News Today
वणी प्रतिनिधी :
वणी-कायर-पुरड मार्ग क्रमांक ३१९ (घोंसा चौफुली ते १८ नंबर पूल) या सुमारे ६० कोटी रुपयांच्या रस्त्याचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारींवर ठोस कारवाई होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, महिनाभर उलटूनही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे अखेर पक्षाने आंदोलनाची हाक दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप रामदासजी भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता घोंसा चौफुली ते मानकी ते १८ नंबर पूल या दरम्यान पडलेल्या खड्ड्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांना, रुग्णवाहिकांना व वाहनधारकांना या मार्गावरून प्रवास करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार अपघात घडत असून नागरिकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. तक्रारी शासनाच्या पोर्टलवर अनेकदा नोंदवल्या गेल्या, मात्र विभागाने कंत्राटदारांचे रक्षण करण्यासाठी खोटे अहवाल सादर करून कर्तव्यच्युती केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या सर्व विपरीत परिणामांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जबाबदार राहतील, असेही भोयर यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला पक्षाचे राज्य संघटन सचिव रज्जाक पठाण, सामाजिक न्याय विभागाचे राज्य संघटन सचिव विजय नगराळे, कामगार आघाडी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन आदी मान्यवर उपस्थित राहणार असून तालुकाध्यक्ष, राजू वांढरे, तालुका सचिव प्रदीप खोब्रागडे, उपाध्यक्ष महेंद्र चांदुरे, नरेंद्र लोणारे, प्यारेलाल मेश्राम, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, मारेगाव तालुकाध्यक्ष भारत मत्ते, झरीचे तालुकाध्यक्ष प्रमोद थेरे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष, सूर्यवीर चिकटे, मंगेश गोरे, रामदास पखाले, संतोष रोगे अतुल पिदुरकर आदी परिश्रम घेत आहे.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :
१) घोंसा चौफुली ते १८ नंबर पूल पर्यंतचा संपूर्ण रस्ता निकृष्ट झालेला असून तो नव्याने तयार करण्यात यावा.
२) निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.
३) ठेकेदाराने रस्ता योग्यप्रकारे दुरुस्त न केल्यास त्यांची अमानत ठेव जप्त करून त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे. आदी मागण्या करण्यात आल्या आहे.




