोजी स्वाक्षरीचे निवेदन सादर केले.

निवेदनात, भू वैकुंठ अड्याळ टेकडीच्या जमिनीवर कायदेशीर ताबा व वहिवाट असल्याचा दावा करण्यात आला आहे. न्यायालयात वाद प्रलंबित असताना अड्याळ ग्रामपंचायत व अखिल भारतीय संस्था गुरुकुंज मोझरी यांच्या संगनमताने सदर जागेवर अवैधरीत्या ताबा-वहिवाट निर्माण करण्याच्या उद्देशाने शासकीय निधीतून भक्त निवासाचे बांधकाम मंजूर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
तसेच, अड्याळ टेकडीच्या मालकीसंदर्भात मा. तहसीलदार, ब्रह्मपुरी यांनी दि. २८ जुलै २०२६ रोजी काढलेला अहवाल व त्यासंदर्भातील पत्र कायदेशीरदृष्ट्या चुकीचे असल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे. सदर अहवाल व पत्राची तातडीने चौकशी करून ते रद्द करण्यात यावे, तसेच न्यायालयीन वाद सुरू असताना संबंधित जमिनीवर कोणतेही बांधकाम अथवा ताबा निर्माण करणारी कार्यवाही करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

भू वैकुंठ अड्याळ टेकडी ही गुरुदेव भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असून, तिच्या जमिनीबाबत कोणतीही एकतर्फी किंवा बेकायदेशीर कार्यवाही सहन केली जाणार नाही, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही न केल्यास गुरुदेव भक्तांच्या वतीने व्यापक जाहीर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
न्यायालयीन वाद प्रलंबित असताना प्रशासनाने संबंधित जमिनीची वस्तुस्थिती, न्यायालयीन प्रकरणातील आदेश व उपलब्ध महसूल अभिलेख यांचा सखोल विचार करूनच कोणतीही पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी गुरुदेव सेवकांनी केली आहे.


