
News Today
वणी – साई मंदिर ते रेल्वे क्रॉसिंगपर्यंतच्या नांदेपेरा मार्गावर सुरु असलेल्या नाली व रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाच्या अत्यंत निकृष्ट दर्जामुळे शहरात तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. कालच टाकलेली नाली आज तडे जाऊन बसल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे “हा शहराचा विकास नाही, तर हा मर्जीतील कंत्राटदारांचा विकास,” अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे.त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या मतदानावर याचा थेट परिणाम दिसून येणार आहे.

गेल्या एक वर्षापासून आर. व्हि. उंबरकर ही कन्ट्रक्शन कंपनी मार्फत या मार्गावरील रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र कामाची गती संत गती असल्याची टिका नागरिकांकडून सातत्याने होत आहे. त्यातच दरवेळी दोषपूर्ण आणि टिकाऊपणाचा अभाव असलेले बांधकाम होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, कामाचा दर्जा पाहता हे बांधकाम किती दिवस टिकणार हा मोठा प्रश्न आहे.

सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीय असलेल्या कंत्राटदाराला काम मिळाल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे आरोप नागरिकांमध्ये खुलेआम व्यक्त होत आहेत. त्यातच या कामात एक माजी लोकप्रतिनिधी ( मामा ) आणि त्याचा आर्थिक कमिशन संबंध जोडलेला भाचा थेट संबंधित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे.

नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना हा माजी लोकप्रतिनिधी स्वतःच्या ‘विकासकामां’ची ग्वाही देत प्रचार करत आहे. मात्र दुसरीकडे त्याच्याच धनसंपत्ती भर टाकणारा भाच्या कडून केलेले निकृष्ट बांधकाम उघडकीस येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आणखी वाढत आहे.

नांदेपेरा मार्गावरील नव्याने टाकलेल्या काँक्रीटचे पृष्ठभाग तासाभरात तडे जात असल्याचे दृश्य स्वतःच कामाच्या दर्जाचा बेमुदत पुरावा आहे. त्यामुळे हा ‘विकास’ की ‘कमिशनखोरीचा नमुना’ असा प्रश्न सर्वत्र चर्चेत आहे.

शहरातील नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून तात्काळ तपासणी व दोषींवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम तातडीने दुरुस्त करणे आणि कंत्राटदारासह जबाबदारांवर योग्य ती कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर या कामाचे भवितव्य आणि प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
९८ एकरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली व्यावसायिकांचा शेकडो कोटीच्या फायद्यासाठी मामाचा कारनामा
लवकरच वाचकांसमोर…..




