News Today
झरी, ता. झरीजामनी (30 जून 2025) – पंचायत समिती सभागृह झरी येथे महाराष्ट्र जैवविविधता मंडळ, नागपूर यांच्या वतीने एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन दिन बहूद्देशीय संस्था झरिजामनी व पंचायत समिती झरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यशाळेला जैवविविधता संवर्धन आणि “जैवविविधता कायदा 2002 ची प्रभावी अंमलबजावणी” हा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून रुपाली सावंत (DFO, जैवविविधता मंडळ, नागपूर), सुरेंद्र काळे (DFO, जैवविविधता मंडळ, नागपूर), व राजीव चरडे (APO, नागपूर) यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रवींद्र सांगडे साहेब यांनीही आपली उपस्थिती दर्शवून कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त करून दिले.
या कार्यशाळेत ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तसेच BMC (बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी) सदस्य यांनी सहभाग नोंदवला. लोक जैवविविधता नोंदवही (PBR) तयार करण्याचे महत्त्व, त्यासाठी आवश्यक माहिती संकलन, स्थानिक जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण, आणि त्याचे गावाच्या नैसर्गिक विकासासाठी महत्त्व यावर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी नवनिर्मित BMC समित्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या व कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जैवविविधतेचा टिकाव राखण्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती आणि सहभाग हे महत्वाचे घटक असल्याचे मत मार्गदर्शकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन दिन बहूद्देशीय संस्था झरिजामनी चे अध्यक्ष शेख इरफान यांनी केले. त्यांना जुबेर खान, मदन गेडाम, व हेमंत सर नागपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले, ज्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यशाळेने उपस्थित ग्रामपंचायती व BMC सदस्यांना जैवविविधतेच्या दृष्टीने नवीन दिशा व प्रेरणा दिली.